- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
agricultural-production-pdkv: तर्कसंगत कृषी उत्पादन शिवार फेरी आयोजनाचा मुख्य उद्देश - कुलगुरू डॉ शरद गडाख
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
तीन दिवसीय शिवार फेरीचे शानदार उद्घाटन
शिवार फेरीसाठी कृषी विद्यापीठात उसळला जनसागर पहिल्याच दिवशी तब्बल 10 हजाराहूनही अधिक शेतकरी बंधू भगिनींनी जाणून घेतले आधुनिक कृषि तंत्रज्ञान!
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: देशातील कृषी उत्पादन वृद्धीसाठी प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय महत्त्वाचे आहे. शिवार फेरी चे आयोजन तर्कसंगत कृषी उत्पादन वाढीच्या दृष्टीने कृषी तंत्रज्ञान हस्तांतरण व अवलंबा मधील महत्त्वाचा पैलू असल्याचे सांगताना जगाचा पोशिंदा शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिक संपन्न होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरासह बाजारपेठेच्या मागणीनुसार शेती कौशल्य विकसित करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी केले.
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत शुक्रवार 20, शनिवार 22 व रविवार 23 सप्टेंबर 2024 दरम्यान आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीचे उद्घाटन शुक्रवार 20 सप्टेंबर रॊजी संपन्न झाले. याप्रसंगी उपस्थित शेतकरी बंधू-भगिनींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे महासंचालक रावसाहेब भागडे, भारत सरकारच्या निती आयोगाचे माजी सदस्य व्ही व्ही सदामते, विधान परिषद सदस्य आ.किरण सरनाईक , विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ.अमोल मिटकरी, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील, जनार्दन मोगल, हेमलता अंधारे, डॉ. वाय जी प्रसाद, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथील संचालक शिक्षण तथा संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर,नागपूर विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे, कुलसचिव सुधीर राठोड, विद्यापीठ अभियंता सतीश देशमुख, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती लाभली होती.
कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेला माल्यर्पण तथा दीप प्रज्वलनाने सुरुवात झालेल्या या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक तथा स्वागत पर भाषण विस्तार शिक्षण संचालक डॉ.धनराज उंदीरवाडे यांनी केले. विद्यापीठातील विविध उपलब्धीसह शाश्वत शेती संपन्न शेतकरी संकल्पना वास्तवात आणण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्नांना अधोरेखित करताना कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यापीठापद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली व आत्मनिर्भर विद्यापीठ निर्मितीसाठी काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या. तत्पूर्वी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ.धनराज उंदीरवाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात शिवारफेरी दरम्यान शेतकऱ्यांकरिता उपलब्ध असलेल्या विविध पिकवाण व कृषी तंत्रज्ञानाचा गोषवारा सादर केला.
भारत सरकारच्या नियोजन विभागाचे माजी सदस्य डॉ. व्ही व्ही सदामते यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना पीक प्रात्यक्षिकांचे रूपांतरण शेतकऱ्यांच्या पीक उत्पादन वाढीत झाले पाहिजे तसेच गाव पातळीवर याचे अवलंबन होणे गरजेचे असल्याचे विचार व्यक्त केले. या कार्यात कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका महत्त्वाची असल्याचे विशद करून विद्यापीठाद्वारे आयोजित शिवार फेरी उपक्रम तंत्रज्ञान हस्तांतरण व अवलंबा मधील महत्त्वाची कडी असल्याचे नमूद केले.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात विधान परिषद सदस्य ॲड. किरण सरनाईक यांनी सध्या यांत्रिकी शेतीचा अवलंब वाढत असल्याचे नमूद करून त्यासाठी तंत्रकुशल कामगारांची गरज प्रतिभाधित केली. कृषी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन मानधनावर नियुक्त केल्यास तांत्रिक मनुष्यबळाची पूर्तता करणे शक्य असल्याचे सांगितले. त्याचवेळी विद्यापीठाचे चर्चासत्र आयोजन अतिशय प्रशंसनीय उपक्रम असल्याचे सांगून ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या लक्षात घेता त्यांच्या करिता समस्या आधारित विशेष चर्चासत्र आयोजित करण्याची शिफारस केली.
