भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकिय वातावरण पार बदललेले असून पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आता होवू घातलेल्या स्थानिक स्वराज संस्था निवडणूक पार्श्वभुमीवर पक्षांतराचे वाऱ्याने अधिक वेग धरला आहे. चांद्या पासून बांद्यापर्यंत हे चित्र दिसत आहे. अशातच अकोला मध्ये देखील हे चित्र अधिक स्पष्ट दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गट) पक्षात भाजपा आणि वंचितच्या मातब्बर नेत्यांनी प्रवेश घेतला आज भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश घेवून काँग्रेसला ‘जोर का धक्का धीरे से’ दिला. तशी औपचारिक घोषणा प्रदेश प्रवक्ता आमदार अमोल मिटकरी आणि जिल्हाध्यक्ष मो. बद्रूजमा
यांनी शनिवार 7 जून रोजी शासकिय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. मात्र विशेष बाब म्हणजे येत्या 12 जून रोजी अकोला येथे राष्ट्रिय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मदन भरगड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत जाहीर प्रवेश घेणार आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषदेत प्रारंभी आमदार अमोल मिटकरी आणि मो. बद्रुजमा यांनी मदन भरगड यांचे पुष्पगुच्छ देवून पक्षात स्वागत केले.
12 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची अकोल्यात जवळपास 17 वर्षानंतर सभा होणार आहे. यावेळी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला जिल्ह्यात भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील नामांकित नेते आणि माजी महापौर मदन भरगड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. हा भव्य सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विशेष पुढाकाराने आणि अकोला जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रुजमा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला आहे. याप्रसंगी अकोला जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकारी नगरसेवक पंचायत समिती सदस्य तसेच युवक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मदन भरगड यांच्यासारख्या प्रभावी नेत्याच्या प्रवेशामुळे अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होणार असून, मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या जनसंपर्क अभियानाला अबूतपूर्व यश मिळाले आहे. हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा 12 जून रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार अमोल मिटकरी आणि जिल्हाध्यक्ष मो. बद्रूजमा यांनी यावेळी दिली.
मदन भरगड यांचा राजकीय प्रवास
मदन भरगड यांचा काँग्रेसमधील प्रवास अनेक चढ उतारानी भरलेला आहे. पक्षाच्या वैभवाच्या काळात आणि पडत्या काळातही ते काँग्रेस सोबत राहिले. याकाळात विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. प्रमुख जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती सदस्य सचिव होते. त्यासोबतच मदन भरगड यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. तसेच 2001 ते 2016 पर्यंत अकोला शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. अकोला शहर एन.एस.यू.आय. (NSUI) आणि अकोला शहर युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांनी 2007 ते 2009 या काळात अकोला महानगरपालिकेचे महापौरपद भूषवले. तसेच 1996 ते 2017 पर्यंत दीर्घकाळ नगरसेवक म्हणून काम पाहिले. 2002 ते 2004 या कालावधीत ते महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य होते आणि 1996 ते 2001 पर्यंत अकोला नगरपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली.
यापूर्वीही काँगेसला दिली होती सोडचिठ्ठी
मदन भरगड यांनी शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. यापूर्वीही भरगड यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भरगड यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत अकोला पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर वंचितमधून बाहेर पडून त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा भरगड यांनी काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा