christmas-2024-churches-akl: ख्रिसमस निम्मित अकोल्यातील चर्च विद्युत रोषणाईने उजळले; साकारले आकर्षक देखावे, ख्रिश्चन कॉलनीत नाताळची लगबग




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण ख्रिसमस. या निमित्ताने अकोल्यातील चर्चस् विद्युत रोषणाईने उजळलेले आहेत. बुधवारी  (दि. 25) ख्रिसमस साजरा होणार असून, प्रभू येशू यांच्या जन्मदिनानिमित्त सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला अकोल्यातील माउंट कारमेल चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. या विद्युत रोषणाईच्या माध्यमातून येथे प्रभू येशू ख्रिस्त, मदर मेरी, सांता क्लॉज, ख्रिसमस ट्री सह ख्रिसमसचे विविध देखावे साकारण्यात आले आहे. अकोला शहरवासियांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरला आहे. ही आगळी वेगळी विद्युत रोषणाई बघण्यासाठी नागरीक गर्दी करीत आहेत.



नाताळ सणानिमित्त ख्रिश्‍चन बांधवांकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या नाताळ असल्याने महिला व बालकांची कपडे, गिफ्ट आदी खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू आहे. तर अनेकांनी आधीच सणाची खरेदी करुन ठेवली आहे. ख्रिसमस डेकोरेशन स्टार, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज आणि गोठा यांना महत्त्व आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात सजावटीचे साहित्य उपलब्ध आहे. चर्च आणि घरोघरी येशू जन्माची तयारी सुरू आहे. यासाठी सुंदर सजावट करण्यात येत आहे.



प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म गोठ्यात झाला असल्यामुळे वाळलेले गवत, पुठ्ठा, लाल माती, पुतळ्यांचा वापर करून घरात व चर्च परिसरात प्रातिनिधिक स्वरूपाचा गोठा तयार करण्यात आला आहे. येशूच्या जन्माचा प्रसंग या सजावटीच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे. या गोठ्यात प्रभू येशूची आई, वडील, बाळ येशू, मेंढ्या, गायी यांचे पुतळे ठेवण्यात आलेले आहेत. तसेच घराच्या बाहेर स्टार लावण्यात आले असून घराला रोषणाई करण्यात आली आहे. शहरातली ख्रिश्चन कॉलनी तर अक्षरशः विद्युत रोषणाईने न्हाहून निघाली आहे.




कॅरल्स म्हणजे प्रभूचे आगमन जाहीर करणारी सुमधूर भक्तिगीते असतात. नाताळ सणानिमित्त कॅरल्स सिंगिंग केली जात असून, कडाक्याच्या थंडीत ख्रिस्ती बांधव एकमेकांच्या घरी जाऊन प्रभू येशूच्या स्तृतीची गीते गात आहेत. नाताळच्या एक आठवडापासून अबाल वृद्धांचे वाद्य वृंद संध्याकाळच्या वेळी कॅरल्स गात फिरत आहेत. तरुणाईचा उत्साह देखील यात विशेष दिसून येत आहे. या वाद्यवृंदाचे घरोघरी जोरदार स्वागत केले जात आहे.



टिप्पण्या