yogi-adityanath-murtijapur-akl: ही निवडणूक ‘राष्ट्रधर्मा’ ची निवडणूक- योगी आदित्य नाथ





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महाविकास आघाडीवाले भ्रष्टाचारी, अराजकता आणि अधर्मी यांची गळाभेट घेणारे असून त्यांना राष्ट्रधर्माशी काहीही देणे घेणे नाही. त्यामुळे मी त्यांना महाअनाडी म्हणतो. ही निवडणूक ‘राष्ट्रधर्मा’ ची निवडणूक असून महाराष्ट्रातील ‘राष्ट्रवादी’ जनतेने येथे एनडीएचे सरकार स्थापन करण्याचा संकल्प केला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.



योगी आदित्य नाथ आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मूर्तिजापूर येथे आले असता आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. सभा जिल्हा परिषद लाल शाळा शिवाजीनगर येथे पार पडली. 




भगवान श्रीकृष्ण विठ्ठलस्वामींच्या रूपाने तेजस्वी असलेल्या अशा पवित्र भूमीतील लोकांमध्ये राहून मी भारावून गेलो आहे. या निवडणुकीत देशाच्या सुरक्षेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती आघाडीला भरघोस पाठिंबा देऊन महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला विजयी करण्याचा निर्धार केला आहे,असे सांगून मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील जनतेप्रती आदित्य नाथ यांनी कृतज्ञता व्यक्त केली.



महाराष्ट्राची भूमी संत व शूरवीरांची आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक सद्यस्थितीत दोन गठबंधनामध्ये होत आहे. महायुती गठबंधन आणि महाविकास आघाडी गठबंधनामध्ये निवडणूक लढवली जात असताना एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहयोगी यांच्या नेतृत्वातील एनडीए महायुतीचे सरकार देशांतर्गत चौफेर विकास, राष्ट्रसुरक्षा, संप्रभूता, विरासत, गरिबांकरिता कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधा, सर्वांना नळाद्वारे पाणी, गरिबांना पक्की घरे, 80 कोटी लोकांना मोफत धान्य अशा विविध योजनांचा देशाला विकासाच्या मार्गावर सातत्याने घेऊन जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीवाले भ्रष्टाचारी, अराजकता आणि अधर्मी यांची गळाभेट घेणारे असून त्यांना राष्ट्रधर्माशी काहीही देणे घेणे नाही. त्यामुळे मी त्यांना महविकास आघाडी नाही तर महाअनाडी म्हणतो. आम्ही म्हणतो की तेरा वैभव अमर रहे मां ! चाहे हम रहे या ना रहे ! तर महाविकास आघाडी वाले म्हणतात मेरा वैभव अमर रहे ! चाहे तुम रहो ! या ना रहो ! त्यामुळे मी तुम्हाला यांच्यापासून सावधान करण्याकरिता आलो, असे योगी म्हणाले.


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. मात्र काँग्रेसने डॉ.बाबासाहेबांचा अपमान केला. अयोध्या धाममधील श्री राम मंदिराच्या मार्गात असलेले सर्व अडथळे काँग्रेसने स्थापन केले होते, असे आरोप योगी आदित्य नाथ यांनी यावेळी केले. तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यापासून काश्मीरमधील घुसखोरी बंद झाली असून दगडफेक नियंत्रणात आली असल्याचेही योगी आदित्य नाथ यांनी सांगितले.


murtijapur-assembly-election: 

मुर्तिजापूरच्या जाहीर सभेत एकनाथ शिंदे ‘कटस्आऊट’ मधून ‘आऊट’ 




मुर्तीजापुर मतदार संघातील भाजपचे उमेदवार हरिष पिंपळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या योगी आदित्य नाथ यांच्या जाहीर सभेत लावण्यात आलेल्या ' कट आऊटस् ' मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ' आऊट ' दिसले. सभेनंतर सभा स्थळी यासंदर्भात कुजबुज सुरू होती.



योगी आदित्यनाथ प्रचारासाठी आले असता सभा मंडपात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे आणि स्थानिक आमदारांचे फ्लेक्स लावण्यात आले होते. यामध्ये महायुतीतील मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा एक फ्लेक्स दिसून आला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फ्लेक्स सभे दरम्यान दिसून आला नाही. 


भाजपाच्या उमेदवाराने नामांकन अर्ज भरतावेळी अजित पवार यांचा फोटो लावला नसल्याने दबक्या आवाजात राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली होती. तर आता एकनाथ शिंदेचा फ्लेक्स नसल्याने विविध राजकीय चर्चांना मतदारसंघात उधाण आल आहे.



महायुतीचे मुर्तिजापूर मतदार संघाचे उमेदवार आमदार हरीश पिंपळे यांनी स्टंटबाजी करीत बुलडोजर मधुन सभास्थळी प्रवेश केला. मात्र सभास्थळी स्थानिक मतदार नागरिकांनी येण्याचे टाळले. मैदानात गर्दी नसल्याने बऱ्याच खुर्च्या रिकाम्या पडलेल्या दिसत होत्या.



टिप्पण्या