murtijapur-assembly-election: जातीला मतदान करणार असाल तर माती खाणार -ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य




ठळक मुद्दा 


मूर्तिजापूर मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुगत वाघमारे यांच्या प्रचारार्थ कुरणखेड येथे विराट जाहीर सभा; रेकॉर्ड ब्रेक गर्दी 




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: ' जातीला मतदान करणार असाल तर माती खाणार ' वक्तव्य करीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या जाहीर भाषणातून जातीच्या सत्तेला विरोध केला. अकोला पूर्व आणि मुर्तीजापुर मतदारसंघाचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी कुरणखेड येथे शुक्रवारी सायंकाळी आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.


यावेळी त्यांनी औरंगजेबच्या कबरीवर जर आम्ही चादर चढवली नसती तर अनेक मुस्लिम मुलं जेलात गेली असती आणि दंगली झाल्या असल्याचही म्हंटले.



मुस्लिम मतदारांना आवाहन करत 32 जागा आम्हाला जर निवडून दिले तर सभागृहात दोन वर्षापासून अडकलेलं  मोहम्मद पैगंबर यांच बिल पारित करण्यासाठी आम्ही मदत करू, अशी ग्वाही सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 



विधानसभा निवडणूक संपल्यावर काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन ओबीसी जनगणनेची मागणी मान्य करतील. तिथे ठराव मंजूर करतील की, ओबीसी जनगणनेची आकडेवारी नसल्याने त्यांचे शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षण थांबवण्यात येत आहे, असा आरोप  ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.



ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले की, आरक्षणाचा आणि क्रिमीलेयरचा लढा आता रस्त्यावर लढून चालणार नाही. त्याला विधानसभेतच लढावं लागणार आहे. त्यासाठी आमदार लागतात. उद्या आपले 25 आमदार निवडून आले, तर आपल्याशिवाय सरकार होत नाही हे लक्षात घ्या.


मुस्लिमांना उद्देशून ॲड. आंबेडकर म्हणाले की, मी मुस्लिमांना एवढंच सांगतो की, येणारी परिस्थिती अजून भयानक होणार आहे. भाजपच्या पायाखालची माती जशी घसरत जाणार तसतशी ते अधिक कडवट भूमिका घेत जातील. ही कडवट भूमिका मुस्लिमांच्या विरोधात असेल अशी परिस्थिती आहे. आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 



मूर्तिजापूर येथील सत्ताधारी आमदाराने गेल्या पंधरा वर्षात सभागृहात एकही प्रश्न विचारला नाही. जातापातीचे आमदार, खासदार विद्वान असते तर आखाती देशातून आयात केलेल्या कापसाला चांगला भाव आणि देशातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेती उत्पादनाला चिल्लर भाव मिळाला नसता. काँग्रेस मधील मुस्लिम समाजाला वंचित बहुजन आघाडी राजकारणात आणू पाहते, त्यामुळे काँग्रेसचा मुस्लिम वंचितकडे वळतो की काय अशी भीती राज्यात काँग्रेसला वाटते आहे. मुस्लिम समाज वंचितकडे चालला आहे. मुस्लिम समाज वंचितकडे गेला तर आपलं काय होणार? म्हणून त्यांना आता जड वाटायला लागले असल्याचे  ॲड. आंबेडकर यांनी म्हंटले. 

जे काँगेसवाले कधीही औरंगजेबच्या कबरी शेजारी उभे राहायला तयार नाहीत, टीपू सुलतानचे नाव घ्यायला तयार नाहीत, एनआरसीच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीत. अशा काँगेसवाल्यांवर मुस्लिम विश्वास ठेवायला लागले आहेत का ? असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला.







मुस्लिम समाजाने एक लक्षात घ्यावं की, दंगल करायची असेल तेव्हा एक तर मशीदचा वापर केला जातो किंवा मोहम्मद पैगंबर यांचा वापर केला जातो. त्यांच्या विरोधात लिहिलं जातं. मी मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो की, हे घडत राहणार आहे. तुम्ही वाईटच आहात हा शिक्का तुमच्यावर मारला जाणार आणि यातून बाहेर पडायचं असेल, तर वंचित बहुजन आघाडीने आखलेला मार्ग तुम्ही स्वीकारला पाहिजे, असे आवाहन ॲड.आंबेडकर यांनी यावेळी केले. मुस्लिम समाजाला उद्देशून ॲड. आंबेडकरांनी म्हटले की, पाठिंबा मागणं हा गुन्हा आहे का ? मोहम्मद पैगंबर बिल मंजूर करण्यासाठी पाठिंबा मागणं हा गुन्हा आहे, तर 100 वेळा हा गुन्हा करू आणि मुस्लिमांना पाठिंबा मागू.




ॲड. आंबेडकर म्हणाले की, आजही बाजारात 500 रुपये कमी भावाने कापूस विकत घेतला जातोय. 1500 ते 2000 प्रमाणे सोयाबीन स्वस्त विकत घेतले जात आहे. हमीभावाचा कायदा असता आणि व्यापाऱ्याला दंडात्मक कारवाई असती की, तू जर दिलेल्या भावापेक्षा कमी भाव देत असशील तर तुला 5 वर्षाची शिक्षा होणार आहे. तर कोणत्या व्यापाऱ्याने कमी भावाने विकत घेतल असता ?


रणधीर सावरकर हे विद्वान आहेत. प्रचंड विद्वान आहेत. त्यांची प्रचंड विद्वानता त्यांनी सभागृहात दाखवली. त्यांनी शासन जे विदर्भात विहीर वाटप करतात त्या कशा 30 टक्क्यांनी कमी करता येतील याची मांडणी त्यांनी केली. त्यामुळे 3 वर्षांपूर्वी विहरीसाठी मिळणारा निधी आणि आताचा निधी यात 30 टक्के कपात झाली असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.


 



यावेळी मूर्तिजापूर आणि अकोला पूर्व मधील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती.


टिप्पण्या