palm-sunday-celebrate-akola: अकोल्यात पाल्म संडे भक्तिभावाने साजरा; कॉटेज प्रेयर, प्रार्थना सभांचे आयोजन



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: वधस्तंभावर खिळले जाण्यापूर्वी सहा दिवस अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेम शहरात जयोत्सवाने प्रवेश झाला. त्या दिवसाची आठवण म्हणून संपूर्ण जगभरात आजचा रविवार हा पाल्म संडे म्हणून साजरा करतात. याला झावळ्यांचा रविवार असेही म्हणतात. अकोला शहर आणि जिल्ह्यातही आज हा सण भक्तिभावाने साजरा करण्यात आला.



5 मार्चपासून ख्रिश्चन धर्मियांच्या लेंथ या पवित्र महिन्यास सुरुवात झाली. दरवर्षी या पवित्र महिन्यात ख्रिश्चन धर्मीय घरोघरी कॉटेज प्रेयरचे आयोजन करतात. पाल्म संडेच्या दिवशी सकाळी  विदर्भातील एकमेव अशा ख्रिश्चन कॉलनी मधून झावळ्या हाती घेऊन आबालवृद्धांनी मोठी दिंडी काढली. यावेळी '' होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादीत असो'' अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.  




अकोला शहरातील आठ आणि जिल्ह्यातील सुमारे 30 चर्चेस मधून आज प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सॅव्हीअर्स अलायन्स चर्च मध्ये रेव्हरंड निलेश अघमकर यांनी बायबल मधील वचनांच्या आधारे संदेश दिला. 


यावेळी विविध धार्मिक गीते सादर करण्यात आली. संडेस्कूलच्या मुलांनी तसेच महिलांनी यावेळी विशेष गीते सादर केली. हातात झावळ्या घेऊन पाल्म संडे जगाचे अशांततेपासून संरक्षण व्हावे, सर्वत्र शांतता, बंधुभाव नांदावा अशी प्रार्थना करून भक्तिभावाने साजरा करण्यात आला.




येत्या शुक्रवारी 18 एप्रिल रोजी प्रभू येशूच्या वधस्तंभावरील बलिदानाची आठवण म्हणून गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण जगभरात भक्तीभावाने साजरा करण्यात येईल. यावेळी बायबल अभ्यासक प्रभू येशूच्या वधस्तंभावरील सात वाक्यांवर प्रकाश टाकतील. त्यानंतर 20 एप्रिल रोजी रविवारी संपूर्ण जगभर ईस्टर संडे अर्थात प्रभू येशू यांचा पुनरुत्थान दिन मोठ्या उत्साहात चर्चेसमध्ये साजरा करण्यात येईल. यावेळी प्रार्थना सभेसोबतच इतरही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रेव्हरंड निलेश अघमकर, जस्टिन मेश्रामकर, सरला मेश्रामकर, अरविंद बिरपॉल, अजय वर्मा, राजेश ठाकूर, अमित ठाकूर, चंद्रकांत ढिलपे यांनी दिली आहे.

टिप्पण्या