anti-corruption-bureau-akola: त्या लाचखोर पोलीस शिपायाची पोलीस कोठडीत रवानगी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पोलीस स्टेशन दहिहांडा येथे कार्यरत पोलीस शिपाई प्रफुल दिंडोकार याची आठ हजार रूपये लाच स्विकारल्याच्या प्रकरणात अकोट सत्र न्यायालयाच्या आदेशान्वये पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. 



अकोट  येथील अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी आज 29 जानेवारी रोजी दहिहांडा पोलीस स्टेशनचे फाईल वरील अप. क्र. 40/2025, कलम 07,7 (अ) भ्रष्टाचार अधिनियम 1988 मधील आरोपी प्रशांत जर्नाधन दिंडोकार (वय 33 वर्ष पोलीस शिपाई ब.नं. 2347, नेमणूक दहिहांडा पोलीस स्टेशन राहणार सोमवारवेस अकोट ता. अकोट जि. अकोला) याने याची आठ हजार रूपये लाच रक्कम स्विकारल्याच्या प्रकरणात 31जानेवारी पर्यंत सखोल तपास करण्याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली आहे.



या प्रकरणात लाचलुचत प्रतिबंधक विभाग अकोलाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी आरोपीला 29 जानेवारी रोजीचे या प्रकरणात अटक करून त्याला पोलीस कोठडीमध्ये पाठविण्याबाबत रिमांड सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी अकोट सत्र न्यायालयात दाखल केला.  युक्तीवाद केला की, या प्रकरणातील फिर्यादी प्रशांत पडोळे (रा. वरूळ जउळका ता. अकोट जि. अकोला याने  20 जानेवारी रोजी एसीबी अकोला येथे तक्रार दिली की, त्याचे परिवारा विरूध्द दहिहांडा पो.स्टे. येथे अदखलपात्र गुन्हयाची नोंद असून, हे प्रकरण निपटून टाकण्याकरिता या प्रकरणात त्यांच्याकडे दहा हजार रूपयेच्या लाचेची मागणी आरोपी करीत आहे. 



20 जानेवारी रोजी शासकीय पंचां समक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. तसेच 27 जानेवारी  रोजी ग्राम दहिहांडा येथे दहिहांडा दर्यापूर रोडवरील गोयंका हार्डवेअरच्या बाजूला पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, आरोपी पोलीस अंमलदार प्रफुल दिंडोकार याने प्रकरण निपटून टाकण्याकरिता दहा हजार रूपये लाच रक्कमेची मागणी करून, तडजोडीअंती आठ हजर रूपये लाच रक्कमेची मागणी करून सदर रक्कम 28 जानेवारी  रोजी घेवून येण्याचे सांगितले. त्याप्रमाणे दहिहांडा दर्यापूर रोडवरील हॉटेल यशवंत बार जवळ शासकीय पंचासमक्ष सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी पोलीस अंमलदार प्रफुल दिंडोकार याचे सांगण्यावरून खाजगी इसम शंकर तरोळे याने आठ हजार रूपयाच्या लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याने त्याला रंगेहात पकडण्यात आले. 




एसीबीने गुन्हा दाखल करून आरोपी पोलीस शिपाई याला देखील अटक केली. या प्रकरणात आरोपींकडून महत्वाचे कागदपत्रे तसेच फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांकडून दाखल प्रकरणाची कागदपत्रे जप्त करणे बाकी आहे. आरोपींचे नैसर्गिक आवाजाचे नमूने घेवून परिक्षणाकरिता पाठविणे बाकी आहे. साक्षीदार निष्पन्न करून त्यांचे जाब जबाब नोंदविणे बाकी आहे. या प्रकरणात आणखी इतर कोणाचा सहभाग आहे वा कसे याबाबत सखोल तपास करण्याकरिता व गुन्हयाचा तपास प्राथमिक स्तरावर असल्याने आरोपीची 31 जानेवारी पावेतो पोलीस कोठडी रिमांडची आवश्यकता आहे, असा युक्तीवाद या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात केला. 



दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर कोर्टाने आरोपी प्रफुल दिंडोकार पोलीस शिपाई दहिहांडा याची या प्रकरणात 31 जानेवारी पावेतो पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्याचा आदेश पारित केला आहे.


टिप्पण्या