- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
save-reservation-give-power-: आरक्षण वाचवायचे असेल तर वंचितला सत्ता द्या - ॲड. प्रकाश आंबेडकर ; अकोल्यातील धम्म मेळाव्याला उसळला जनसागर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : ओबीसींनी लक्षात घेतले पाहिजे की, विधानसभा निवडणुकीनंतर तुमचे शिक्षणातील आणि नोकरीतील आरक्षण जाणार आहे. एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण टिकवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. अकोल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, मागच्या लोकसभेत एकही ओबीसी खासदार निवडून आला नाही. उमेदवारी दिलीच नाही तर कसा निवडून येणार? उद्याच्या विधानसभेत सुद्धा तेच होणार आहे. वंचित बहुजन आघाडी ओबीसींच्या बाजूने आहे. वंचित बहुजन आघाडी ओबीसींचा लढा लढत आहे हे लक्षात घ्या. आपल्याला ओबीसींचे 100 आमदार निवडून आणायचे आहेत. जी चूक ओबीसींनी लोकसभेत केली, ती जर विधानसभेत केली तर आरक्षणाला मुकाल अशी परिस्थिती आहे. आज ओबीसींच्या घरात तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, आयएएस, इंजिनिअर आहेत. 1990 च्या आधी होता का ? तर नाही. व्ही. पी. सिंग यांनी आरक्षण दिल्यानंतर ते त्या पदावर गेले.
आरक्षणाचा प्रश्न हा ज्यांना आरक्षण मिळत आहे त्यांचा आहे. एससी, एसटी आणि ओबीसी यांना आरक्षण मिळत आहे. या विधानसभा निवडणुकीत आरक्षण हा कळीचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत ते लोक संविधान वाचवायचे आहे म्हणून गावोगाव फिरत होते. काँग्रेस - राष्ट्रवादी - सेना संविधान वाचवेल असे सांगत होती. पण लोकसभेनंतर घटनेतील आरक्षणावर पुन्हा हल्ला झाला. त्यावेळी हेच लोक बोलायला तयार नाहीत. आरक्षणावर सुप्रीम कोर्टाकडून हल्ला झाला. याला पाठिंबा भाजप देणार याबद्दल दुमत नाही. त्यांचे आरक्षणविरोधी धोरणच आहे. पण ज्याला या महाभागांनी काँग्रेसला मतदान द्यायला सांगितले, त्यांनीच भूमिका घेतली की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही लागू करू आणि तो आम्हाला मान्य आहे. असे म्हणत ॲड. आंबेडकर यांनी काँग्रेसला मतदान द्या असे म्हणणाऱ्या विचारवंतांवर केला.
सरकारी नोकऱ्यांपुरतेच आपण आरक्षण बघतो पण आरक्षणाची व्याप्ती आपण लक्षात घेत नाही. या तिन्ही पक्षाला मतदान द्या असे सांगणारे फुले, शाहू, आंबेडकरवादी आहेत. त्यामध्ये अधिकारी सुद्धा होते, दुसरे कोण नव्हते. ते फार विद्वान आहेत असं नाही. कारण ते जे अधिकारी झालेत ते आरक्षणामुळे अधिकारी झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नवनीतच्या गाईडमधून पदव्या मिळवणाऱ्यांच्या लक्षात येत नाही की, ज्या आरक्षणाच्या शिडीने आपण वर आलो. ती आरक्षणाची शिडी आता कापली जात आहे आणि अशाच लोकांना बाबासाहेबांनी म्हटलं होतं की, यांनी मला फसवलं आहे. जो समूह आपल्या कुटुंबाशी इमानदार राहू शकत नाही, तो चळवळीशी इमानदार काय राहणार तो विकाऊच राहणार आहे. असे विकाऊ आले तर दोन थोबाडीत लावा आणि त्याला पाठवून द्या, असेही ॲड. आंबेडकर म्हणाले.
ॲड. आंबेडकरांनी आरक्षणाला हृदयाची उपमा देत म्हटले की, तुमच्या शरीरातून हृदय काढलं, तर आपण जगू शकतो का? तसे आरक्षण ही एक व्यवस्था आहे. या देशातील बंधुभाव, समता आणि स्वाभिमानी जीवन जगण्याचे साधन म्हणजे आरक्षण आहे. हे साधन फक्त एससी, एसटीचे काढले जात नाही, तर ओबीसी समाजाचे सुद्धा काढले जात आहे.
धर्म धोक्यात नसून, आरक्षण धोक्यात आहे. त्यामुळे ते वाचवण्यासाठी आपलं मत एससी, एसटी आणि ओबीसींना जाईल इतर कोणाला जाणार नाही याची खूणगाठ आपण बांधली पाहिजे. तरच आपले आरक्षण वाचेल. एससी, एसटी वर्गीकरण आणि क्रिमीलेयर याचे समर्थन भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी करत आहेत. मग तुम्हाला वाचवणार कोण? ज्यांना लोकसभेत तुम्ही मतदान केले ते तुम्हाला वाचवणार आहेत का ? असा सवाल आंबेडकर यांनी या वेळी केला.
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सुद्धा त्यांनी हात घातला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या वर्गात सुद्धा दोन वर्ग आहेत. एक जातीला मतदान देणारा आहे. तो जातीसाठी माती खातो आणि उद्ध्वस्त होतो. त्यांना आपल्याला सांगावं लागेल की, जातीसाठी माती खाऊ नको तुला लुटणारा तुझ्याच जातीचा आमदार आणि खासदार आहे. जो पर्यंत सरकार हस्तक्षेप होत नाही, तो पर्यंत व्यापाऱ्यांवर नियंत्रण येणार नाही. हमीभावाचा कायदा आणायचे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिला. शासनाने दिलेला जो भाव आहे. त्या प्रमाणे इथल्या व्यापाऱ्याने तो घेतला पाहिजे. घेतला नाही, तर त्याला 5 वर्षांची सजा झाली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा