drone-solar-power-plant-pdkv: अवघ्या 30 मिनिटांत 1 मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प स्वच्छ करणारा ड्रोन विकसित



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: स्थानिक नवोपक्रम आणि शाश्वत तंत्रज्ञानाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, इंडियन ड्रोन रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड, अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन (PDKV-RIF) कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय अंतर्गत सुरू असलेल्या स्टार्टअपने डॉ. एस. आर. काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी यांच्या मार्गदर्शनात एक अत्याधुनिक सौर पॅनल स्वच्छता करणारा ड्रोन विकसित केला आहे. हा ड्रोन फक्त 30 मिनिटांत 1 मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प स्वच्छ पाण्याने धुतला जाऊन सौर पॅनलवर असलेली धूळ साफ करू  शकतो.



Drone developed that can clean a 1 MW solar power plant in just 30 minutes



कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय डॉ.पंदेकृवि, अकोला येथे 600 किलोवाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहे. त्या पॅनलची स्वच्छता संबंधित कंपनीकडून होत असते. या सोलर पॅनलवर जास्त प्रमाणात धूळ साचल्यास त्याची कार्यक्षमता कमी होते व पर्यायाने कमी ऊर्जा निर्मिती होते. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प चांगल्या रीतीने कार्यक्षम ठेवण्यासाठी सौर पॅनल स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. बहुतांशी उभारण्यात आलेली पॅनल इमारतीच्या छतावर असते, त्यामुळे याची साफसफाई करणे जिकरीचे असते व  कठीण जाते, यावर एक उपाय म्हणून ही अभिनव कल्पना PDKV-RIF अकोलाचे संचालक डॉ. एस. आर. काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंडियन ड्रोन रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी  आशिष भास्कर हांडे यांच्या नेतृत्वात विकसित करण्यात आली आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे सौरऊर्जा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणारे हे तंत्रज्ञान साकार झाले आहे.


परंपरागत पद्धतीने सौर पॅनल्सची स्वच्छता करताना वेळ, मनुष्यबळ आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, या नव्या ड्रोनच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्णतः स्वयंचलित, अत्यंत कार्यक्षम व पर्यावरणपूरक झाली असून वेळ व संसाधनांचा मोठा बचाव होतो आणि सौर पॅनल्सच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होते.


“अशा प्रकारे ड्रोनचा सौर प्रकल्पांच्या देखभालीत वापर या क्षेत्रात क्रांती घडवेल,” असे मत आशिष भास्कर हांडे यांनी व्यक्त केले. “हा ड्रोन केवळ खर्च व पाण्याचा वापर कमी करत नाही, तर स्वच्छ पॅनल्सद्वारे ऊर्जा उत्पादनातही वाढ करतो. आमचे उद्दिष्ट भारताच्या स्वच्छ ऊर्जा अभियानाला स्वदेशी व शाश्वत तंत्रज्ञानाच्या मदतीने बळकटी देणे आहे.” व स्टार्टअपला तांत्रिक मार्गदर्शन देऊन त्याना प्रत्येक वेळेस मदत करून आपल्या भागात स्टार्ट अप इकोसिस्टम तयार करणे आहे, असे प्रतिपादन डॉ. काळबांडे यांनी केले.


ही कल्पना मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि हरित तंत्रज्ञानाचा प्रसार यांसारख्या राष्ट्रीय मोहिमांना चालना देते. या यशस्वी विकासामुळे आता हा ड्रोन प्रत्यक्ष वापरासाठी सज्ज असून देशभरातील सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये याला मोठी मागणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याची कुलगुरू डॉ शरद गडाख यांच्या नेतृत्वात व  मार्गदर्शनात अकोल्यातील PDKV-RIF सारख्या प्रादेशिक स्टार्टअप प्लॅटफॉर्म्समधूनही जागतिक दर्जाचे नवतंत्रज्ञान विकसित होत आहे याचे हे ठळक उदाहरण आहे.

 



आज ड्रोनद्वारे सोलर पॅनल स्वच्छ करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व यशस्वी चाचणी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे घेण्यात आली त्यावेळी विभाग प्रमुख डॉ सुचिता गुप्ता, डॉ एम एम देशमुख, डॉ प्रमोद बकाने, डॉ अनिल कांबळे, धीरज कराळे, डॉ मृदुलता देशमुख व इतर सर्व प्राध्यापक  व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या