political-news-shiv-sena-akola: आमदारांनी अपमानजनक वागणुक दिल्याने युवासेना (उबाठा) युवती अधिकारी प्रमुख पदाचा राजीनामा; खुशी भटकर यांचा पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट

               खुशी भटकर  





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बाळापूरचे आमदार तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते नितीन देशमुख यांनी एका पक्ष बैठक दरम्यान आपणास अपमाननास्पद वागणूक दिली असल्याचा आरोप करीत, याच कारणामुळे मी युवा सेना युवती अधिकारी प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचा गौप्यस्फोट अकोला युवा सेना युवती अधिकारी खुशी भटकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केला.


शासकिय विश्रामगृह येथे आज गुरुवारी सायंकाळी खुशी भटकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी, ज्या पक्षामध्ये महिलांना सन्मान मिळत नाही अशा पक्षामध्ये मी काम करण्यास असमर्थ आहे. यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच याबाबत राज्य कार्यकारिणीला कळविले असल्याचे खुशी भटकर यांनी यावेळी सांगितले.





मी सन 2019 आदीत्य संवाद या कार्यक्रमापासुन पक्षाला जुळली. तसेच सन 2021 मध्ये युवती सेनेच्या मुलाखती पार पडल्या तेव्हा पासुन युवती सेनामध्ये सक्रीय सहभागी राहलेली आहे. त्यानंतर सन 2022 मध्ये उपजिल्हा समन्वयक म्हणून माझी निवड करण्यात आली. तेव्हा पासुन मी सक्रीयपणे पक्षाने दिलेल्या प्रत्येक जवाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. माझे कार्य पाहता मला 7 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा युवती अधिकारी मुंबईवरून नियुक्ती जाहीर करण्यात आली. माझ्याकडे बाळापूर तालुका अकोला पश्चिम, अकोला पुर्व तसेच अकोट व बार्शिटाकळी तालुक्याची जवाबदारी सोपविण्यात आली होती. यादरम्यान मी युवती सेनेची बांधणी केली. तसेच खासदार अरविंद सावंत यांच्या अकोला दौऱ्यामध्ये माझ्या नेतृत्वामध्ये युवतींनी पक्ष प्रवेश सुध्दा केला होता, अशी पार्श्वभूमी खुशी भटकर यांनी सांगितली.




दरम्यान, 29 ऑगस्ट 2024 रोजी युवा सेनेच्या राज्यकार्यकारिणी सदस्या धनश्री कोलगे या अकोल्यामध्ये आढावा बैठकी करीता आल्या होत्या. यावेळी आमदार नितिन देशमुख व जिल्हयातील शिवसेनेचे पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते. त्यांचे शासकीय विश्रामगृह अकोला येथे आगमन झाल्यानंतर मी व माझ्यासोबत आलेल्या युवती त्यांचे स्वागत करण्याकरीता जात असताना मला आमदार नितिन देशमुख यांनी स्वागत करण्यापासुन रोखले व मला तुझे वडिल इतर पक्षाच्या नेत्यांसोबत राहतात आणि तु आमची जिल्हा प्रमुख म्हणून काम करते हे योग्य नाही. तसेच तुला कोणी ओळखत नाही. आमच्यामुळे तुझी ओळख निर्माण झाली आहे. तसेच तुझ काय काम आहे हे मला अद्यापही दिसले नाही. असे म्हणून डिवचले. यावेळी त्याठिकाणी शिवसेनेचे ५० ते ६० पदाधिकारी सुध्दा उपस्थित होते. त्याच्या समोरच आमदार मला बोलत राहले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्या धनश्री कोलगे यांनी सुध्दा आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते तरी बोलतच होते. मी त्यांना या विषयाबाबत मला शहर प्रमुखांचा आधीच फोन आला होता व मी त्यांना यासंदर्भात स्पष्टीकरण दिले होते. व त्यानंतर त्यांनी सुध्दा हा काही महत्वाचा मुद्या नाही असे मला सांगितले होते, असे पत्रकार परिषदेत खुशी भटकर यांनी सांगितले.





हा प्रकार एका युवती पदाधिकारी सोबत सर्वासमक्ष होणे ही अत्यंत निदंनीय व अपमानजनक बाब आहे. सदर विषयाबाबत आमदार हे माझ्यासोबत वेगळी चर्चा सुध्दा करू शकले असते. तर मला सुध्दा चांगले वाटले असते. पंरतु सर्वासमक्ष असा विषय करणे म्हणजे हेतुपुरस्सरपणे दबाव टाकण्यासारखेच असून यामूळे माझ्या समक्ष असलेल्या युवती व मी प्रचंड मानसिक तणाव सहन केला. सदर बाब ही अत्यंत गंभिर असून अशा वातावरणामूळे कोणत्याही महिला पदाधिकारी पक्ष कार्यच करू शकत नाही. ज्या पक्षामध्ये महिलांना सन्मान मिळत नाही अशा पक्षामध्ये मी काम करण्यास असमर्थ आहे. यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. याबाबत मी राज्यकार्यकारिणी सदस्या धनश्री कोलगे हयांना सुध्दा मी माझा राजीनामा सादर केला असल्याचे खुशी भटकर यांनी सांगितले.




घडलेल्या प्रकारानंतर आमदार देशमुख यांच्याशी माझा कुठलाच संपर्क झालेला नाही. किंवा मी त्यांच्याशी भेटलेली नाही, असे देखील खुशी भटकर यांनी स्पष्ट केले. तर अद्याप दुसऱ्या पक्षात जायचे की नाही, हे अजून ठरविले नाही. मात्र माझे सामजिक कार्य सुरूच राहील, असे खुशी भटकर यांनी सांगितले.



टिप्पण्या