ganeshotsav-eid-milad-2024: अकोल्यात श्री गणेश विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला; तर ईद मिलादुन्नबीचा जुलूस 19 सप्टेंबरला निघणार



ठळक मुद्दा 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व ईद मिलाद उन नबी जुलूस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा ऐतिहासिक एकमुखी निर्णय 




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अतिसंवेदशील असणाऱ्या अकोला शहरात गणेश विसर्जन मिरवणुक आणि ईद मिलादचा जुलूस धार्मिक आणि पारंपारिक रित्या दरवर्षी कायदा आणि सुव्यवस्था कायम राखत उत्साहात पार पडतो. मात्र याआधी झालेल्या घटनांचे शल्य आजही दोन्ही समाजाच्या मनात खोलवर रुतलेले आहे. अशातच यावर्षी सुध्दा ईद ए मिलाद आणि गणेश उत्सव एकत्र येत आहे. याआधी सुध्दा एकवर्षी दोन्हीं उत्सव एकत्रित आले होते. अकोला सारख्या अती संवेदनशील शहरात उत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गणेश विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला आणि त्यानंतर दूसऱ्या दिवशी ईद ए मिलाद उन नबी जुलूस निघणार आहे. मागील वेळी सुध्दा असा निर्णय घेण्यात आला होता. या एतिहासिक एकमुखी निर्णयाचे राज्यभरातून कौतुक झाले होते. इतर जिल्ह्यातही याचे अनुकरण करण्यात आले होते. यावर्षी सुध्दा हा निर्णय घेण्यात आला असल्याची  माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता यांनी दिली.




शुक्रवारी हॉटेल ग्रीनलँड कॉटेज येथे हिंदु मुस्लिम एकता समितीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये श्री गणेश विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला 17 सप्टेंबर रोजी आणि ईद मिलादुन्नबी जुलूस 19 सप्टेंबरला निघणार असल्याचे समन्वय समितीने घोषित केले.


महानगरातील गणेश मंडळाचे गत 130 वर्षापासून सुयोग्य संचालन व व्यवस्थापन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व ईदएमिलाददुन्नबी जुलूस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वय कमिटीच्या झालेल्या संयुक्त महत्वपूर्ण बैठकीत आगामी 17 सप्टेंबर रोजी येत असणाऱ्या गणेशोत्सवाची श्री विसर्जन मिरवणूक आपल्या निर्धारित तिथीस 17 सप्टेंबर रोजी होणार असून याचे पहिल्या दिवशी म्हणजेच गणेशोत्सवच्या नवव्या दिनी 16 सप्टेंबरला येत असणारा ईद मिलादुन्नबीचा जुलूस हा दोन दिवसानंतर 19 सप्टेंबर रोजी आपल्या पारंपारिक मार्गाने निघणार असल्याची घोषणा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तथा ईद मिलाद दुन्नबी कमिटीच्या वतीने शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. 




यंदा अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबरच्या आदल्या दिवशी मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद ए मिलाद उन नबी हा सण येत असल्यामुळे दोन्ही समाजाच्या वतीने समाजात सामाजिक शांती निर्माण होऊन हिंदू मुस्लिमांचे हे दोन्ही सण आनंदाने पार पाडता यावे, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, महासचिव सिद्धार्थ शर्मा, ईद ए मिलाद उन नबी कमिटीचे अध्यक्ष हाजी मुदाम व कच्छी समाज व कच्छी मज्जिदचे अध्यक्ष जावेद जकारिया आदींनी संयुक्त बैठक घेऊन या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निर्णयाला जिल्ह्यातील सर्व उलेमा व मौलवींनी पाठिंबा दर्शवीत मुस्लिम समाजात गणेश विसर्जनाच्या दोन दिवसानंतर  19 सप्टेंबर रोजी महानगरात आपली पारंपारिक ईद मिरवणूक काढणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची घोषणा शुक्रवारी स्थानीय ग्रीनलँड कॉटेज येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. 



यावेळी सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, महासचिव सिद्धार्थ शर्मा, कार्याध्यक्ष हरिश अलिमचंदानी, संग्राम गावंडे, मंडळाचे पदाधिकारी विजय जयपिल्ले,  विजय तिवारी, मनोहर पंजवानी, मनोज खंडेलवाल,  ईद ए मिलाद उन नबी जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी मुदाम, सय्यद जकीमिया नक्षबंदी, मुफ्ती ए अकोलाचे गुलाम मुस्तफा, मौलाना शम्स तरबेज, कच्छी मज्जीद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद जकरिया आदी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.





दरम्यान श्री विसर्जनाच्या दिनी ताजना पेठ येथे मुस्लिम समाजाच्या वतीने मिरवणुकीचे पदाधिकारीचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने देखील गांधी चौक येथे ईद मिरवणुकीचे स्वागत करण्यात येणार असल्याचे यावेळी सिद्धार्थ शर्मा यांनी सांगितले. दोन्ही समाजात हिंदू मुस्लिम भाईचारा वाढवा यासाठी हा अभिनव उपक्रम  अकोला येथे दुसऱ्यांदा साकार करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 




श्री मिरवणूक ही 17 सप्टेंबर रोजी जयहिंद चौक येथून प्रारंभ होवून ती सरदार पटेल चौक, अगरवेस दगडी पूल, वीर हनुमान चौक, तपस्वी बाबा चौक, नागपूर जिन ,कॉटन मार्केट, टिळक रोड, मंगलदास मार्केट, दीपक चौक, तेलीपुरा मार्ग कच्छी मज्जिद ताजना पेठ येथे येवून यानंतर सराफा बाजार, गांधी चौक, सिटी कोतवाली मार्गाने गणेश घाट येथे श्री विसर्जन मिरवणुकीचे समापन होणार आहे. येथून मोठी मंडळ आपल्या परीने काटेपूर्णा, बाळापूर येथे जावून श्रीच्या मोठ्या मुर्तींचे विसर्जन करणार आहे. 





त्याचप्रमाणे 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता  ताजना पेठ पोलीस चौकी पासून मुस्लिम समाजाचा भव्य ईद मिलाद मिरवणुकीस पारंपारिक मार्गाने प्रारंभ होणार आहे. हा उत्सव जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी उलेमा मौलवी आदींच्या उपस्थितीत होणार आहे. हिंदू मुस्लिमांच्या भावना जोपासणाऱ्या या दोन्ही मिरवणुकीत दोन्ही समाजाने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी ईद ए मिलाद उन नबी जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी मुदाम यांनी केले. 




पत्रकार परिषदेत दोन्ही समितीच्या अध्यक्षानी एकमेकांना मिठाई देवून आणि स्वागत करुन निर्णयाची घोषणा केली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मनोज साहू, मनिष हिवराळे, जयंत सरदेशपांडे, मंगेश काळे, दिलीप खत्री, डॉ. अमोल रावणकर, ईद ए मिलाद उन नबी कमिटीचे अध्यक्ष हाजी मुदाम खान, सय्यद जकी मिय्यां, मुफ्ती ए अकोला  हजरत गुलाम मुस्तफा, कच्छी मज्जिदची  इमाम हजरत मौलाना मुफ्ती, मौ. सादिक अख्तर, हाफिज मकसूद, माजी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, माजी नगरसेवक नकीर खान, जावेद तेली, कमिटीचे कोषाध्यक्ष शफी सूर्या, अजाज पहिलवान आदींसह  हिंदू मुस्लीम एकता समन्वय समितीचे  बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जावेद जकरीया यांनी केले.



टिप्पण्या