akshay-nagalkar-missing-case: अक्षय नागलकरचा शोध लागेना; पोलीस यंत्रणा करतेय तरी काय? अखेर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितली दाद




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घटनेत अक्षय नागलकर हा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून चोवीस तास उलटले तरी देखील पोलीस यंत्रणेस यश आले नाही. डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे त्याचे नातेवाईक आणि मित्र मंडळी ठाण मांडून बसले आहेत. मात्र पोलिसांकडून फक्त तपास सुरू असल्याचे उत्तर मिळत आहे. या प्रकरणात आता स्थानिक भाजपा पक्षाने उडी घेतली असून, माजी महापौर विजय अग्रवाल यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृह राज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे. आता तरी तपास यंत्रणा जलद गतीने अक्षयचा शोध घेतील, अशी अपेक्षा त्याच्या नातेवाइकांना आहे.



अक्षय नागलकर तरुणाची डाबकी रोड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार 23 ऑक्टोबर रोजी  संध्याकाळी 6 वाजता डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन ते तीन पथके तयार केली आहेत आणि तांत्रिक बाबी (मोबाईल लोकेशन इ.) तपासण्यास सुरुवात केली असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. 


22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास अक्षयने त्याच्या आईला सांगितले की,  स्वयंपाक करुन ठेव 15 मिनिटात बाहेर जावून येतो. मात्र तो घरी परतला नाही. नातेवाईक मित्र मंडळींकडे चौकशी केली मात्र मिळून आला नाही. अखेर अक्षयच्या आईने पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार नोंदविली. 


अक्षय घराबाहेर पडल्या नंतर एका कार्यक्रमाला तो उपस्थित राहिला आणि नंतर एका मित्रासोबत निघून गेला, असे पोलीस तपासात पुढे आले. ज्या एका मित्राने त्याला शेवटचे पाहिले होते. त्याची चौकशी पोलीस करीत आहेत. 



अक्षयचा शोध लवकर लागावा, अशी अपेक्षा त्याचे नातेवाईक व मित्र मंडळी करीत आहे. यासाठी त्यांनी आज सकाळपासून डाबकी रोड पोलीस ठाणे समोर ठाण मांडले. दरम्यान पावसाने हजेरी लावली तरी देखील अक्षयचे नातेवाईक व मित्र मंडळी जागचे हलले नाही. तक्रार देवून चोवीस तास उलटले तरी देखील अक्षयचा शोध लागला नाही. पोलीस यंत्रणा करतेय तरी काय, असा सवाल अक्षयच्या नातेवाईक आणि मित्रमंडळीनी केला आहे.



अखेर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितली दाद


गोरक्षक, सामाजिक व हिंदुत्ववादी कार्यकर्ता अक्षय विनायक नागलकर याचा शोध पोलिसांनी त्वरित घेऊन आरोपींना अटक करावी, अशी मागणी माजी महापौर भाजप नेते विजय अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक  यांच्याकडे केली.  


सातत्याने समाजसेवा आणि गोरक्षक म्हणून त्याची ओळख होती, अशा हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा शोध घ्यावा व त्याचा सोबत घातपात झाल्यास किंवा कुणी त्याचे अपहरण केले असल्यास त्याचा शोध घेऊन गुन्हेगारांना त्वरित अटक करावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात अग्रवाल यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल तसेच गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून द्वारे ई-मेल द्वारे कारवाई करण्याची मागणी केली आहे.



रात्री 11 वाजता sp कडे धाव


दरम्यान, दिवसभर अक्षयचे नातेवाईक व मित्र मंडळी पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते. मात्र ठाणेदार अथवा एसडीपीओ यांनी नातेवाइकांना भेटण्याचे टाळले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पोलिसांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून, अखेर रात्री अकरा वाजता अक्षयच्या नातेवाईकांनी एसपी कार्यालयावर धडक मोर्चा नेला. आता पोलीस अधीक्षक हे प्रकरण कसे हाताळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या