भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून आलेख दिवसेंदिवस चढत आहे. आज रविवारी भरदिवसा भररस्त्यात आमदार पुत्रावर जीवघेणा हल्ला झाल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर आज काही गुन्हेगारांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या एका कापड दुकानाबाहेर पृथ्वी देशमुख उभा होता. त्यावेळी तेथे गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या इसमांनी पृथ्वी देशमुख याला मारहाण केली. या मारहाणीत पृथ्वी थोडक्यात बचावला.
आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच, शिवसेना (ठाकरे गट) चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल झाले. हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.या हल्ल्या मागे राजकिय कारण असल्याचे बोलल्या जात आहे.
दरम्यान पृथ्वी देशमुख याने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाइन्स पोलीस करीत आहेत.
या घटने नंतर आमदार नितीन देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढत आहेत. आज माझ्या मुलावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने तेथून स्वतःला वाचवत पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मी वारंवार एसपी साहेबांना विनंती केली, शहरात गुन्हेगारी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी 15 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या झाली होती. आज तशाच पद्धतीने अचानक माझ्या मुलाच्या अंगावर प्राणघातक हल्ला केला आहे. एकजण चाकू घेऊन आला होता, तर एका जणाने फरशी डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. माझा मुलगा आणि त्याचा मित्र दोघांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. नाहीतर आज मोठा अनर्थ घडला असता. काही दिवसांपूर्वी आम्ही एसपी साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. आज पोलीस ठाण्यात आलो तर तीनच पोलीस हजर होते. एवढे मोठे पोलीस ठाणे असून देखील अर्धा तास कोणीच नव्हतं. विनंतीनुसार काय कारवाई करतात हे पाहू. पण आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर गाव गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल, असा इशारा नितीन देशमुख यांनी यावेळी दिला.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून,परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली असता, ही संपूर्ण घटना एका ठिकाणच्या cctv बद्ध झाली असून, आरोपींचे चेहरे यात दिसत आहेत. हल्लेखोर 30 ते 40 वर्ष वयोगटातील असल्याचे दिसते. यादिशेने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान आरोपी हे कृषि नगरातील रहिवासी असल्याचे समजते. घटने नंतर पोलीस स्टेशनला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी देखील तातडीने पोहोचल्यामुळे या घटनेला वेगळे राजकिय वळण लागण्याची शक्यता आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा