akola-city-crime-news-update: कृषी नगरात दहशत पसरवणाऱ्या त्या आरोपींनी मागितली नागरिकांची माफी !



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला शहरातील कृषी नगर भागात दहशत पसरवणाऱ्या चार आरोपींची  आज शुक्रवार 18 जुलै रोजी धींड काढून पोलिसांनी याद्वारे नागरिकांना भयमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. 




काल याच भागात दोन गटात पूर्ववैमनस्यातून झालेल्या सशस्त्र हाणामारी आणि हवेत गोळीबार झाला होता, ज्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात एकूण 23 जणांवर गुन्हे दाखल केले असून 12 जणांना अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.



दरम्यान आज पोलिसांनी या आरोपींची धिंड काढली असून या कार्यवाहीचा उद्देश नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दूर करणे आहे. मात्र पोलिसांनी याला घटनास्थळाची पाहणी नाव दिलं आहे.




याद्वारे नागरिकांच्या मनातील या आरोपींबाबत असलेली भीती दूर होऊन कायदा आणि  सुव्यवस्था राखून स्थानिक नागरिकांना सुरक्षिततेची अनुभूति मिळवण्यास मदत होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.



यावेळी आरोपींनी कान पकडून या भागातील नागरिकांची माफी मागितली. तसेच यापुढे आम्ही दहशत पसरविणार नाही, अशी ग्वाही सुद्धा आरोपींनी दिली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांनी सांगितले.



काल काय घडलं होत?


कृषी नगर भागात गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास वर्चस्वाच्या वादामुळे दोन गटांमध्ये मोठा संघर्ष उफाळून आला. या घटनेत गोळीबार झाल्याने आणि तलवारीने हल्ला करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


गोळीबार आणि तलवारीच्या हल्यात आठ जण जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे.


प्राप्त माहितीनुसार, आकाश गवई आणि संतोष वानखडे यांच्या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी वाद निर्माण झाला होता. या वादात वानखडे यांच्या घरावर अचानक हल्ला चढवण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूंनी तलवार आणि बंदुकींचा वापर करण्यात आला. अचानक सुरु झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.


टिप्पण्या