यावेळी बोलतांना विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी विद्यापीठाच्या शिवार फेरी आयोजन एक स्तुत्य उपक्रम असल्याचे नमूद करून शेतकरी हितांच्या शासकीय योजनांची अतिशय उपयुक्त माहिती दिली. महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाला उन्नत व प्रगत राज्य म्हणून नुकतेच वर्ल्ड ऍग्री फोरम द्वारे गौरवान्वित करण्यात आल्याचे नमूद करून विद्यापीठाच्या प्रगत तंत्रज्ञानाची व शेतकरी हिताच्या दृष्टीने राबवित असलेल्या विस्तार कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अकोला कृषि विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन तथा विस्तार कार्यात अग्रेसर असून विद्यापीठाच्या समस्या शासनाने गंभीर्याने घेत शेती आणि शेतकरी हित जोपसण्यास मदत करावी असे देखील प्रतिपादन केले.
अकोला जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी समायोचित मार्गदर्शन करीत अकोला कृषि विद्यापीठाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाला वाखाणाले.
यावेळी शिवार फेरी सभामंडळात शेतकरी बंधू -भगिनी, युवक -युवतीची उपस्थिती होती. उद्घाटन सत्राच्या सभेचे सूत्रसंचालन विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांनी केले.
दरम्यान आज सकाळी 9 वाजेपासूनच विद्यापीठाचे शेतकरी सदन येथे शेतकरी बांधवांनी नोंदणीस सुरुवात करीत नोंदणी नंतर विद्यापीठाचे वाहनाद्वारे नियोजित २४ संशोधन विभागांना प्रत्यक्ष भेटी देत अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान जाणून घेतले व उपस्थित शास्त्रज्ञांकडून शंका समाधान केले.
यंदा देखील अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवाय फेरीचे नियोजन करण्यात आले असून गहू संशोधन विभागाचे २० एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकूण 210 विविध पिकांच्या जाती लावण्यात आल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांचे जाती आदींचा समावेश आहे. तसेच विद्यापीठाचे महत्वाचे तंत्रज्ञान शिफारशी चे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले आहेत. या प्रक्षेत्रावर शेतकरी बांधवांची अभूतपूर्व गर्दी उसळलेली होती.
आज शिवार फेरीच्या पहिल्याच दिवशी 10 हजाराहूनही अधिक शेतकरी बंधू-भगिनींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वसा सोबत नेण्यासाठी गर्दी केली होती. अधिकाधिक शेतकरी बंधू भगिनीनी शिवार फेरीत सहभागी होण्यासाठी कृषि विभाग व इतर संस्था देखील प्रयत्नशील असून शेतकरी बंधू भगिनी, युवक युवती, विद्यार्थी विद्यार्थिनी, विस्तार कार्यकर्ते आदिनी सहपरिवार शिवार फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी केले आहे.
एका दिवसभरात संपूर्ण विद्यापीठाचे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी उशीर न करता सकाळी 9 वाजता शेतकरी सदन येथे नोंदणी करून शिवार फेरीसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.
उद्यान विद्या विभाग सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र शेतमाल प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय कापूस संशोधन विभाग लिंबूवर्गीय फळे संशोधन विभाग सोयाबीन प्रक्षेत्र ज्वारी संशोधन विभाग धान्य संशोधन विभाग तेलबिया संशोधन विभाग कोरडवाहू संशोधन विभाग यासह पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग आणि नागार्जुन वनौषधी उद्यानाला शेतकरी बंधू भगिनींची गर्दी झालेली पाहून विद्यापीठातील सर्वांचाच उत्साह द्विगुणीत झाला होता.
उद्या दिनांक 21 सप्टेंबर रोजी पाणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमिर खान हे शिवार फेरीला भेट देणार असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी शेतकऱ्यांना केली आहे.
चर्चासत्र कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी तेलबिया , कडधान्य औषधी व सुगंधी वनस्पती रोगशास्त्र तसेच कृषी अभियांत्रिकी विषयक प्रश्न विचारले. यावेळी विद्यापीठातील संबंधित विषयाच्या शास्त्रज्ञांनी त्यांची समर्पक उत्तरे देऊन शेतकऱ्यांचे शंका समाधान केले.
शिवार फेरीचे यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनात संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांचे नेतृत्वात सर्व समित्यांचे अध्यक्ष, सदस्य, यांचे सह विद्यापीठातील सर्वच वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी वर्गाने अथक परिश्रम घेतले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा