Baba-Siddiqui-murder-case-: बाबा सिद्दिकी हत्याकांड: वॉन्टेड शुभम लोणकरच्या दोस्ताला अकोल्यातून अटक; आरोपींची संख्या आता 26

  file photo 




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा पथकाने आज शुक्रवारी अकोला जिल्ह्यातील अकोट तहसीलमधील पणज गावातील सुमित दिनकर वाघ (26) याला ताब्यात घेतले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणातील ही 26 वी अटक असून, हा आरोपी वॉन्टेड शुभम लोणकर याचा महाविद्यालयीन मित्र असल्याची बाब समोर आली आहे.



बाबा सिद्दिकी यांच्यावर 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्वेतील निर्मल नगर भागात आमदार मुलगा जीशान सिद्दीकीच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. काही वेळाने जवळच्या रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.


या प्रकरणाच्या तपासात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी सुमित हा नागपूरला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यानुसार मुंबई पोलीस सुमित वाघ याच्या शोधात नागपुर येथे गेले होते. सुमित हा काही वर्षांपासून नागपूरात वास्तव्यास असल्याचा पोलिसांना सुगावा लागला होता. मात्र सध्या तो पणज येथे असल्याची पक्की खबर मिळताच पोलिसांनी त्याचा शोध घेत आज पणज गाठले. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलीसांनी पणज येथून सुमित वाघ याला ताब्यात घेवून मुंबईला रवाना झाले. 


वाघ याने गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील कर्नाटक बँकेच्या पेटलाड शाखेतील एका खात्यातून अटक आरोपी गुरमेल सिंगचा भाऊ नरेशकुमार, तसेच अटक आरोपी रुपेश मोहोळ आणि हरीशकुमार याच्याकडे पैसे ट्रान्सफर केले. त्याने अटक केलेल्याच्या नावाने आणलेले सिम वापरून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर केले असल्याचं समोर आले आहे. हे सीम आरोपी सलमान वोहरा याचे नावावर असल्याचं समोर आलं. तर वाँटेड आरोपी शुभम लोणकर याच्या सूचनेवरून ही रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती, असं आरोपी सुमित वाघ याने पोलीस तपासात सांगितले असल्याचं सुत्रांनी सांगितले.


सुमित वाघ आणि शुभम लोणकर हे एकाच तालुक्यातील मूळ रहिवासी असून, दोघेही जवळचे मित्र आहेत. ते अकोट येथील एका महाविद्यालयात एकत्र शिकले असल्याचंही समोर आले आहे. 



गुजरात मधील आणंद येथील पेटलाड रहिवासी सलमान वोहरा याला काही दिवसांपूर्वीच अकोल्यातील बाळापूर मधील उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील लोहारा गावातून  येथून ताब्यात घेण्यात आले होते. 



बाबा सिद्दीकी हत्याकांड मध्ये शुभम लोणकर हा वॉन्टेड असून, त्याचा भाऊ प्रवीण लोणकर याला पोलीसांनी याआधीच पुणे येथून अटक केली आहे. हे दोघेही मूळ अकोट तालुक्यातील रहिवासी आहेत. तर याआधी गुजरात येथील रहिवासी सलमान वोरा याला देखील अकोला येथुन अटक झाली आहे. तर आज सुमित वाघ याच्या अटकेमुळे अकोला जिल्ह्याचे नाव परत या प्रकरणाशी जुळले गेले आहे. 


टिप्पण्या