ठळक मुद्दा
आवाज आज आहे, उद्या नसणार पण आयुष्यात श्रोत्यांचे मिळालेले प्रेम कधीही कमी होणार नाही, याची मला खात्री असल्याचे सीमा शेटे म्हणाल्या.
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: नियतीचं गूढ कोणालाही उमजलं नाही. सीमा शेटे-रोठे यांचे आज नागपूरला अकाली निधन झाले. निधनाची वार्ता कळताच प्रथम विश्वासाचं बसला नाही. मात्र ही वार्ता खरी आहे. सीमाताईंचा मृदू स्वभाव, लाघवी बोलणं…सारं काही एका क्षणात झरझर आठवत गेले. अकोला आकाशवाणीच्या प्रथम उद्घोषिका, साहित्यिक म्हणून सीमाताई यांनी आपली ओळख निर्माण केली पण फार कमी लोक जाणतात त्यांनी त्याहीपूर्वी अकोला येथील दैनिक देशोन्नती मध्ये पत्रकारिता देखील केली होती. आमची भेट झाली की एकदा तरी हा विषय निघत होता. त्यावेळीची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता याबद्दल त्या सांगत असत. अनेक गमतीशीर किस्से देखील त्या शेअर करीत असत.
बाबूजी देशमुख वाचनालय नवरात्र व्याख्यान मालेत नऊ दिवसही त्या हजेरी लावत असत. आम्ही बातमी पुरता मुद्दा मिळाला की, ऑफिसकडे निघायचो. मात्र सीमाताई संपूर्ण व्याख्यान आपल्या वहीत लिहून काढत होत्या. एखादा वेळी व्याख्यानाची बातमी करताना एखादा मुद्दा लिहत असताना अडखळला की सीमाताईंना फोन केल्यावर लगेच त्या पूर्ण मुद्दा जसाच्या तसा सोप्या भाषेत सांगायच्या. सीमाताई यांच्या सोबतच्या असंख्य आठवणी आहेत.
बाबूजी देशमुख वाचनालय नवरात्र व्याख्यान मालेत समीरण वाळवेकर आले असता त्याक्षणी टिपलेले छायाचित्र.
सन 2023 मध्ये सीमाताई यांची अकोला आकाशवाणी वर्धापन दिन निम्मित नीलिमा शिंगणे जगड यांनी घेतलेली मुलाखत जशीच्या तशी येथे देत आहोत.
आकाशवाणी अकोलाने 'सीमा शेटे' नावाला दिलं वलय!
कधी तरी अचानक एखादी गोष्ट, कुणी व्यक्ती, कोणती संस्था आपल्या आयुष्यात येते आणि आपलं आयुष्यच बदलून जातं. अशातच एक दिवस नव-याने बातमी आणली, अकोल्याला आकाशवाणी केन्द्रात अस्थायी उदघोषकांचा शोध सुरु आहे. दुस-याच दिवशी अर्ज केला. परिक्षा वगैरे सोपस्कार होऊन, आकाशवाणी अकोला केन्द्राची पहिली अस्थायी उदघोषक म्हणून मला संधी मिळाली. १९९० सालातली साधारणतः ही गोष्ट आहे. आजही ते पत्र मी जपून ठेवले आहे. तेंव्हा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ही नेमणूक आपल्या आयुष्यात किती बदल घडविणार आहे, अश्या आठवणीत आकाशवाणी अकोला केंद्राच्या पहिल्या अस्थायी उदघोषक सीमा शेटे - रोठे रममाण झाल्या होत्या.
अकोला आकाशवाणी केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त सीमा शेटे रोठे यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी दिलखुलास आपल्या कसोटीच्या आणि फजितीच्याही आठवणी आमच्या (नीलिमा शिंगणे जगड) सोबत शेअर केल्या.
उदघोषक म्हणून काम करताना अनेक जबाबदा-या आनंदाने पार पाडल्यात. कधी निवेदन, कधी मुलाखती, कधी निर्मिती सहाय्य, संकलन तर कधी मालिका लेखन. 'आकाशवाणी अकोला' ही संस्था माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. 'सीमा शेटे' या नावाला वलय, सन्मान प्रदान करण्यात या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. आवाज आज आहे, उद्या नसणार पण आयुष्यात श्रोत्यांचे मिळालेले प्रेम कधीही कमी होणार नाही, याची मला खात्री असल्याचे सीमा शेटे म्हणाल्या.
आमचे अनेक श्रोते आहेत, ज्यांची नावं, गावं, कुटुंब सगळं सगळं आम्हाला पाठ झालं आहे. केवळ आवाजावर प्रेम करून आईपण बहाल करणारे, भावाची माया देणारे हे श्रोते. त्यांच्या प्रेमाची उतराई आम्ही कसे होऊ? तेल्हारा, आकोट, अकोला, मुर्तिजापूर, वाशीम, कारंजा, बुलढाणा इतकंच काय तर अमरावतीतही गेलं तरी प्रत्येक गावाची पाटी वाचताच तेथील श्रोत्यांची नावं झरझर डोळ्यापुढे येतात. इतकी ती आम्हाला तोंडपाठ आहेत,असे सीमा शेटे यांनी सांगितले.
आकाशवाणीने मला काय दिलं? तर आकाशवाणीने गाण्याची समज वाढवली. आकाशवाणीने संगीताचा कान तयार केला. आकाशवाणीने शब्दांचा काटेकोर वापर शिकवला. आकाशवाणीने सर्वधर्म समभाव अंगी भिनवला. इतकंच नव्हे तर सकारात्मक दृष्टीकोन आकाशवाणीनेच प्रदान केला ,असे सीमा शेटे म्हणाल्या.
माझा आणि आकाशवाणीचा जवळ जवळ २८ वर्षाचा हा ऋणानुबंध आहे. आकाशवाणी अद्याप तरूण आहे पण मी थकले. आणि एका टप्प्यावर थांबले. वयाची पन्नाशी पूर्ण करताना आपण उदघोषक म्हणून थांबायचे, हे मी ठरवले होते आणि तसेच केले. आकाशवाणी करिता तयार केलेले कार्यक्रम ही माझी संपत्ती आहे. त्यात, 'बहिणाबाई मालिका', 'गाव कारागीर' यांचा अग्रक्रम आहे.
दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळे केलेले प्रयोग आठवणीत आहेत. दिवाळीत केलेला विशेष हंगामा कार्यक्रम असो की फोनवर घेतलेल्या सिने कलावंतांच्या मुलाखती असोत अथवा शास्त्रज्ञ गोवारीकर यांची मुलाखत असो. खूप काही करता आले, असे सीमा शेटे म्हणाल्या.
… निःशब्द…
भारतीय अलंकार न्युज 24 परिवार तर्फे सीमाताई शेटे रोठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
मुख्य संपादक
भारतीय अलंकार न्यूज 24
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा