GBS-report-GMC-akola-district: घाबरु नका सतर्क राहा: अकोल्यात GBS चे 4 रूग्ण; दोघांवर उपचार सुरू तर दोघांना रुग्णालयातून सुटी…

   प्रतिकात्मक/ संग्रहित चित्र



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यामध्ये 30 जानेवारी पर्यंत जीबीएस या आजाराचे संशयित 4 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोन रुग्णांवर उपचार करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्णालयातुन सुटी देण्यात आली आहे. उर्वरित दोन रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैकी एक रुग्ण (वय 22 वर्ष, लिंग पुरुष) हा शिवणी, अकोला येथील, तर दुसरा रुग्ण (वय 55 वर्ष, लिंग पुरुष) हा अकोट येथील आहे. हे दोन्ही रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे उपचार घेत आहेत. सदरची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.



जीबीएस आजाराला घाबरु नका, काळजी घ्यावी. 

लक्षणे आढळताच तत्काळ तपासणी करा.



प्रशासनाचे आवाहन

राज्यातील पुणे महानगरपालीका व नजिकच्या काही जिल्ह्यांमध्ये 'गुईलेन बॅरे सिंड्रोम' (जीबीएस) च्या रुग्णांची वाढ लक्षात घेता जिल्ह्यामध्ये अशा रुग्णांची हाताळणी करण्यासाठी एसओपीची परिपूर्ण अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

या आजाराला नागरिकांनी घाबरू नये. पुरेशी दक्षता घ्यावी. लक्षणे आढळताच तत्काळ तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.  




जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थामधील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधात्मक व सक्रिय सर्वेक्षणात्मक कार्यवाही अंमलात आणण्याबाबत सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, आरोग्य उपसंचालक डॉ कमलेश भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.


जीबीएस म्हणजे काय

 

हा एक दुर्मिळ ऑटोइम्युन आजार असून त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती परिधीय मज्जासंस्थेवर परिणाम होतो. या आजाराचे निश्चीत कारण माहित नाही. तथापि, हा आजार गत सहा आठवड्यातील संसर्गामुळे होतो.



आजाराची लक्षणे

पायामध्ये अशक्तपणा किंवा मुंग्या येऊन हया संवेदना शरीराच्या वरच्या भागात आणि हातापर्यंत जाऊ शकतात. हालचाल करण्यात अडचण (उदा. चालणे, डोळे किंवा चेहरा हलविणे यामध्ये अडचण), वेदना, मुत्राशय किवा आतडे नियंत्रीत करण्यास अडचण, वेगवान हृदयगती, कमी किंवा उच्च रक्तदाब, श्वास घेण्यास किंवा गिळण्यास अडचण, अंधुक दृष्टी. 



नागरिकांनी काय काळजी घ्यावी?


*पिण्याचे पाणी दुषित होणार नाही याची दक्षता घ्यावी. 


*पाणी उकळून प्यावे. 


*अन्न स्वच्छ व ताजे खावे. 


*वैयक्तिक व परिसर स्वच्छ ठेवावा. 


*शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न एकत्र ठेवू नये. 


*न शिजवलेले अन्न खाऊ नये.



खासगी डॉक्टरांना आवाहन


खाजगी वैद्यक व्यवसायिकांना या आजाराचे रुग्ण आढळल्यास त्वरीत नजिकच्या शासकीय संस्थेस माहिती देण्यात यावी.  जिल्ह्यातील नागरिकांनी लक्षणे आढळून आल्यास त्वरित नजिकच्या आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पण्या