on-the-eve-of-dhanteras-diwali: धनतेरसच्या पूर्वसंध्येला ‘कस्तुरी’ चा दीपोत्सव 'चिपी ' च्या आदिवासी बांधवांसोबत...





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : दूर डोंगर पायथ्याशी. हिरवळीची महिरपी. वसली गावे छानसी. त्यात इवलेसे 'चिपी'.भारतीय संस्कृतीत दिवाळी हा सण सर्वात मोठा व आनंद देणारा. लहान थोर, गरीब श्रीमंत सर्वच या सणाची आतुरतेने वाट बघतात. घराचे रंगकाम, सुशोभीकरण, नवनवीन वस्तू, कपड्यांची खरेदी, फराळ व मिठाई,फटाके आदीची या निमित्ताने रेलचेल असते. समाजातील सर्वच लोक हा सण मोठया उत्साहात साजरा करतात. ज्यांची आर्थिक स्थिती सुदृढ आहे त्यांना हा आनंद सहज लुटता येतो. पण गरीब व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाच्या दिवाळीचं काय ? त्यातही सामाजिक प्रवाहापासून दूर व अतिदुर्गम भागात राहणाऱ्या उपेक्षित व वंचित आदिवासी बांधवांच्या   दिवाळीचं काय ? कस्तुरीनं नेमकी हीच बाब हेरली आणि धनतेरसच्या पूर्वसंध्येला तेल्हारा तालुक्यातील  अतिदुर्गम आदिवासी गाव 'चिपी ' येथील गावकऱ्यांसोबत दिवाळीचा सण साजरा केला.




त्यानिमित्त या संपूर्ण गावाला मिष्टांनाचे भोजन, लहान मुलांना नवीन कपडे व माता भगिनींना भाऊबीजेची भेट म्हणून नविन साडीचोळी दिली. तेथील आदिवासिंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्टने एक प्रामाणिक प्रयत्न केला. याप्रसंगी तेथील  लहान मुलांनी फटाके फोडून आणि आदिवासी बांधवानी पारंपारिक आदिवासी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कस्तुरी परिवाराचे मोठया उत्साहात स्वागत केले.





कस्तुरीच्या या सेवाभावी प्रकल्पास  कर्मयोग परिवार, कृष्णार्पण प्रतिष्ठान, स्व. अथर्व अनिल मुळे मल्टीपरपज फॉउंडेशन या सामाजिक संस्था व अनेक दानशूर मंडळीची साथ मिळाली.अतिशय आनंद देणाऱ्या या दीपोत्सवात कस्तुरीचे संस्थापक प्रा.ॲड.किशोर बुटोले यांचे सोबत माजी आमदार वसंतराव खोटरे, गजानन मानकर, संजय गायकवाड ( प्रकल्प प्रमुख ), संजय ठाकरे, यशवंत देशपांडे, अरुण सोनोने, प्रमोद दाते, डॉ. छाया देशमुख, शिला गहिलोत, अनघा सोनखासकर,चेतना आनंदानी, मीरा देशपांडे,संगीता जोध, कांचन डहाके, मीरा वानखडे, ज्योती सुलताने, दिलीप पांडे, प्रशांत माकोडे, प्रा. जगन्नाथ बर्डे, परेश जोगी, वसंत देशमुख, सचिन कुलकर्णी, सचिन मोडक, दामोदर नुपे व अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.





या सणाच्या निमित्ताने कस्तुरी आणि चिपीच्या आदिवासी बांधवांमध्ये अतिशय भावनिक व सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले. उपक्रमाची सांगता सक्रिय सहभाग देणारे स्वयंसेवक व मान्यवरांच्या सत्काराने करण्यात आली.



टिप्पण्या