shivaji-maharaj-statue-malvan: मालवण येथे स्वखर्चाने विशालकाय शिवपुतळा निर्माण करण्याची शिल्पकार वानखडे यांची तयारी



 


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राष्ट्रात अनेक ठिकाणी मोठमोठी टिकाऊ दर्शनीय शिल्पे निर्माण करून आपल्या कसबी प्रतिभेचे दर्शन घडविणाऱ्या महानगरातील सुप्रसिद्ध युवा शिल्पकार विशाल वानखडे यांनी मालवण येथील उध्वस्त झालेला विशालकाय शिवपुतळा स्वखर्चाने निर्माण करण्याची तयारी दर्शविली असून शासनाने प्रस्तुत पुतळा निर्माण करण्याची परवानगी देण्याची जाहीर मागणी केली आहे.



मालवण येथील कोसळलेल्या शिव पुतळ्यामुळे कसबी शिल्पकार वर्गाचा मानभंग झाला आहे. वास्तविक कोसळलेल्या पुतळ्यास दीर्घकाळ उभे राहण्याची प्रक्रिया न केल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला आहे. आपण भविष्यात कधीच न कोसळणारा टिकाऊ, दर्जेदार व सशक्त असा महाराजांचा पुतळा स्वखर्चाने निर्माण करण्यास तयार असून अल्पावधीतच हे निर्माण कार्य पूर्ण करू शकत असल्याचा दावा शिल्पकार वानखडे यांनी केला आहे. 


25 फूट उंचीचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प


वानखडे यांनी राष्ट्रात अनेक पुतळे निर्माण केले असून, त्यांनी 25 फूट उंचीचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रातील दुसऱ्या व राज्यातील प्रथम मोठ्या उंचीच्या आकाराचे शिल्प,वन्य प्राणी अभयारण्य मेळघाट येथील विविध पशूंची शिल्पे साकारून आपली कल्पकता सिद्ध केली आहे. 



अनेक दर्जेदार शिल्पांची निर्मिती 

महानगरातील टॉवर परिसरातील मुलीला गोल फिरवातानाचे आई मुलीचे शिल्प अनेक वर्षांपासून जसेच्या तसे उभे असून, हे शिल्प त्यांच्या टिकाऊ पणाची साक्ष देते. अनेक शिल्प वानखडे यांनी कुण्या अन्य शिल्पीची मदत न घेता स्वतः मेहनतीने निर्माण केली आहेत. शिल्पकलेत मास्टर डिग्री घेतलेल्या विशाल वानखडे यांनी आता पर्यंत अनेक महापुरुषांचे शिल्प तयार केले आहेत. त्यांची शिल्पे ही बँकॉक, थायलँड आदी देशात निर्यात होत असतात. त्यांचे सिंदखेड राजा येथील मातोश्री जिजाऊ यांचे बाणेदार शिल्प, टॉवर चौकातील लेक वाचवाचा संदेश देणारे सहा फुटी चित्र शिल्प, वशिंबा, माना, कुरुम येथील सामाजिक वनीकरणाच्या जैव उद्यानातील पशु पक्ष्यांची जिवंत वाटणारी शिल्पे, याराडा, परडा येथील डॉ आंबेडकर यांचा 15 फुटी पूर्णाकृती पुतळा, पर्यावरणाचे महत्व सांगणारे अचलपूरच्या वन विभागातील चित्रमय प्राणी शिल्पे आदी कला प्रकल्प अविस्मरणीय ठरली आहेत.



या अप्रतिम व सुरेख कलेमुळेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समवेत बहुसंख्य मान्यवरांनी वानखडे यांचे कौतुक केले आहे. आपला अनुभव, जिद्द व चिकाटी बघता शासनाने मालवण येथील शिवप्रतिमा आपल्या स्वखर्चाने निर्माण करण्याची परवानगी देऊन आपल्या कलेस वाव व छत्रपती शिवराय यांना या माध्यमातून मानवंदना देण्याची मागणी विशाल वानखडे यांनी केली. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वर्षभरातच कोसळतो ही दुर्दैवी घटना असल्याचे वानखडे यांनी म्हंटले.


टॉवर चौकातील लेक वाचवाचा संदेश देणारे चित्र शिल्प


2014 साली अकोल्यातील सुंदराबाई खंडेलवाल टॉवर येथील माय लेकीचा फुगडी खेळत असतानाचा पुतळा आपण तयार केला आहे. हा पुतळा पूर्णपणे हवेत आहे. फक्त पायांच्या पोवच्यावर उभा असलेला हा पुतळा वारा, पाऊस आणि अकोल्यातील 45 डिग्री तापमान सहन करूनही गेल्या 10 वर्षा पासून उभा आहे. आपण पुतळा तयार करत असतांना त्यासाठी लागणारे मटेरियल हे दर्जेदार व मजबूत तर वापरावेच लागते शिवाय त्या पुतळ्याला न्याय मिळेल अशा प्रकारचे कसब निर्माण करावे लागते. चित्रकला, शिल्पकला आदी कलांवर प्रेम करा, त्यांची विटंबना करू नका. पुतळे उभारायचेच आहेत तर त्या क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींकडून करून घ्या. राज्यात अजूनही कसबी,तज्ञ,अनुभवी चित्रकार, शिल्पकार, मूर्तिकार आहेत. त्यांच्या कडून शिल्प निर्माण करा, शिल्पकारांना सन्मानाची वागणूक द्या, असे वानखेडे म्हणाले.




मुळात मोठया आकाराची शिल्प निर्मिती कशी होते


एखादा कलाकार जेव्हा मोठे शिल्प तयार करत असतो, तेव्हा आधी त्या शिल्पाचे छोटे स्केल मॉडेल तयार करावे लागते. हे मॉडेल करत असतांना पुतळ्याची लांबी, रुंदी,  उंची, आणि त्याच्या आकाराचा विचार करून त्या पुतळ्याचा खालील भाग हा त्या नुसार डिझाईन करावा लागतो, त्यामुळे पुतळा ब्यालेंस कसा होईल आणि दीर्घकाळ टिकेल, या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून स्केल मॉडेलचे काम केल्या जाते. 10 ते 15 फूट पुतळा निर्माण करण्याचे काम हा शिल्पकार स्वतः करू शकतो. पण मात्र त्यापेक्ष्या जास्त उंची असेल तर तो पुतळा तयार करण्यासाठी  स्टॅक्चर इंजिनीयर सुद्धा लागतो, त्यांना पुतळ्याचा आतील स्टील स्टॅक्चर व पुतळा स्टॅन्ड करण्यासाठी काम कराव लागत. अशा प्रकारे मोठया पुतळ्यांची निर्मिती ही टेक्निकल पद्धतीने केली जात असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.





टिप्पण्या