नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील मलकापूर-खडकी हायवे रोडवरील एका शिक्षकांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य करत रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
घटना आणि नुकसानीचा तपशील
मलकापूर-खडकी हायवेवरील सदनीकेमध्ये इवान जेम्स आणि डॉली जेम्स हे शिक्षक दाम्पत्य वास्तव्यास आहेत. बुधवारी सकाळी दोघेही आपल्या कामासाठी घराला कुलूप लावून नोकरीवर गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले आणि सोन्या-चांदीचे दागिने शोधले. त्यांनी घरातील कपाटातून सुमारे ५० हजार रुपयांची रोकड आणि दागिने लंपास केले. दुपारच्या वेळेस जेम्स दाम्पत्य घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश केल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून लवकरच चोरट्यांना पकडण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा