youth-festival-2024-conclude: मी युवा महोत्सवातून कलाकार झालो-चला हवा येवू द्या फेम अंकुर वाढवेचे विधान ; अमरावती विद्यापीठ युवा महोत्सवाची सांगता




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत अकोल्यात आयोजित चार दिवसीय युवा महोत्सव "छात्र तरंग" चा समारोप 'चला हवा येवू द्या' फेम कलाकार अंकुर वाढवे याच्या प्रमुख उपस्थित झाला. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते होते. मान्यवरांच्या हस्ते चॅम्पियन ट्रॉफीचा बहुमान श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती संघाला प्रदान करण्यात आला.




या चार दिवसात अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यातील 203 महाविद्यालया अंतर्गत जवळपास आठ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामधील 81 प्रकारच्या प्रथम द्वितीय तृतीय व प्रोत्साहन पर बक्षिसांचे वितरण करण्यात आले. 





अंकुर वाढवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, मी युवा महोत्सवातून कलाकार झालो, तुम्ही पण व्हा, यश मिळवा.  गोपाल खंडेलवाल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ॲड. गिरीश देशपांडे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 



कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या विद्यापीठाचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. त्यासाठी आपण नेहमीच चांगले उपक्रम राबविण्यात असतो. युवा महोत्सव हा त्यातीलच एक भाग आहे. युवा महोत्सव आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यातील सुंदर आठवणी आपण घेऊन जा. त्या नेहमी आपल्याला ऊर्जा देत राहतील. चांगले नागरिक बना आणि जबाबदारीने आपली कर्तव्य पार पाडा, असे आवाहन केले.  




आज शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात चौथ्या दिवशी संपन्न झालेल्या नृत्य स्पर्धेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 17 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. यात विद्यार्थ्यांनी घुमर, बंजारा, गुजराती, दांडिया, आदिवासी, जोगवा धनगरी नृत्यांचे बहारदार सादरीकरण केले.



वादविवाद स्पर्धेमध्ये आज अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील 29 महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात आरडीजी महाविद्यालय अकोला,विधी महाविद्यालय अकोला, अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ, बाबाजी दाते महाविद्यालय यवतमाळ, पी एन महाविद्यालय पुसद, जिजामाता महाविद्यालय दारव्हा, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी यांचा सहभाग होता. प्रहसन व मूकनाट्य स्पर्धेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तेरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीसहभाग नोंदविला. यामध्ये प्रामुख्याने जीडी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग यवतमाळ, ईश्वर देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यवतमाळ, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, सुधाकरराव नाईक महाविद्यालय पुसद यांनी विविध विषयावर आपले नाट्य सादर केले. एकांकिका स्पर्धेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सहा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन,स्त्री-पुरुष समानता, शेतकरी आत्महत्या अशा जलंत विषयावर विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. 




रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावरील रांगोळी काढून आपली कला सादर केली. विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले, धरतीमाता, भारत माता, विठ्ठल, शिवपार्वती, स्वच्छ भारत संपन्न भारत, याशिवाय सामाजिक व सांस्कृतिक विषयांना आपल्या कलेच्या माध्यमातून रांगोळीत रेखाटले. मेहंदी कले अंतर्गत लघुचित्र, अलंकारिक, पोर्टेट, निसर्गचित्र, सिम्बॉलिक मेहंदी काढून विद्यार्थ्यांनी आपल्या कलांचे प्रदर्शन केले. शास्त्रीय नृत्य संगीत स्पर्धे अंतर्गत पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ताल व स्वर वाद्य वाजवून आपली कला सादर केली यामध्ये जवळपास 27 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. 



समूह गान स्पर्धेअंतर्गत पाचही जिल्ह्यामधील पंच्याहत्तर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये देशभक्ती व लोकगीते सादर करण्यात आली.पाश्चिमात्य गीत गायन स्पर्धेमध्ये पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


टिप्पण्या