earth-decoration-day–2025-ak: पृथ्वीच्या सन्मानार्थ राजेश्वर मंदिरात साकारली भव्य रांगोळी; संस्कार भारतीने साजरा केला भू-अलंकरण दिन



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे - जगड 

अकोला: पृथ्वीविषयी आदर, सन्मान व आत्मीयता प्रकट करण्यासाठी भू - अलंकरण दिवस दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. यादिवसाचे औचित्य साधून संस्कार भारती अकोला महानगरच्या वतीने प्राचीन श्री राज राजेश्वर मंदिरात भव्य रांगोळी साकारण्यात आली. 


संस्कार भारतीच्या टीमने 21 एप्रिल रोजी सायंकाळी या रांगोळी रेखटनाला सुरूवात करण्यात आली होती. उशिरा रात्री ही रांगोळी पूर्ण झाली. आज पहाटे पासून ही रांगोळी भाविक व कलाप्रेमी नागरिकांना पाहता यावी यासाठी खुली करण्यात आली. मोठ्यासंखेने नागरिकांनी रांगोळी पाहण्यास उपस्थिती लावली होती.




भु-अलंकरण विधा प्रमुख भाऊलाल देवतवाल आणि सह प्रमुख शितल जाट, महानगर प्रमुख मंगेश श्रीवास, राजेश्वर टाले, विभा जोशी आदींनी रांगोळी साकारली. अकोला जिल्हा अध्यक्ष चंदा जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत  रांगोळी रेखाटन कार्यक्रम संपन्न झाला.

अकोला महानगर अध्यक्ष डॉक्टर आर. बी. हेडा यांनी यावेळी भेट दिली. संस्कृती संवर्धन समितीचे राम भिरड यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी राजेश्वर मंदिरचे विश्वस्त व सद्भावना अकोला जिल्हा प्रमुख गजानन घोंगे   आणि सह व्यवस्थापक गजानन खत्री यांचे विशेष सहकार्य लाभले.


'आपली सुंदर पृथ्वी तिचे रक्षण करू या तिची समृध्दी वाढवू या तिला अधिक सुंदर करू या ' असा संदेश रांगोळीच्या माध्यमातून कलावंतांनी दिला. 



भारतीय संस्कृतीत रांगोळी ही कला प्राचीन कला आहे. जमिनीवर रांगोळी रेखाटली जाते. ही कला म्हणजे आपल्या धरणी मातेचे आभूषण, अलंकार मानल्या जाते. ही कला जगभरात प्रामुख्याने भारतात अधिक जोपासली जाते. या कलेची संपूर्ण जगभरात ओळख निर्माण करण्यात संस्कार भारतीचा सिंहाचा वाटा आहे. आजही भारतातील अनेक गावात, शहरात सकाळी सुर्योदय झाला की घरासमोरच्या अंगणात रांगोळी काढली जाते. फ्लॅट संस्कृती मध्येही ही कला आवडीने जपल्या गेली आहे.



भू-अलंकरण दिन साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे याच दिवशी जागतिक वसुंधरा दिन संपूर्ण जगात साजरा केला जातो. यानिम्मित आपल्या पृथ्वीविषयी आदर, सन्मान व आत्मीयता प्रकट करण्याचा हा भू अलंकरण दिवस साजरा करण्याचा मानस संस्कार भारती या संस्थेने 2017 साली मांडला होता. 


 

अशी झाली सुरवात 

दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस  

भू-अलंकरण (रांगोळी) दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याची सुरुवात  22 एप्रिल 2017 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे संस्कार भारतीचे अखिल भारतीय रंगावली विद्या प्रमुख रघुराज देशपांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. याचदिवशी पुण्यासह संपूर्ण देशभरात 28 राज्यांमध्ये हा दिवस भू-अलंकरण ( दिन म्हणून साजरा झाला. तत्पूर्वी 7 एप्रिल 2017 रोजी म्हैसूर येथे आयोजित संस्कार भारतीच्या अखिल भारतीय बैठकीत पहिल्यांदा भू-अलंकरण दिनाची संकल्पना मांडण्यात आली. त्यानुसार 22 एप्रिल हा दिवस भू-अलंकरण दिन म्हणुन साजरा करण्याचे आवाहन केले गेले. याच बैठकीत 2017 या वर्षीच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले होते. यावेळी प्रसिद्ध चित्रकार व संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष  वासुदेव कामत यांच्यासह सर्व प्रांतांतील महामंत्री उपस्थित होते.




"जागतिक वसुंधरा दिन या दिवशी आपल्या वसुंधरेला रांगोळी सारख्या विलोभनीय अशा अलंकाराने नटवणे  म्हणजेच भू-अलंकार (रांगोळी) या प्राचीन कलेचा सन्मान करण्यासारखे आहे."

प्रा. निनाद कुळकर्णी

प्रांतमंत्री

संस्कार भारती 



टिप्पण्या