- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
attack-on-senior-journalist: वरिष्ठ पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला; बेढरलेल्या युवकांना खाकीचा हिसका दाखविणे अत्यंत गरजेचे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: वरिष्ठ पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर काल रात्री ते कार्यालयीन कामकाज आटोपून घरी जात असताना कौलखेड रोड एस. टी. वर्क्स शॉपच्या बाजूच्या रस्त्यावर तीन ते चार युवकांनी अचानकपणे “पूर्वनियोजित" असल्याप्रमाणे "प्राणघातक हल्ला" केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून ते सुखरूप बचावले असून, त्यांना किरकोळ जखमा व मुका मार लागला आहे. काल रात्रीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, सध्या त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. दरम्यान आज सकाळी खदान पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार नोंदविण्यात आली.
अशी घडली घटना
काल बुधवार 19 मार्च रोजी दैनिक अजिंक्य भारतचे गुन्हेवार्ता पत्रकार विट्ठल महल्ले हे कार्यालयातून आपले काम आटोपून रात्री 11 वाजताच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले. दरम्यान, खदान पोलिस स्टेशनच्या परिसरातील एस. टी. वर्क्स शॉपच्या मागे बाजूला असलेल्या रस्त्याने जात असताना अचानक तीन ते चार अज्ञात युवक त्यांच्या वाहनासमोर येऊन उभे राहिले. त्यामुळे विठ्ठल महल्ले यांना आपली दुचाकी थांबविणे भाग पडले. त्यांनी त्या युवकांना रस्ता अडविण्याचे कारण विचारले असता, कोणतेही उत्तर न देता उलट त्यांनाच तू कोण आहेस.? काय करतोस.? असे प्रश्न विचारले. ते युवक हमरीतुमरीवर येत असल्याचे पाहून महल्ले यांनी खदान पोलिस स्टेशनच्या जबाबदार अधिकाऱ्याला मोबाईलवर घडलेला प्रकार सांगून कुणाला तरी घटनास्थळी पाठविण्याची विनंती केली, मात्र त्याच दरम्यान या युवकांपैकी दोघांनी त्यांच्या डोक्यावर असलेले हेल्मेट काढून घेतले आणि त्यांना म्हणाले की "तू कुणालाही बोलावले तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. पोलिस आमचे काय करणार आहे.? असे बोलून त्यांना एकेरी भाषेत अर्वाच्य शिवीगाळ करीतच महल्ले यांच्या हेल्मेटनेच त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. महल्ले यांनी सुद्धा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या युवकांपुढे त्यांचा प्रतिकार कमी पडला. महल्ले यांना ज्या हेल्मेटने मारहाण करण्यात आली त्या हेल्मेटचे अक्षरशः तुकडे तुकडे झालेले आहेत. इतकी अमानुष मारहाण करण्यात आली आहे. युवकांच्या मारहाणीतून कशीतरी सुटका करून घेतली. त्याच रस्त्याने मागून काही वाहने येत असल्याचे पाहून हल्लेखोरानी घटनास्थळाहून पळ काढला. यादरम्यान महल्ले यांनी समय सूचकता राखत हल्लेखोरांपैकी एकाचा फोटो मोबाईल फोन द्वारा काढला. यानंतर महल्ले यांनी आपले घर गाठले.
विठ्ठल महल्ले यांनी घरी गेल्यावर पुन्हा खदान पोलिस स्टेशनला झाल्या प्रकाराची माहिती दिली असता, कुणीतरी एक पोलिस उपनिरीक्षक त्यांच्या घरी विचारपूस करण्यासाठी आले आणि त्यांना प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. महल्ले यांना पाठीवर, पोटावर आणि डोक्यावर मारण्यात आले असून छाती व पोटावर त्यांना मुकामार लागला आहे. रात्रीचे तीन वाजल्याने पुढील तपासणी करता आली नाही. तसेच रात्र झाल्यामुळे त्यांची तक्रार देखील नोंदवायची राहिली असून ती आज गुरूवारी सकाळी नोंदविण्यात आली.
पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी
विठ्ठल महल्ले हे मनमिळावू वरीष्ठ नामवंत पत्रकार असून महाराष्ट्र बहुजन पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते अजिंक्य भारत या मराठी दैनिकात काम करीत असून त्यांच्या लिखाणाने त्यांनी चांगल्या चांगल्यांना घाम फोडला आहे. अशाच पैकी दुःखावल्या गेलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलल्या जात आहे.
अकोल्यातील सर्व पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आज सकाळी काही पत्रकार मंडळी त्यांच्यासोबत खदान पोलिस स्टेशनला घटनेची फिर्याद देण्यासाठी गेले होते. "पत्रकार संरक्षण कायद्या" अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा कायदा लागू झाला तेव्हापासून बऱ्याच पत्रकारांवर अशाप्रकारचे " पूर्वनियोजित हल्ले" करण्यात आले आहेत. परंतु आजपर्यंतही एकाही प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही ही "वास्तविकता" आहे. महल्ले यांनी मारहाणीची घटना घडण्यापूर्वीच पोलिसांना फोनवर माहिती दिली होती परंतु तरीसुद्धा त्यांना वाचविण्यासाठी कुणीच न आल्यामुळे त्या संबंधितावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी होत आहे.
खाकीचा हिसका
गेल्या वर्षभरापासून अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी पार विस्कटली असल्याचे उघड झाले आहे. अकोला रेल्वे स्थानक परिसरात मंगळसूत्र चोरट्यांनी पाठलाग करणाऱ्या युवकाची दगडाने ठेचून हत्या प्रकरण असो की कृषी नगर परीसरात विद्यार्थ्यांवर वारंवार होणारे जीवघेणे हल्ले… अश्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस विभागाने शहरात विनाकारण हुल्लडबाजी करणारे, रात्री अपरात्री फटाके फोडणारे, चौका चौकात वाढदिवस साजरा करणारे, लोकांची वाहने अडवून शास्त्राचा धाक दाखवून लुटणारे, गर्दीतून सुसाट आडवी तिडवी जागा मिळेल तिथून वाहन चालवणारे अश्या टारगट आणि बेढरलेल्या युवकांना खाकीचा हिसका दाखविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
तर कदाचित….
महल्ले यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांना फोनवर माहिती देऊनही खदान पोलिस स्टेशनचे एकही कर्मचारी वा गस्ती वाहन त्याठिकाणी अर्धा पाऊण तासातही आले नाही ही मात्र अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. पोलिसांनी लागलीच ॲक्शन घेतली असती तर कदाचित तिन्ही हल्लेखोर आज जेरबंद असते.
दारू पिऊन रस्त्यात रिल बनविणाऱ्यांचा हैदोस
अकोला शहरात पोलिसांचा गुन्हेगारांवर अजिबात वचक राहिला नसून सर्वत्र गुन्हेगारीचा हैदोस सुरू आहे. बुधवारी रात्री पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून भर रस्त्यात बसून रील बनवणाऱ्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
शहरात पोलिसांचा वचक न राहिल्याने रस्त्याच्या मधोमध गाड्या उभे करून केक कापणे, रिल्स बनविणे असे प्रकार सर्वत्र सर्रास बघायला मिळतात. पत्रकार विठ्ठल महल्ले रात्री आपली ड्युटी आटोपून घरी जात असताना रात्री अकरा वाजताच्या सुमारास खडकी परिसरातील डम्पिंग ग्राउंड नजीकच्या रस्त्यावर तीन युवक दारू पिऊन रील बनवत होते. जायला रस्ता तरी सोडा असे म्हटल्यावरून या बदमाश्यांनी महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. महल्ले यांच्या जवळीलच हेल्मेट हिसकावून घेत त्या हेल्मेटने त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. तिघांचा मुकाबला करत महल्ले यांनी कसेबसे आपले प्राण वाचवले. पोलिसांना फोन केल्यानंतर आरोपी पळून गेल्यानंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश आले नव्हते. रेल्वे स्टेशन वरून महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरून नेताना चोरट्याचा पाठलाग करताना पतीला ठेचून मारणाऱ्या चोरट्याचे प्रकरण ताजे असताना शहरात अशा हाणामारीच्या अनेक घटना घडत असल्याने अकोला पोलिसांचा गुन्हेगारांवर अजिबात वचक राहिला नसल्याचे यावरून दिसत आहे. पोलीस केवळ हप्ते वसुलीत दंग असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून पोलिसांकडून होणारी पेट्रोलिंग ही नावापुरती होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावरील हल्लेखोरांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर केलेल्या हल्ल्याच्या घटनेचा अकोला जिल्हा पत्रकार संघा तर्फे निषेध केला आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी अकोला जिल्हा पत्रकार संघाने केली आहे.
पालकमंत्री आणि आमदार यांनी घेतली दखल
आमदार रणधीर सावरकर आणि आमदार साजीद खान पठाण यांनी अकोल्यातील क्राइम व सामाजिक क्षेत्रातील कार्यरत पत्रकार बहुजन पत्रकार संघाचे नेते विठ्ठल महल्ले यांच्यावर झालेल्या हल्ल्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना आरोपींना जेरबंद करून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तर पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी सुद्धा या संदर्भात गंभीर दाखल घेतली आहे.
Akola
Attack
khadan police station
law and order
reel maker
restless youth
Senior journalist
social media
Vitthal Mahalle
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा