farmers-movement-murtijapur: सरकारकडे लाडक्या बहिणींसाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही - शेतकरी नेते रविकांत तुपकर




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सततच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर शहरात आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी संघर्ष समितीने ' दहीहांडी आक्रोश मोर्चा’ काढला होता. 



ई - पीक पाहणी रद्द करा , कापसाला 12 हजार सोयाबीनला 7 हजार रुपये भाव , शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती , जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा यासह अनेक मागण्यासाठी हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला.  मोर्चात पंचक्रोशीतील शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते. हजारो शेतकऱ्यांनी सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत मूर्तीजापुर अक्षरशः दणाणून सोडले होते.





यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सोयाबीन आणि कापसाने भरलेली हांडी फोडली. ही हंडी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची प्रतिक होती. 


लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारकडे पैसा आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, अशी बोचरी टीका तुपकर यांनी यावेळी केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागणी नसलेल्या योजनांवर सरकार पैसे खर्च करते, पण शेतकरी-कष्टकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसे नाहीत ,असे तुपकर म्हणाले. शेतकऱ्यांनी एकजुट दाखवत राजकीय वोट बँक तयार करणे गरजेचे आहे. तरच सरकार शेतकऱ्यांवर लक्ष देईल. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा. अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर  शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दहीहंडी फोडतील, असा इशारा यावेळी तुपकर यांनी दिला.




यावेळी गजानन अहमदाबादकर, अमित अढाऊ, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, सतीश ईडोळे, श्रीकांत ठाकरे, संजय सोनुने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांनी सहभाग घेतला होता.


मोर्चाचे यशस्वी आयोजन चंद्रशेखर गवळी, नितीन गावंडे, राहुल वानखेडे, रियाज शेख, नितीन खेडकर, निलेश घुलाने, शुभम जवंजाळ, रामदास भगत, अरुण धरमाळे यांच्या शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.





 


अश्या आहेत प्रमुख मागण्या 



*कोणत्याही अटी शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्यात यावी,

 

*मुर्तिजापूर-बार्शिटाकळी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 50,000 रु. तात्काळ मदत द्यावी, 


*एच.डी.एफ.सी. पिक विमा इन्शुरन्स कंपनीने 2023 मध्ये खरीप व 2024 रब्बीचे सर्व क्लेम मंजुर करुन ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले नाही अशा शेतकऱ्यांना पात्र धरुन तात्काळ मदत द्यावी,


*ई-पीक पाहणीची अट रद्द करावी व 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 वर ई-पीक ची नोंद नाही आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 2021 व 2022 चा पिक पेरा ग्राह्य धरून सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना जी हेक्टरी 5,000 रु. मदत मिळणार आहे ती द्यावी,


*मुर्तिजापूर-बार्शिटाकळी तालुक्यामधील शेतकऱ्यांना शेतीसाठी 24 तास विज उपलब्ध करुन शेतकऱ्यांनी शेतीच्या विज कनेक्शन करीता अर्ज केलेले आहे त्यांची विज जोडणी द्यावी व ज्या तात्काळ करावी तसेच जे विद्युत रोहित्र नादुरुस्त आहेत ते ताबडतोब दुरुस्त करुन देण्यात यावे,

 

*सोयाबीनाला 7,000 रु. व कापसाला 12,000 रु. प्रति क्विंटल भाव बाजार समितीमध्ये स्थिर करण्यात यावा,


*वन्य प्राण्यापासुन शेतीचे संरक्षण होणे करीता 90% अनुदान तार कंपाऊंडसाठी देण्यात यावे. 







टिप्पण्या