holi-celebrated-with-joy-gaiety: अकोल्यात हर्ष उल्हासात होळी साजरी; पारंपारिक पद्धतीने होलिका दहन, रंगांची उधळण करीत रंगउत्सवाचा लुटला आनंद




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : होळीची धूम देशभरात सुरू झाली आहे.  रंगीबेरंगी रंगांची उधळण करत रंगउत्सवाचा आनंद सर्वजण लुटत आहे. अकोल्यातही धुळवडचा आनंद पाहायला मिळत आहे.


शहरात अनेक ठिकाणी रंग उत्सवाला सकाळपासूनच सुरुवात झाली. शहरातील मुंगीलाल शाळेच्या परिसरात जय श्रीराम ग्रुप तर्फे नैसर्गिक रंगांच्या होळीचे आयोजन करण्यात आलं होतं.



 गाण्याच्या तालावर थिरकत सर्वांनी होळीचा आनंद लुटला. श्रीराम समूहा तर्फे गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक रंगांच्या होळीच आयोजन करण्यात येत आहे. 


यामध्ये शहरातील नामवंत प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून आनंद लुटला. तर एकमेकांवर रंगांची उधळण करत एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.



आयोजनाला यशस्वी करण्याकरिता जय श्रीराम ग्रुपचे अध्यक्ष अशोक गुप्ता , नरेंद्र राठी , पवन केडिया , राजू गाडगे , राजेश जैन , अभय पांडे यांनी अथक परिश्रम घेतले.



बालाजी विद्यामंदिर कॉन्व्हेंट मलकापुर येथे चिमुकल्या विद्यार्थी बालागोपालांनी होळी उत्सवाचा जल्लोष केला.






श्री राणीसती दादी मंदिरात 'भक्त प्रल्हाद व होलिका दहन' देखावा


रूढी व प्रथेनुसार सायंकाळी  ठिकठिकाणी होळी प्रज्वलित करण्यात आली. श्री राणीसाती दादी मंदिरातील 27 वर्षाची परंपरा लाभलेला 'भक्त प्रल्हाद व होलिका दहन' देखावा यावर्षी देखील साकारण्यात आला. देखावा पाहण्यासाठी अकोलेकरानी गर्दी केली होती.



गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास मंदिर तसेच सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन करण्यात आले. तर घरगुती होळी रात्री 11: 26 ला दहन करण्यात आली. लाकूड, शेण गवऱ्याच्या साह्याने होळी उभारण्यात आली. पुरणपोळी आणि वड्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. नारळ, साखरेच्या गाठी, चाकोल्याची माळ, समिधा अर्पण करून विधिवत पूजन करून होळी प्रज्वलित करण्यात आली. पुजाऱ्यांच्या हस्ते देवाची होळीचे पूजन करुन मानवा सह सर्व सजीवांचे कल्याण होवो, अशी प्रार्थना करण्यात आली.  


प्रमुख मंदिरात झाले पूजन


श्री राणी सती धाम मंदिर, सालासर बालाजी मंदिर, राज राजेश्वर मंदिर, जयहिंद चौक मधील लक्ष्मी नारायण मंदिर, मुरली मंदिर, डाबकी रोड हनुमान मंदिर ,बिर्ला मंदिर, मोठे राम मंदिर, छोटे राम मंदिरासह  घरोघरी आणि चौका चौकात होलिका दहन करण्यात आले.


भक्त प्रल्हाद आणि होलिका दहन 


राणी सती दादी मंदिरात होलिका दहन आकर्षक देखाव्याची 27 वर्षापासूनची ही परंपरा. भक्त प्रल्हादाची प्रतिमा होलिका सोबत बसवण्यात येते. त्यानंतर भक्त प्रल्हाद सुखरूप अग्नीतून बाहेर येतात; आणि होलिका जळून राख होते, असा देखावा साकारला जातो. यावर्षी देखील ही परंपरा कायम ठेवली.


होलिका दहन कथा


पूर्वी राक्षसकुळाचा हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता.  प्रल्हाद दिवस-रात्र श्री विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.  अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होणार नव्हता; तसा तिला देवांकडून  वर प्राप्त  होता. यासाठी हिरण्यकश्यपूने लाकडी चिता रचली.  आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतू, याच क्षणी प्रल्हाद आपल्या इष्टदेवतेचा जप करू लागला. प्रल्हादाच्या या भक्ति साधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली तर श्रीविष्णू भक्त असलेले प्रल्हाद या अग्नीदिव्यातून सुखरूप बाहेर आले. प्रल्हादाच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू खांबातून प्रकट होवून नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध करतात, अशी कथा यावेळी सांगून देखावा साकारला जातो. दरवर्षी हा देखावा पाहण्यासाठी अकोलेकर गर्दी करतात.


अकोल्यातील मुख्य बाजार पेठ गांधी रोड येथे होळी धुळवडसाठी साहित्य खरेदीची काल दिवसभर नागरिकांची  लगबग पाहायला मिळाली. 


तर चिमुकले रंगोत्सवासाठी पिचकारी खरेदी करताना दिसत होते.


अकोल्यातील गीता नगर स्थित श्रीरामदेव बाबा व श्रीखाटूश्याम मंदिरात फागुन उत्सव सुरू आहे. यानिमित्त श्रीखाटूश्याम मूर्तीला आकर्षक रंगी बेरंगी फुलांनी आणि सुखामेवाच्या हारांनी सजविण्यात आले आहे. ही सजावट पाहण्यासाठी भाविक गर्दी करीत आहेत. 



Fagun Utsav in Akola Maharashtra video पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

टिप्पण्या