wadegaon-gram-panchayat-a: वाडेगांव ग्रामपंचायतचे 'नगरपंचायत' मध्ये रूपांतर लवकरच !




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यातील वाडेगाव (ता.बाळापूर) या ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर करण्याबाबतच्या हालचाली शासन स्तरावर सुरू असून, लवकरच वाडेगांव ग्रामपंचायतचे 'नगरपंचायत' मध्ये रूपांतर लवकरच होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.



महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अकोला जिल्ह्यातील वाडेगाव ता. बाळापूर या ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर करण्यासाठी सदर गावात नगरपंचायत स्थापन करणे शक्य आहे किंवा कसे? असल्यास महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या तरतूदीनुसार अभिप्रायासह परिपुर्ण प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह शासनास सादर करण्यात यावा, अश्या आशयाचे पत्र महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अवर सचिव जयंत वाणी यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना पाठविले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.



अकोला जिल्ह्यातील वाडेगाव प.सं. बाळापूर ही ग्रामपंचायत सर्वात मोठी आहे. वाडेगाव हे गाव राज्य महामार्ग १९८ वर बाळापूर व पातूर याच्या मधात आहे.  सन २०११ च्या जनगणेनुसार वाडेगाव ग्रामपंचायतची लोकसंख्या १८,२५७ (अठरा हजार दोनशे सत्तावर्ण) आहे. ग्राम पंचायत वाडेगाव च्या प्रमाणपत्रा नुसार आज रोजीची अंदाजे लोकसंख्या ४०,००० (चाळीस हजार) एवढी आहे. १८,९०० च्या वर मतदाराची संख्या आहे. आज घडीला वाडेगाव पूर्ण गाव मिळून जिल्हा परिषदेचा एक गट व दोन पंचायत समितिचे दोन गट एकाच गावात आहेत.



गावात अकृषक रोजगाराची टक्केवारी ५९.४८ टक्के आहे. प्रस्तावित नगर पंचायत मध्ये मोठे उद्योग आहेत. १३२ के. व्ही. विदयुत केंद्र, वेअर हाउस, दालमील, ऑईलमील, स्वामिल गृह उद्योग, शाळा, महाविदयालये, प्रशस्त बाजारपेठ लिंबूची स्वतंत्र बाजार पेठ, कृषि उत्पन्न बाजार समीती बाळापुर (उपबाजारपेठ), राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, पोलीस औट,  पोस्ट ऑफिस, प्राथमीक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय बीएसएनएल केंद्र, पेट्रोल पंप, मंगल कार्यालय, मोबाइल टॉवर, खाजगी दवाखाने, हॉस्पीटल, मेडीकल, आठवडी बाजार, पशुवैदयकीय दवाखाना, गुरांचा बाजार, कोंडवाडा, कापड बाजार आहे. तसेच भाविकांची अनेक श्रध्दास्थाने धार्मीक स्थळे आहेत. 


बाळापूर तालुक्यातील वाडेगाव हे शेकडो लहान मोठ्या गावांच्या लाखो लोकांसाठी मुख्य व्यापार केंद्र आहे. अकोला २९.०० किलो मीटर जिल्ह्याचे ठिकाण. तर बाळापूर १३.०९ किलो मीटर तालुक्याचे ठिकाण. आणि पातूर १८.०० किलो मीटर तालुक्याचे ठिकाण आहे.


प्रस्तावित नगर परीषद क्षेत्रामध्ये इतर कोणत्याही ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे वाडेगाव क्षेत्राला नगर पंचायतचा दर्जा देण्याकरीता ग्राम पंचायत वाडेगाव कार्यालयाची कोणतेही हरकत नाही.  वाडेगाव ता. बाळापूर ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव शिवसेना युवासेना महाराष्ट्र राज्य सचिव  विट्ठल सरप पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २५ फेब्रुवारी रोजी सादर केला होता. हा प्रस्ताव तपासून त्यावर तात्काळ प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागास दिले होते. यानंतर १७ मार्च रोजी अकोला जिल्हाधिकारी यांना एका पत्राद्वारे, अकोला जिल्ह्यातील वाडेगाव या गावात नगरपंचायत स्थापन करणे शक्य आहे किंवा कसे? असल्यास महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या तरतूदीनुसार आपल्या अभिप्रायासह परिपुर्ण प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह शासनास सादर करण्यात यावा, असे सांगितले आहे. त्यामुळे वाडेगांव ग्रामपंचायतचे 'नगरपंचायत' मध्ये रूपांतर होण्यास लवकरच हिरवी झेंडी मिळणार, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

 








टिप्पण्या