farmers-protest-march-akola: दुष्काळ जाहीर करा; अन्यथा समृद्धी महामार्ग बंद करू- आमदार नितीन देशमुख यांचा राज्य सरकारला इशारा
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: विदर्भासह अकोला जिल्ह्यात गत दीड महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने काेणत्याही अटी-निकाषांशिवाय कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत घोषित करावी अन्यथा ५ ऑक्टोबर पासून समृद्धी महामार्ग बंद करण्याचा इशारा शिवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी राज्य सरकारला दिला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
अकोला जिल्हासह संपूर्ण विदर्भात पावसाने दडी मारल्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून तो कर्जबाजारी होण्याची भीती आहे. परंतु केंद्रासह राज्यातील सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी सोयर सुतक नसल्याचा आरोप करीत आमदार नितीन देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र डागले. महायुती सरकारकडून संभाव्य पाणी टंचाई, चारा टंचाईवर कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आराेप आमदार नितीन देशमुख यांनी केला.
यावेळी अकोला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, बुलढाण्याचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर ,ज्येष्ठ नेते सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनीही परखडपणे विचार व्यक्त करीत राज्य शासनाच्या नाकर्तेपणावर टीकेची तोफ डागली. माेर्चात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सेवकराम ताथाेड, माजी आमदार संजय गावंडे, संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, विदर्भ संपर्क संघटीका सागरताई पुरी, संपर्क संघटिका वैशाली घोरपडे, जिल्हा संघटिका प्रा. माया म्हैसने, डॉ. सरिता वाकोडे, प्रा. संतोष हुसे, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, दिलीप बोचे, योगेश्वर वानखडे, सुरेंद्र विसपुते, चंदू तिवारी, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, संजय शेळके, जिल्हा संघटक भूषण भिरड, बबलू देशमुख, शहरप्रमुख आशिष गावंडे (अकोला पश्चिम), राहुल कराळे (अकोला पूर्व),तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, ज्ञानेश्वर गावंडे, अविनाश गावंडे, संजय भांबेरे, सौरभ वाघोडे, गजानन मानतकर, गजानन चौधरी, रवी मुर्तडकर, शहरप्रमुख विनायक गुल्हाने, आनंद बनचरे, निरंजन बंड, मनोज खंडारे, उमेश राऊत, संगीता राठोड, कल्पना राहाटे, शुभांगी भटकर, चैताली लांडे, वर्षा पिसोडे आदी उपस्थित होते.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या
१) सरकारने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत द्यावी.
२) पीकविम्याचे पुर्वी असलेले ४ ट्रिगर रद्द केले आहेत. मात्र हे पूर्ववत करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
३) रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावी.
४) ज्याठिकाणी सिंचनाची सुविधा आहे; त्याठिकाणी कृषी पंपाचा वीजपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी २४ तास कर्मचारी उपलब्ध असावेत.
५) नियमित पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत २ लाख रूपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे.
६)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत पुनर्गठन केलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा.
७)जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा किंवा चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात.
असा निघाला माेर्चा
आक्रोश माेर्चाला स्वराज्य भवनाच्या प्रांगणातून सुरुवात झाली. माेर्चा शहीद मदनलाल धिंग्रा चाैक (मध्यवर्ती बस स्थानक), भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, पंचायत समितीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते. यामुळे काही काळ संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.
मोर्चाला संबोधित केल्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
माेर्चाचा मार्ग भगवामय
माेर्चाच्या मार्गावर भगवे झेंडे उभारण्यात आले होते. बॅनरच्या माध्यमातून दुष्काळाची दहाकता दाखवण्यात आली. माेर्चात बैलगाड्यांवर प्रमुख नेते हाेते. माेर्चात दींडीच्या गजरात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या लावून धरल्या. सुकलेले साेयाबीन घेत अनेक पुरुष व महिला शेतकऱ्यांनी आपला आक्राेश व्यक्त केला.
उद्योगपतींचे कर्ज माफ; शेतकऱ्यांची उपेक्षा
मागील बारा वर्षांच्या कालावधीत केंद्र व राज्य सरकारने देशातील अनेक बड्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले. यातील अनेकांना ४० टक्क्यांची सूट दिली. शेतकऱ्यांचा मुद्दा समोर आला की राज्य सरकारकडून अटी, निकष लावल्या जातात. पीक कर्जाची सक्तीने वसुली केली जाते. पीक कर्जाची रक्कम जमा न केल्यास शेतकऱ्यांना बँकांकडून प्रतिबंधित केले जाते. विद्यमान सरकार शेतकरी हिताचे नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा