political-news-shiv-sena-akola: अबु आझमी यांचे वादग्रस्त विधान: अकोल्यात शिवसेना ठाकरे गट आणि समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आमने-सामने



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांना औरंगजेबाचं समर्थन करणं चांगलंच भोवलं आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असं वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोमवारी विधिमंडळ परिसरात केलं होत. त्यांच्या या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान अबू आझमी यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यातही ठाकरेंच्या शिवसेनेकडून अबू आझमी यांच्या विरोधात शेण फेको आंदोलन करण्यात आलं.



यावेळी अबू आझमी यांच्या फोटोला शेण फासत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अबू आझमींनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली आहे. मात्र हे आंदोलन सुरू असताना समाजवादी पक्षाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी या आंदोलनाला विरोध करत अबू आझमी यांचा फोटो खाली काढण्याचा प्रयत्न केला असता, ठाकरे गट आणि समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आमने-सामने झाले.  



यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. मात्र यावेळेस हे सर्व सुरू असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेश मिश्रा आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. 



तर अबू आजमी यांच्या विरोधात आंदोलन म्हणजे हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचाही यावेळी समाजवादी पक्षाचे महानगर अध्यक्ष इब्राहिम खालिद यांनी म्हटलं आहे.




टिप्पण्या