guru-gadgil-passes-away-akl-: प्रखर हिंदुत्ववादी धर्मवीर गुरू चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन; उद्या अंतिम संस्कार





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अखिल भारतीय हिंदुसेना प्रमुख आणि हिंदू ज्ञानपीठचे संस्थापक धर्मवीर गुरू श्री चंद्रशेखर गाडगीळ यांचे आज 1 डिसेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण विदर्भात शोककळा पसरली आहे. निधनाच्या वेळी त्यांचे वय 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी ज्येष्ठ प्राचार्य श्रीमती गिरिजा गाडगीळ (बडी दीदी),  मुलगा ॲड. संग्राम गाडगीळ, सुन, नात नातवंडांसह मोठा आप्त परिवार आहे. 




धर्मवीर श्री चंद्रशेखर गाडगीळ यांचे  नेतृत्वाखाली हिंदुसेना एक मजबूत आणि प्रभावी संघटना बनली होती, ज्याने हिंदुत्वाच्या विचारांना समाजात प्रबळ केले. अकोलाचे आणि विदर्भाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवन त्यांच्यामुळे समृद्ध झाले.


चंद्रशेखर गाडगीळ यांचे जीवन हे केवळ एक राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्त्याचे नव्हे, तर एक सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्व असण्याचे प्रतीक होते. त्यांनी 'हिंदू ज्ञानपीठ' संस्थेची स्थापना केली, ज्यामुळे त्यांचं योगदान शिक्षण, संस्कृती आणि समाजाच्या सशक्तीकरणासाठी मोठं ठरलं. त्यांनी एकजुटीचे महत्व शिकवले आणि हिंदुत्वाच्या सर्वसमावेशकतेला साक्षात दाखवले. 





अकोला शहर व जिल्ह्यातील प्रखर हिंदुत्ववादी चेहरा, कट्टर सावरकर भक्त आणि 'हिंदू सेना' संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, हिंदू धर्म व संस्कृतीसाठी समर्पित साप्ताहिक 'जागे व्हा सावधान' चे संस्थापक संपादक आणि हिंदू ज्ञानपीठ शाळेचे संस्थापक अध्यक्ष आणि धर्मवीर उपाधीने सन्मानित गुरु चंद्रशेखर गाडगीळ यांनी आज भल्या पहाटे अखेरचा श्वास घेतला. अलिकडच्या काही वर्षांपासून गुरू गाडगीळ वयोमानाने थकल्याने त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली होती.


विदर्भातील मोजक्या वीर सावरकर यांच्या कट्टर समर्थकांपैकी एक आणि पुणे येथील ख्यातनाम सावरकर स्मृती प्रतिष्ठानकडुन पहिला वीर सावरकर पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आलेले चंद्रशेखर गाडगीळ  या शहरात प्रतिष्ठीत दरारा राखून होते. त्याकाळी विदर्भात अकोला येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्याची नवलाई होती. सार्वजनिक गणेश मुर्ती विसर्जन मिरवणुकीला एक वेगळेच वलय होते.


सपूर्ण विदर्भात गुरु या नावाने ओळखले जाणारे गाडगीळ यांनी हिंदू सेनेची पाळेमुळे घट्ट रोवली पण यामाध्यमातून कधीच राजकारण शिरकाव केला नाही. जेमतेम उंची पण मजबूत शरीर यष्टी, भरगच्च दाढी, करारी बाणा, कमरेवर सदैव टांगलेली कट्यार आणि उंच जीवनमूल्ये जपत हिंदू धर्म व संस्कृतीसाठी जनजागृती करणारे चंद्रशेखर गाडगीळ यांना केवळ बघण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो लोक मिरवणूकीसाठी अकोल्यात येत होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघणा-या मिरवणुकीत गाडगीळ शेवटपर्यंत फिरत राहतं आणि लोकांना मिरवणुकीत गुरुच्या 'दांडपट्टा' या खेळाचे विशेष आकर्षण होते. कालांतराने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदापासून गाडगीळ दूर झाले आणि या मिरवणुकीला देखील उतरती कळा लागली.



युवा पिढीत कठोर शिस्त आणि मजबूत शरीर संपदा असावी, यासाठी गांधी जवाहर बगीच्या जवळ त्यांनी व्यायाम शाळा सुरु करुन गत काळात शेकडो मल्ल तयार केले होते. शिक्षणासोबत हिंदू संस्कृती, संस्कार आणि सणवारांची जुजबी माहिती देण्यासाठी 'हिंदू ज्ञानपीठ' या नावाने अकोला व नागपूर येथे प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू केली. अत्यंत माफक शुल्कात येथे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. आपल्या नीतीमुल्यांसोबत त्यांनीं कधीही कुठेही तडजोड केली नाही. शैक्षणिक शुल्कात ही अवाजवी वाढ केली नाही. काही वर्षांपूर्वी नागपूर येथील शाळा बंद पाडली तर अकोला येथील हिंदू ज्ञानपीठात कॉन्व्हेन्ट संस्कृती नसल्याने अखेर शाळा बंद होण्याच्या मार्गावर आली. तसेच सशक्त युवापिढी निर्माण करण्यासाठी देशातील पहिलं कमांडो ट्रेनिंग सेंटर गुरूंनी अकोल्यात सुरू केलं होते. मात्र काही काळानंतर हे सेंटर बंद पडलं.


शहरात प्रखर हिंदुत्ववादी संघटना, कवायत शाळा, हिंदुत्ववादी साप्ताहिक आणि शाळा सुरु करुन हिंदू धर्म व संस्कृतीची जोपासना करण्यासाठी सतत झटणारे आणि शेवट पर्यंत आपलं संपूर्ण जीवन यासाठी खर्ची घालणारे गुरू आज अनंताच्या प्रवासाला निघाले. त्यांचा मुलगा संग्राम बाहेरगावाहून अकोल्यासाठी निघाले असून, गुरुंच्या पार्थिवावर उद्या सोमवारी सकाळी अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकवर्तीयांनी सांगितले.





धर्मवीर श्री चंद्रशेखर गाडगीळ यांना 'भारतीय अलंकार न्यूज 24' परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

- ॲड. नीलिमा शिंगणे जगड 
मुख्य संपादक 

टिप्पण्या