crime-thieves-active-festivals: सण उत्सवात चोरट्यांची चांदीच चांदी; गर्दीत नागरिकांच्या महागड्या वस्तूंवर हात साफ




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : सध्या गणेश उत्सवाची शहरात धामधूम सुरू आहे. सार्वजानिक ठिकाणी गर्दी होत असल्यानं चोरट्यांची चांदी आहे. गणेश मंडळात, बाजारात, उपहार गृहात अश्या ठिकाणी चोरटे अधिक सक्रिय झाले असून, नागरीकांच्या महागड्या वस्तूंवर हात सफाई करुन डल्ला मारत आहेत. गणेश स्थापना दिवशी अशीच एक चोरीची घटना सीसीटीव्ही बद्ध झाली आहे.




अकोल्यात गणेश स्थापनेच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी अनेक मोबाईल लंपास केले असल्याचे समोर आले आहे. एक मोबाईल चोरटा एका उपहारगृहाच्या सीसीटिव्हीत कैद झाला. या चोरट्याची मोबाईल चोरीची स्टाईल थक्क करणारी आहे. या चोरट्याने पहिले सावज हेरून सर्वप्रथम एक प्लास्टिकचा मोठा कागद आणला. नंतर मागे उभा राहत मोबाईल मालकाच्या खांद्यावर हात ठेवत कागद टाकून समोर धरला. आणि क्षणाचा विलंब न करता  त्याने हाताची करामत दाखवून मोबाईल मालकाच्या शर्टच्या खिशातून सहज मोबाईल लंपास केला. असं दृश्य कॅमेराबद्ध झालं आहे.




विशेष म्हणजे या चोरट्याने 8 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता चोरी करून पोलिसांना मोठे आव्हान दिले आहे. या संदर्भात आता रामदासपेठ पोलीस तपास करीत असून, आरोपीचा शोध घेत आहेत. मोबाइल मालक गिरिराज मल यांनी चोरीची तक्रार दिली असून, एक लाख किमतीचा मोबाईल असल्याचे यात म्हटले आहे.




दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी सण उत्सवाच्या काळात होणारी गर्दी बघता नागरिकांनी आपल्या महागड्या वस्तू, किंमती दागिन्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन अकोला पोलीस दलाने केले आहे.

टिप्पण्या