akola-ACB-action-trap-balapur: भ्रष्ट पोलीस अधिकारी, न्यायालय लिपिक आणि हॉटेल चालकावर अकोला एसीबीची कारवाई; 90 हजाराची लाच स्वीकारताना तिघांना रंगेहाथ अटक





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बाळापुर पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरिक्षक आणि त्याचे साथीदार न्यायालयातील लिपिक व हॉटेल चालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत. 90 हजार रुपयेची लाच स्वीकारताना आरोपी रंगेहाथ पकडल्या गेलेत. ही कारवाई आज दुपारी ऋतुराज हॉटेल, न्यायालयाचे समोर, वाडेगांव रोड, बाळापूर येथे करण्यात आली. 


एका फसवणुकीच्या प्रकरणात तपासात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून सहायक पोलीस निरीक्षक समाधान रिठे आणि त्यांच्या दोन साथीदारांना एसीबीने ताब्यात घेतले असून, या तिघांनी 90 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे समोर आले आहे. 


बाळापुर पोलीस स्टेशनमध्ये एका तक्रारकर्त्याचे फसवणुकीचे प्रकरण प्रलंबित होते. या प्रकरणात तक्रारकर्त्याने मदतीसाठी पोलीसांशी संपर्क साधला होता. परंतु सहायक पोलीस निरीक्षक समाधान रिठे यांनी तपासात मदत करण्याच्या बदल्यात दीड लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 90 हजार रूपये देणे घेणे ठरले होते. यानंतर तक्रारकर्त्याने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाला दिली. ज्यावर एसीबीने त्वरित कारवाई करत भ्रष्ट पोलीस अधिकारी, न्यायालय कर्मचारी आणि त्यांचा मदतनीस हॉटेल चालक विरूद्ध सापळा रचला.



या प्रकरणातील तक्रारदार यांनी 23 सप्टेबर 2024 रोजी अँटी करप्शन ब्युरो

अकोला येथे तक्रार दिली की, समाधान रिठे, सहायक पोलीस निरीक्षक, पो.स्टे. बाळापूर, जि. अकोला यांनी तक्रारदारा विरूध्द पो.स्टे. बाळापूर, जि. अकोला येथे अपराध क्रं. 468/24, कलम 420, 34 भा.दं.वि. अन्वये नोंद असलेल्या गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्याकरीता गोवर्धन कपले, लिपीक, नक्कल विभाग, दिवाणी न्यायालय, बाळापूर यांचे मार्फतीने तक्रारदाराकडे रूपये 1,50,000/- लाच रक्कमेची मागणी करीत आहे.


या तक्रारीनुसार शासकिय पंचासमक्ष 23 सप्टेंबर रोजी गैरअर्जरदार यांची तक्रारदाराकडे असलेल्या लाच मागणी पडताळणी करण्यात आली. यामध्ये  समाधान रिठे (वय 51), सहायक पोलीस निरीक्षक यांनी तक्रारदाराकडे दीड लाख लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती 90 हजार लाच रकमेची मागणी करून ती लाच रक्कम गोवर्धन कपले (वय 48), लिपीक यांचेकडे देण्यास सांगितले. तसेच गोवर्धन कपले, लिपीक यांनी लाच रकमेबाबत तडजोड करून सदर लाच मागणीच्या व्यवहारास प्रोत्साहन देवून सदरची लाच रक्कम स्वतः स्विकारण्याची तयारी दर्शविली.

त्यावरून आज 24 सप्टेंबर रोजी ऋतुराज हॉटेल, वाडेगांव रोड, बाळापूर येथे सापळा कार्यवाही दरम्यान गोवर्धन कपले, लिपीक यांचे सांगण्याप्रमाणे  सदानंद भिमराव कांबेकर (वय 39), व्यवसाय ऋतुराज हॉटेल चालक, न्यायालयाचे समोर, वाडेगांव रोड, बाळापूर यांनी तक्रारदाराकडुन लाच रक्कम 90 हजार  स्विकारल्याने तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरुद्ध  पोलीस स्टेशन बाळापूर (जि. अकोला) येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती अकोला एसीबी ने दिली आहे.


ही कारवाई पोलीस अधिक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधिक्षक  अनिल पवार (लाप्रवि अमरावती) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक मिलींदकुमार बहाकर, पोलीस अंमलदार राहुल इंगळे, डिगांबर जाधव, प्रदिप गावंडे, किशोर पवार, संदीप ताले, निलेश शेगोकार (सर्व लाप्रवि.अकोला) तसेच पोलीस निरीक्षक योगेश दंदे, (लाप्रवि. अमरावती) व त्यांचे पथकांनी केली आहे.


कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी इसमाने त्यांचे कोणतही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला येथे नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन मिलींदकुमार बहाकर पोलीस उपअधिक्षक व सचिन सावंत पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.







टिप्पण्या