struggling-warrior-tukaram-bhau: भाऊ गेले… क्रीडा, राजकारण, चित्रपट सृष्टीचा ध्रुव तारा निखळला… एका संघर्ष योद्धाची कहाणी…




ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सान थोरांचे भाऊ…तुकाराम भाऊ यांनी आज अचानक जीवन प्रवासातून एक्झिट घेतल्याने कोणाचाही या घटनेवर विश्वासाचं बसला नाही. मात्र ही हृदयाला पिळवटून टाकणारी घटना घडली हेच सत्य. आपले भाऊ गेले… हे समजताच कुंभारीसह मूर्तिजापूर आणि अकोला शहरात शोककळा पसरली. क्रीडा, राजकारण, सांस्कृतिक क्षेत्र स्तब्ध झाले. भाऊंचे असे अपघाती निधन होईल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटले नाही. पण ही दुर्दैवी घटना घडून गेली. कारण नियतीच्या मनात काय असत हे कुणीच कधी सांगू शकत नाही…



काही महिन्यांपूर्वी भाऊंचा अकोला शहरात दुचाकीवर जात असताना अपघात झाला होता. या अपघातानंतर त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. यानंतर त्यांची तब्येत चांगली झाली होती. मात्र आरामाची गरज होती. तरी देखील ते स्वस्थ न बसता सर्व व्याप सांभाळत होते. त्यांचे शिक्षण व सिने सृष्टीतील गुरू डॅडी देशमुख यांच्या नावाने त्यांनी अकोल्यात लघु चित्रपट महोत्सव सुरू केला आहे. यासंदर्भात डिसेंबर मध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तब्येत खराब असतानाही भाऊ या पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित राहून सर्व पत्रकारांशी संवाद साधला होता. मात्र आज ते रस्ता अपघातात गेले… भाऊंचे हे अचानक जाणे त्यांच्या लाखों चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.




या जगात तुकाराम भाऊ यांच्या सारखे प्रतिभावंत व्यक्तीमत्व लाखात एक जन्माला येतं. जगातील सगळी महान, अप्रतिम, गौरवपूर्ण कामं अशाच व्यक्ती कडून घडत असतात. कुंभारीसारख्या एका छोट्याशा गावात एका सामान्य कुटुंबात जन्मलेलं असचं एक व्यक्तीमत्व ते म्हणजे 'तुकाराम हरिभाऊ बिरकड', ज्याचं उनाड बालपण प्रतिकूल परिस्थितीवर, संकटावर मात करायला शिकलं. कष्ट, श्रम, मेहनत, जिद्द, स्वप्न, ध्येय, चिकाटी, शिक्षण आणि विश्वासाच्या जोरावर एखाद्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे वेगाने त्या परिस्थितीत बदल घडून आणण्याचं यशस्वी सामर्थ्य त्यांनी आपल्या अंगी निर्माण केलं.


शैक्षणीक विकासापासून लांब असलेल्या कुंभारी सारख्या एका छोट्याशा गावात 5 मार्च रोजी तुकाराम बिरकड यांचा जन्म झाला. गावात जरी शैक्षणिक मागासलेपण असले तरीही त्यांच्या आई स्व. वेणुताई बिरकड यांनी तुकाराम भाऊ यांना घडवलं. मुलगा शिकला पाहीजे म्हणून आपल्या माहेरी  तुकारामांना पाठविले. मामांच्या गावी प्राथमिक शिक्षणानंतर तुकाराम भाऊ यांना शिक्षणाचे वेड लागलं. पुढील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी पैसा हवा होता. त्याकरिता त्यांनी मिळेल ती कामे करून आपल्या शैक्षणिक ध्येय प्राप्तीच्या वाटचालीस सुरवात केली.




हिंदू युवक व्यायाम शाळेच्या माध्यमातून गुरु चंद्रशेखर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारीत तरुणांना एकत्रित करून व्यायाम शाळेच्या शाखा व्यवस्थापकाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, मुष्टियुद्ध, डागरफाईट, फ्रीफाईट, भालाफाईट, मल्लखांब, धनुर्विद्या, दीपकासन, काठी फीरविने, कुस्ती, कवायती अशी विविध कौशल्य आत्मसात करून आपल्या छोट्याशा गावात 1 जुलै 1977 रोजी जय बजरंग मंडळद्वारा संचालित जय बजरंग मुलांच्या व्यायाम शाळेची स्थापना करून अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि जळगाव खानदेश या सहा जिल्ह्यात 270 व्यायाम शाळा स्थापन केल्या.

मल्लखांब या देशी क्रीडा प्रकारचा त्यांनी साता समुद्रपलिकडे पोहचविले. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांनी तयार केले. त्यांचे अनेक विद्यार्थी शिवछत्रपती अवार्डने सन्मानित झाले आहेत. 



तुकाराम बिडकर यांच्या घराचा राजकारणाशी तिळमात्र संबंध नसतांनाही सतत तीन वेळा जिल्हा परिषदेच्या विविध मतदार संघातून विजय प्राप्त करून प्रभावी सदस्य, अर्थ व बांधकाम सभापती, मुर्तिजापुर मतदारसंघाचे आमदार, विधान मंडळ इतर मागास कल्याण समितीचे अध्यक्ष, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष, जिल्हा शांतता समिती सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य, अध्यक्ष अकोला जिल्हा समता परिषद, जिल्हा एस. टी. सल्लागार सदस्य, महात्मा फुले शिक्षण हमी योजना सल्लागार समिती, शासकीय बालनिरिक्षक गृह सदस्य, विभागीय प्रमुख महात्मा फुले समता परिषद, अभिनेता, प्रभावी वक्ता, लेखक, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अशा अनेक रुपांत दिवसेंदिवस उंच उंच भरारी घेणारा तुकाराम भाऊ यांचा जीवन आलेख उंचावत गेला. सर्व क्षेत्रातील संघर्षमय यशस्वी प्रवास  युवा पिढीला आजही दिशादर्शक आहे आणि अनंत काळ असाच राहणार, एवढे मात्र निश्चित.






ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

मुख्य संपादक

भारतीय अलंकार न्यूज 24





टिप्पण्या