akoli-geeta-nagar-crime-akola: ग्रामपंचायत निवडणुकीत जबरदस्ती मत मागत केला हल्ला;आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोली ग्रामपंचायत निवडणुक २०१२  मध्ये बळजबरीने मत मागत फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अकोला न्यायलयाने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेत तब्बल एका तपानंतर फिर्यादीस न्याय मिळाला आहे.



मंगळवार ८ ऑक्टोबर  रोजी  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर . एस . तिवारी यांनी आरोपी  मनिष मदन राठोड , वय अंदाजे ४१ वर्ष , व आरोपी  सुरज रमेश गोयर , वय अंदाजे ४२ वर्ष (दोघे रा . गिता नगर , एमरॉल्ड कॉलनी , जुने शहर अकोला ता . व जि . अकोला) यांना भा.दं.वि. कलम ३०७ अंतर्गत दोषी ठरवुन शिक्षा सुनावली आहे. 


घटनेची हकीकत अशी की, १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री अंदाजे १२.३० वाजता फिर्यादी उमेश लक्ष्मण जाधव , (रा . गिता नगर , जुने शहर) अकोला हे त्यांच्या कारने गिता नगर रोडने घरी जात असताना त्यांची कार मोहिते हॉस्पीटलजवळ लघुशंका करण्याकरीता उभी करुन खाली उतरले असता, तेथे बाजुला असलेले गुरुचंद अपार्टमेंट समोर दोन्ही आरोपी हे त्यांच्याजवळ आले. व फिर्यादी यांना म्हणाले की , अकोली येथे ग्रामपंचायत निवडणुक असल्याने मनिष राठोड याची वहिनी उमेदवार म्हणून उभी आहे. तिलाच निवडवून आणायचे आहे. तुमचे मतदान आम्हाला द्या. आमचा उमेदवार निवडून न आल्यास  तलवारी चालविल्या जातील, असे त्यांनी फिर्यादीला धमकी दिली. त्यावर फिर्यादीने त्यांना म्हटले की , निवडनुकीबाबत मला काही देणे घेणे नाही. तुम्ही तुमचे पाहुन घ्या, असे म्हटले असता आरोपीनी संगनमत करुन आरोपी मनिष राठोड याने त्याच्याकडे असलेला चाकू आरोपी सुरज गोयर कडे देवून आरोपी मनिष याने फिर्यादीला मागून पकडून  याला जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी सुरज गोयर याने फिर्यादीचे पोटात चाकुने वार करुन जिवाने मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले . म्हणून फिर्यादी याच्या पोटातून मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव सुरु झाला. म्हणून फिर्यादी प्राथमिक सरकारी दवाखान्यात इलाजाकरीता भरती झाला व त्याची प्रकृती जास्त चिंताजनक झाल्याने त्याला आयकॉन हॉस्पीटल अकोला येथे भरती करण्यात आले.  फिर्यादीला ०३ जानेवारी २०१३ रोजी शस्त्रक्रिया करुन सुट्टी देण्यात आली. 


यानंतर फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींविरुध्द भा.द.वि. कलम ३०७ सहकलम ३४ अन्वये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती न्यायालयात आरोपीं विरुध्द दोषारोप पत्र सादर करण्यात आले. 


या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरीता एकुण १२ साक्षीदार तपासले. साक्षीदारांचा पुरावा ग्राहय मानुन  न्यायालयाने आरोपी  मनिष मदन राठोड व आरोपी सुरज रमेश गोयर यांना ३०७ भा.द.वि. अंतर्गत दोषी ठरवुन प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी रु .५०,००० / - दंड व दंड न भरल्यास अतिरीक्त प्रत्येकी १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.



या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील  शाम खोटरे व अतिरीक्त सरकारी वकील आनंद गोदे यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली.  प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक  एस . के . फरताळे यांनी केला . तसेच पैरवी अधिकारी शाम बुंदेले व वैशाली कुंबलवार महिला पोलीस कॉन्सटेबल यांनी सहकार्य केले .

टिप्पण्या