भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: सध्या भुईमूग पीक वाढीच्या अवस्थेत असून पिकाची काढणी काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने केल्यास, गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळवता येईल. शेंगा पक्व झाल्यानंतर भुईमूगाची पान पिवळी पडतात आणि पानगळ सूरु होते. पक्वता किती आहे हे पाहण्यासाठी भुईमूग उपटून पहावा पक्य झाल्यानंतर शेंगाचे टरफल टणक होते, शिवाय काही जातीनुसार आतून काळे पडते. शेंगदाण्याचा रंगही बदलतो. एका झाडावरील सरासरी ७५ टक्के शेंगा पक्व झाल्यास भुईमुग काढणीस आला असे समजावे. योग्य पक्वतेच्या भूईमूगाची काढणी न केल्यास शेंगांच्या उत्पादनात लक्षणीय घट येत असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ तर्फे देण्यात आली आहे.
भूईमूग काढणीच्या काळात जमिनीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त ओल असल्यास शेंगांना जागेवरच मोड येतात. अनेकवेळा ५० टक्क्यापर्यंत सुद्धा नुकसान झाल्याची नोंद आहे.
भुईमुग काढणीच्या वेळी भुईमुग झाड उपटणे आणि शेंगांची तोडणी करणे ही महत्वाची काम असतात. काढणी करताना जमिनी पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. जमीन टणक असल्यास बैलचलीत यंत्राचा वापर करावा.
काढणी केलेल्या शेंगा, काढणीपश्यात ढीग करून न ठेवता लगेचच जमिनीवर त्याचा कमी जाडीचा थर पसरवावा व शेंगा उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्यात. शेंगांमधील पाण्याचं प्रमाण ७ टक्के पर्यत आल्यानंतर सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण नऊ टक्के पेक्षा अधिक असल्यास अस्पर्जीलस नावाच्या बुरशीची वाढ होऊन अफ्लाटोक्सीनची निर्मिती होते. परिणामी बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. तसेच प्रादुर्भाव झालेले दाणे खाल्यास कर्क रोग सारखे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता आढळून आली आहे.
शेंगाची साठवणूक करीत असताना साठवणूकीची खोली किंवा कोठी स्वच्छ असावी, आतल्या बाजूस पांढरा रंग किंवा चुना दिला तर त्या कोठारामध्ये साठवणुकीतील अन्य किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी होते. कोठारामध्ये शेंगा ठेवताना पोत्यामध्ये भरून ठेवाव्या, प्रत्येक महिन्यात तपासणी करावी.
भुईमुगाच्या पाला जनावरांचे खाद्य म्हणून वापरला जातो. मात्र, त्यासाठी पाला वापरताना तो भिजणार नाही याची काळजी घ्यावी. ओलाव्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊन जनावरे आजारी पडू शकतात. भुईमुगाचा पाला उन्हात चांगला वाळवून घ्यावा त्यानंतरच जनावरांना खाऊ घालावा, असा सल्ला तेलबिया संशोधन विभाग आणि वनस्पती रोग शास्त्र विभाग, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांचे कडून देण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा