akola-crime-theft-in-apatapa: आपातापा येथे धाडसी चोरी: 13 क्विंटल तूर लंपास; चोरट्यांनी शेतकऱ्याच्या हातावर ठेवली तूर , पोर्च मध्ये ठेवलेला शेतमाल लुटून फुर्र...




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आपातापा (ता. अकोला) येथे अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घराच्या पोर्चमधून अंदाजे तब्बल 13 क्विंटल तूर चोरून नेल्याने 91 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवस-रात्र मेहनत करून शेतकरी पिकवलेल्या तुरीवर एका क्षणात चोरट्यांनी डल्ला मारला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.



ही घटना 3 मार्च रोजी रात्री 3 ते 4 वाजेदरम्यान आपातापा येथे घडली. प्रमोद बोपटे यांच्या घराच्या पोर्चमध्ये ठेवलेले अंदाजे 15 ते 20 कट्टे तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी तुरीसह दोन पिवळ्या रंगाचे तळव देखील लंपास केले.



आपातापा हे अकोला-अमरावती मार्गावर वसलेले असून, हा मार्ग मोठ्या वाहतुकीचा आहे. त्यामुळे रात्रभर ट्रक, वाहने आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते. एवढ्या रहदारीच्या ठिकाणीही ही चोरी घडल्याने, चोरटे निर्भय असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या महामार्गावर पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक आणि शेतकरी करत आहेत.



याप्रकरणी प्रमोद बोपटे यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोलिस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. मनोज उघडे, पो.कॉ. सुदीप राऊत यांनी घटनास्थळी पंचनामा करून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.


शेतकरी रात्रंदिवस शेतात राबून पीक घेतात, मात्र काही क्षणातच चोरट्यांकडून लुटले जातात. अशा घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने रस्त्यावर नाकाबंदी करावी, रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.



टिप्पण्या