भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जुने शहरातील संवेदनशील भाग असलेल्या हरीहर पेठ परीसरात आज पुन्हा दोन गटात वाद झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत एका गटातील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर हा वाद परिसरातील एका पहिलवानावर दोन व्यक्तींनी हल्ला केल्याने झाला असल्याचे समजते.
अकोल्यातल्या याच हरिहर पेठ भागात 7 ऑक्टोंबर रोजी दगडफेक होऊन दंगल झाली होती. आज बुधवारी पुन्हा सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास किरकोळ वाद झाला. यामध्ये एका व्यक्तीला मारहाण झाल्याचे समजते.
या संदर्भात माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि दंगा काबू पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र या वादाची खबर शहरात पसरताच एका विशिष्ट समाजातील जमाव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. परंतू घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेच या जमावाला पांगविले. पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.
सध्या घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि दंगाकाबू पथक यासह आरसीएफचे पथक तळ ठोकून आहेत.
अकोल्यातील हरिहर पेठ येथे दोन दिवसा आधी दोन गटात राडा झाला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात 17 जणांना अटक केली तर 70 जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी चुकीच्या लोकांना ताब्यात घेतल असल्याचं म्हणत एका गटातील काही महिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. मात्र या नंतर परत जाताना एका गटाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप करीत दुसऱ्या गटाने जुने शहर पोलीस स्टेशनला आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी घेराव घातला. दोन्ही गटाकडून पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आल्याने काही काळ येथे तणावाची स्थिती निर्माण झाली.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील किल्ला चौक येथून या भागातील एक पैलवान जात असताना दोन इसमांनी त्यांना अडवून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात पहिलवान यांनी जुने शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयीतांवर पोलिसांचा वॉच असून आजच्या घटनेतील आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात येईल.
अकोला शहरातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्व प्रशासकीय यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुळकर्णी यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा