deep-antique-museum-akola-: जगभरातील पुरातन वस्तूंचा दीप पुरातन वस्तू संग्रहालयात अनमोल ठेवा



ठळक मुद्दा 

वस्तू संग्रहालयामुळे अकोला येणार पर्यटनाच्या क्षितीजावर; अकोल्याच्या शिपपेचात मानाचा तुरा

 


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : गत काही वर्षांपासून नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून, सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहेत. नवनवीन शोध लागत असल्याने काळाच्या ओघात कालबाह्य झालेल्या पुरातन वस्तू अडगळीत टाकून देण्यात येत आहेत. मात्र, कधीकाळी मानवी जीवनाचा भाग असलेल्या या वस्तू अनमोल आहेत. त्यामुळे त्यांचे महत्व ओळखून नागपूर येथील आर्किटेक्ट संदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून व अकोला येथील व्यवसायीक प्रदीप नंद यांच्या अमूल्य सहकार्याने दीप पुरातन वस्तू संग्रहालय साकारण्यात आले आहे. नागपूर रोडवर असलेल्या बाभुळगावं येथील नंद पेट्रोलियमच्या बाजूला हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.या संग्रहालयाचे उद्घाटन 20 जानेवारी 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. 



21 जानेवारी पासून नागरिकांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हा अनमोल ठेवा अवलोकनासाठी खुला करण्यात आला आहे. जगभरातील राज्यकर्त्यांची सांस्कृतिक प्रतिके, देशभरातील कलाक्षेत्रांचे प्रतिबिंब या ठिकाणी बघायला मिळतात. 



जग झपाट्याने बदलत आहे


आर्टिफिशीयल इंटलिजन्सच्या या युगात नवीन पिढी मोबाइलच्या आहारी गेली असून, आपल्या पुर्वजांनी अनुभवलेल्या, आपल्या संस्कृतीची ओळख असलेल्या अनेक बाबींपासून ते अनभिज्ञ आहेत. आपल्या संस्कृतीची जपवणूक व्हावी व कधीकाळी लाखमोलाच्या असलेल्या वस्तूंची नवीन पिढीला माहिती व्हावी याकरिता दीप पुरातून वस्तू संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. नागपूर येथील आर्किटेक संदीप कांबळे, व अकोला येथील प्रदीप नंद तथा डॉ.माधव देशमुख यांनी गत 20 वर्षांमध्ये जगभरातून या वस्तू गोळा केल्या. डॉ.माधव देशमुख या संग्रहालयाचे व्यवस्थापन बघत आहेत. 



आपल्या पूर्वजांचा अनमोल ठेवा याठिकाणी संग्रहीत करण्यात आला आहे. जहाजांमध्ये वापरण्यात येणार्या वस्तूंपासून तर घरगुती भांड्यांपर्यंतच्या पुरातन वस्तू या ठिकाणी आहेत. जगभरात विविध देशात प्राचीन काळापासून चलनात असलेले नाणे व नोटा सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतात. येथे आल्यावर पर्यटक, अभ्यासक निश्चितच पुरातन काळात हरवून जातो.    




संग्रहालयात आहेत या वस्तू 


याठिकाणी फोनचा शोध लागल्यापासून तर आतापर्यंतचे विविध प्रकारचे फोन आहेत. फोनचा शोध लागला त्यावेळी फोन कसा होता, त्यामध्ये कसा बदल होत गेला. त्याचे प्रकार कसे होते, त्याकाळी कशाप्रकारचे आगळे वेगळे फोन असायचे हे या ठिकाणी बघायला मिळते. 


गत 100 वर्षांमध्ये कॅमेऱ्याच्या विश्वात अनेक आमुलाग्र बदल झाले. कॅमेऱ्याचा शोध लागला तेव्हा बनविण्यात आलेल्या कॅमेऱ्या पासून तर डिजीटल कॅमेऱ्या पर्यंत विविध प्रकारचे कॅमेरे या ठिकाणी आहेत. सुरूवातीला कशाप्रकारे कॅमेरे होते, त्यातून कसे फोटो काढण्यात येत होते, याचे दर्शन घेते घडते. यासोबचत ब्लॅक अँड व्हाइट चित्रपट तयार होत असताना वापरण्यात येणारे व्हिडीओ कॅमेरे, लग्नाची शूटींग करण्याकरिता वापरण्यात येणारे कॅमेरे, शूटींग करताना कॅमेऱ्या सोबतच वापरण्यात येणाऱ्या विविध वस्तूही या ठिकाणी आहेत. पूर्वीच्या काळी रेडीओचे महत्व मोठे होते. जगभरातील बातम्या ऐकण्याचे ते एकमेव साधन होते. जसजसे शोध लागत गेले रेडीओमध्येही बरेच बदल झाले. सर्वप्रकारचे रेडीओ या ठिकाणी आहेत. जगातील पहिले टेलिग्राम मशीन येथे आहे. 

 



ग्रामोफोनवर ऐकता येणार गाणे


आता मोबाइलमध्ये चित्रपटातील तसेच विविध गाणे आपण एकतो. मात्र, पूर्वी ग्रामोफोनवर गाणे ऐकण्यात येत होते. तेे ग्रामोफोन सुद्धा या ठिकाणी आहे. येथे ग्रॅमोफोनपासून पेनड्राइव्हवर गाणे ऐकण्यापर्यंत जो प्रवास झाला, त्यादरम्यान गाणे ऐकण्याकरिता वापरण्यात येणारे रेडीओ, सीडी प्लेअर, व्हीसीआर सुद्धा येथे संग्रहीत करून ठेणण्यात आला आहे. या ठिकाणी स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंतच्या 3500 रेकाॅर्ड (कॅसेट) चे संकलन करण्यात आले आहे.



पुरातन संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या वस्तू




संग्रहालयात पुरातन संस्कृतीचे जतन घडविणाऱ्या अनेक वस्तू आहेत. यामध्ये स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी जुनी भांडी, पाणी गरम करण्याची भांडी, भांड्यांचे विविध प्रकार, किटलीचे प्रकार, पुरातन काळातील टिफीन, प्रवासादरम्यान पाणी घेवून जाण्याकरिता उपयोगात आणण्यात येणारी फिरकीची भांडी आहेत. तसेच अडकित्याचे अनेक प्रकार या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. जवळपास 60 ते 70 प्रकारचे अडकित्ते या ठिकाणी बघायला मिळतात. तसेच पानपुड्याचेही विविध प्रकार आहेत. साध्या पानसुपारीच्या पुड्यापासून तर घरामध्ये वापरण्यात येणारे धातुचे पानपुडे या ठिकाणी आहेत. 

 


शिवकालीन शस्त्रांचा संग्रह


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात युद्धात वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांचा संग्रह या ठिकाणी करण्यात आला आहे. शिवकाळात युद्धामध्ये जे शस्त्र वापरण्यात येत होते, ते या ठिकाणी बघायला मिळतात. तसेच युद्धादरम्यान वापरण्यात येणारे चिलखत सुद्धा येथे आहे. पुरातन काळातील तलवारींचाही संग्रह येथे बघायला मिळतो.व जुन्या काळातील कुलपांचे प्रकार सुद्धा आहेत.

  


मध्ययुगीन बैठक व्यवस्थेचे दर्शन  



या ठिकाणी शिवकालीन बैठक व्यवस्था कशी होती. किल्ल्यांमध्ये, वाडे, हवेल्यांमध्ये बैठक व्यवस्था कशी होती, ते बघायला मिळते. तसेच पेशवेकालीन बैठक व्यवस्था कशी होते, याचेही दर्शन होते. बैठक घरात लावण्यात येणारे दिवे, कंदिल, झूंबरही या ठिकाणी आहेत. पुरातन काळातील घराचे खांब, दरवाजे, त्यावरील नक्षीकाम सुद्धा बघायला मिळते.



64 कलांमधून घडते विविध संस्कृतीचे दर्शन


 


पुरातन वस्तू, मध्ययुगात शास्त्रज्ञांनी शोधलेल्या इलेक्ट्राॅनिक वस्तूंसोबतच दीप पुरातन वस्तू संग्रहालयात एक विशेष कला दालन आहे. या कलादालनात जगभरातील विविध संस्कृतीतील कला बघायला मिळतात. या ठिकाणी सांजी, रेशम आर्ट, मधूबनी, गोंड आर्ट, गोंदणी, पिछवइ, मंडाला, चॅरीअल, संथाल, मिनाकारी, भिल आर्ट, पटचित्र, साैर आर्ट, वारली, म्यूरल, भरणी, कचनी, काॅफी, केरला म्यूरल, डाॅट, ग्लास पेेंटींग, कलमकारी, अँटिक , ट्रायबल आर्ट, लीपण आर्ट, मिक्समेडी आर्ट, पाॅप आर्ट आदी प्रकारच्या कला आहेत. एवढ्या विविध प्रकारच्या कला एकाच ठिकाणी बघायला मिळणे, ही कलाप्रेमींचीसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. आर्टिस्ट दीपा शर्मा यांनी अनेक वर्षे विविध संस्कृतीचा, विविध कलांचा अभ्यास केला. जगातील विविध देशांमध्ये जावून त्यांनी तेथील कलाकरांना भेटून त्यांनी कला समजून घेतल्या. त्यांच्याकडे असलेल्या कलांची नवीन पिढीला, तरूणांना माहिती व्हावी यासोबतच त्यांच्यामध्ये पारंपारिक कलांबद्दल आवड निर्माण व्हावी, याकरिता त्यांनी हे विशेष दालन तयार आहे आहे. कला व संस्कृती या विषयामध्ये पीएचडी करणार्यांसाठी हे दालन मार्गदर्शक ठरणार आहे. कलेचा अभ्यास करणार्या विद्याथींसाठीही हे दालन महत्वपूर्ण ठरणारे आहे. दीपा शर्मा यांना लहानपणापासूनच कलाक्षेत्राची आवड आहे. त्यादृष्टीने त्यांनी अभ्यास केला, कला समजून घेतल्या. कलांची माहिती घेण्याकरिता त्यांनी विविध संस्कृतींचा अभ्यास केला. ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ पासून त्या विविध प्रकारचे क्राफ्ट तयार करतात. दोन्ही हातांनी मेंहदी लावण्याची कला त्यांना अवगत आहे. तसेच पाच भाषांमध्ये म्यूरल रायटींगमध्ये त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या संग्रहालयात आल्यावर नवीन पिढीला विज्ञान, इतिहास, कला व विविध संस्कृतींचे दर्शन होणार आहे. या संग्रहालयातून बाहेर पडताना मुले व तरूण प्रेरणादायी वारसा सोबत घेवून जाणार एवढे मात्र निश्चित.


टिप्पण्या