encroachment-amc-birla-road: बिर्ला रोडवरील मंदिर अखेर जमीनदोस्त; मनपाची कारवाई, अतिक्रमणधारकाची सर्वोच्च न्यायालयात धाव!




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जठारपेठ भागातील रस्त्यावर अतिक्रमण करुन श्री हनुमान व शिव मंदिर उभारण्यात होते. जिल्‍हा, पोलीस आणि मनपा प्रशासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने बिर्ला रोडवरील या धार्मिक स्‍थळाच्‍या अतिक्रमणावर आज निष्‍कासनाची कारवाई करण्यात आली.



जठारपेठ भागातील न्‍यु तापडीया नगर, रेल्‍वे उड्डाणपुला जवळील बिर्ला राम मंदीर कडे जाणा-या रस्‍त्‍यावर अनेक वर्षापासून कुळकर्णी नावाच्‍या व्‍यक्ति कडून अकोला आईल इंडस्‍ट्रीजच्‍या आणि रस्‍त्‍याच्‍या जागेवर घर व धार्मिक स्‍थळाचे अतिक्रमण करण्‍यात आले होते. यामुळे वाहतुकीसही अडचण निर्माण होत होती. तसेच मनपा प्रशासनाव्‍दारा सदर रस्‍त्‍याचे रुंदीकरणाचे कामही करावयाचे आहे.


मुंबई उच्‍च न्यायालय नागपूर खंडपीठाच्‍या निर्देशानुसार तसेच मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्‍या आदेशान्‍वये 28 डिसेंबर 2024 रोजी येथील अतिक्रमणापैकी घराचे आणि धार्मिक स्‍थळाच्‍या आवार भिंती आणि परिसरातील अतिक्रमणावर निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली होती. तसेच उरलेल्‍या धार्मिक स्‍थळाच्‍या अतिक्रमणावर आज 16 जानेवारी 2025 रोजी जिल्‍हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनाच्‍या संयुक्‍त विद्यमाने निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली आहे.




            

या कारावईत उपविभागीय अधिकारी शरद जावळे, पुर्व झोन कार्यालयाचे सहायक आयुक्‍त विजय पारतवार, रामदास पेठ पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे, तहसीलदार अकोला सुरेश कव्‍हाळे, उप अभियंता भुमि अभिलेख कार्यालय कुणाल राजपुत, सहायक नगर रचनाकार संदीप गावंडे, विधी अधिकारी शाम ठाकुर, अतिक्रमण विभागाचे सहायक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, कनिष्‍ठ अभियंता नरेश कोपेकर यांचेसह मनपा अतिक्रमण विभागातील आणि अभिकर्ताचे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.



सुप्रीम कोर्टात याचिका!


दरम्यान, अतिक्रमण धारक यांनी मंदिराची जागा ही आपल्या वडिलांना जमीन मालकांकडून दानपत्राद्वारे 1946 मध्ये मिळाली असल्याचा दावा केला आहे. न्यायालयात आमच्या विरुध्द निकाल लागला आहे. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय येथे देखील आमच्या बाजूने निकाल लागला नाही. न्यायालयाचा अवमान होवू नये, यासाठी उद्या मनपा कडून होणाऱ्या कारवाईस आम्ही विरोध करणार नाही. मात्र न्यायासाठी आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असल्याचे काल पत्रकार परिषद आमंत्रित करून श्री सर्वसिद्ध हनुमान मंदिराचे पुजारी भालचंद्र कुळकर्णी, त्यांचे भाऊ संतोष कुळकर्णी, बहीण कल्पना कुळकर्णी यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली होती. सुप्रीम कोर्टात आपणास न्याय मिळेल,अशी अपेक्षाही भालचंद्र कुळकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली होती.

टिप्पण्या