leopard-skin-smuggling-case: बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपीचा जमानत अर्ज न्यायलयाने फेटाळला; आरोपींचे संबंध नेपाळ मार्गे चीनपर्यंत!




ठळक मुद्दा


महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी केलेल्या कार्यवाहीमध्ये आरोपींचे संबंध नेपाळ मार्गे चीनपर्यंत आढळले आहे. 




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोट येथे संरक्षीत वन्यप्राणी बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारा आरोपी आशिष सिकची याचा जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाने आज फेटाळला. 



अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश  बी.एम. पाटील यांनी वनविभाग वनपरिक्षेत्र उपविभाग, अकोला यांचे फाईल वरील अपराध क्र. ०१२७७/०१  २७.०१.२०२५ वन्यजीव (संरक्षण कायदा) १९७२ चे कलम ३९,४० (२),४४(अ) (१), ४८ (अ),४९,५०,५१ कायद्यामधील आरोपी आशिष कन्हैयालाल सिकची, वय ३५ वर्ष, राहणार नवाप्रेस अकोट ता. अकोट जि. अकोला याने दि. २७.०१.२०२५ रोजी दुपारी ३ वाजता कापडामध्ये छोटया प्लास्टीकच्या पोतडीमध्ये बिबट प्राण्यांची कातडी मोटर सायकल क्र. एमएच ३० बी.पी. १०२८ द्वारे वाहतूक करून अकोला अकोट रोडवर नंदकिशोर सिकची यांना दिल्याच्या प्रकरणात दाखल केलेला जमानत अर्ज  अकोट सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. 



या आरोपीला अकोट येथील वनविभाग अधिकाऱ्यांनी दि. २७.०१.२०२५ रोजी या गुन्हयामध्ये अटक केली असून, हा आरोपी अकोला कारागृहात बंदीस्त आहे.




या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानत अर्जाला विरोध करतांना न्यायालयात लेखी उत्तर व युक्तीवाद सादर केला की, अकोला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि.आर. थोरात यांच्या फिर्यादीवरून  एकूण ८ आरोपींविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला. 



या प्रकरणांची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. २७.०१.२०२५ रोजी आनंदवाडी अकोट येथील ब्रिजच्या खाली अकोट ते अकोला रस्त्यावर वन्यप्राणी बिबटची कातडी वाहन क्र. एमएच ३० बीपी १०२८ द्वारे वाहतूक केली जात आहे. यावरून सापळा रचला असतांना या प्रकरणात आरोपी आशिष कन्हैयालाल सिकची तसेच नंदकिशोर सिकची व राजकुमार सिकची या तिघांना पकडून ताब्यात घेतले व त्यांची झडती घेतली असता तेथे बिबट प्राण्यांची कातडी तसेच हिरोहोंडा स्लेंडर एमएच ३० बीपी १०२८ व विवो कंपनीचे दोन मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. वनविभागाचे कायद्यांतर्गत बिबट प्राणी हा अनुसूची १ मध्ये अंतर्भूत आहे. व या वन्य प्राण्यांच्या संबंधीत सर्व वन गुन्हे हे अजामीनपात्र गुन्हे आहेत. 



या गुन्हयातील मुख्य आरोपी राजकुमार सिकची यांचा हा आरोपी आशिष पुतण्या असून, या गुन्हयात त्याचा सहभाग आढळून आला आहे. तसेच सहायक वनसंरक्षक तथा सक्षम अधिकारी यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ५० (८) (ड) नुसार आरोपी आशिष सिकचीचा कबुली जबाब घेतला असता, त्याने या गुन्हयात वन्यप्राणी बिबटची कातडीची वाहतूक करून, तस्करी केल्याचे मान्य केले आहे. तसेच वनविभागाच्या तपासामध्ये आरोपी आशिष सिकची हा एक सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर इतर पोलीस गुन्हे देखील दाखल आहेत. या गुन्हयात परराज्यातील मुख्य आरोपी लक्की सिंग उर्फ आशिष सिकची हा वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा सदस्य असून, ही टोळी आंतरराज्यीय स्तरावर सक्रिय असून, त्याचे जाळे राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात राज्यात पसरले असून, तपासात यातील आरोपींचे संबंध इतर राज्यातील टोळींशी असल्याचे आढळले आहे. महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी केलेल्या कार्यवाहीमध्ये आरोपींचे संबंध नेपाळ मार्गे चीनपर्यंत आढळले आहे. 



सदर गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. व या प्रकरणाचा तपास चौकशी अधिकारी सहायक वनसंरक्षक श्री. एस.के. खूने हे करित असून, तपास अजून पूर्ण झालेला नाही. जोपर्यंत गुन्हयाचा उलगडा होत नाही, तसेच फरार मुख्य आरोपीचा शोध लागत नाही, तोपर्यंत सदर आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा. या आरोपीचा जामीन मंजूर झाल्यास फरार आरोपीचा शोध घेणे शक्य होणार नाही. तसेच तपास कार्यात अडथळा निर्माण होईल व आरोपीला वन कायद्याचा धाक राहणार नाही व त्याबरोबर जनमानसामध्ये वन्य प्राण्यांच्या संरक्षणाबाबत चुकीचा संदेश जाईल. या गुन्हयाची महत्वाची माहिती फरार आरोपी यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीमध्ये समोर येईल. त्याकरिता या आरोपीचा जमानत अर्ज नामंजूर करण्यात यावा व त्याला कारागृहातच बंदीस्त ठेवावे असा युक्तीवाद वनविभागातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपी आशिष सिकची याचा जमानत अर्ज नामंजूर केला.




टिप्पण्या