reservation-rescue-yatra-akola : 179 कुटुंबीयांना सर्वाधिक भिती जरांगे पाटलांची - प्रकाश आंबेडकर




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आलेली आरक्षण बचाव यात्रा आज अकोला जिल्ह्यात होती. यावेळी पातूर येथील सभेत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा ओबीसींना विधानसभेत मराठा उमेदवारांना रोखण्याचे आवाहन केलं. पातूर येथे आयोजित सभेत प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची स्तुती केली. 






जरांगे आमच्यापेक्षा हुशार असून त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाचा माध्यम घेतला. आम्हाला तीर चालवता आलं नाही. मात्र, त्यांनी एका तीर मध्ये दोन निशाणे साधले असल्याचं आंबेडकर म्हणाले.


श्रीमंत मराठ्यांना ओबीसी कडून धोका नसून, धोका जरांगे पाटील यांचा आहे. पण व्हाया ओबीसी असा असून, 179 कुटुंबीयांची सत्ता टिकवण्यासाठी बळीचा बकरा हा ओबीसीच्या आरक्षणाला दिला जात असल्याचंही आंबेडकर म्हणाले. 179 कुटुंबीयांना सर्वाधिक भीती जरांगे पाटलांची असून जरांगे पाटील मोठे झाले तर सत्तेचा सार्वत्रिकरण होईल आणि त्यामुळे सत्ता सुद्धा मोकळी होईल, विकास होईल आणि त्यामुळे 179 कुटुंबीयांना महाराष्ट्र लुटता येणार नाही, अशी खोचक टीका ही यावेळी आंबेडकरांनी केली.




मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस



वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर भाष्य करताना मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे. जर ते विधानसभा निवडणुकीला उतरले नाहीत तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे, यावर शिक्कामोर्तब होईल, असा घणाघात आंबेडकर यांनी अकोल्यातून केला.



प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आवाहन केले होते की, महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना ठाकरे गटाने मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. मात्र त्यांनी मराठा आरक्षण बाबत संदिग्ध भूमिका घेतली आहे.


ओबीसी-मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं असताना प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज अकोला जिल्ह्यात दाखल झाली. यात्रेचे अकोला शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. टॉवर चौकात आंबेडकर यांनी स्वागत स्वीकारून उपस्थिताना संबोधित केले.


यावेळी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष अन् नेते तयार आहेत. मात्र ओबीसींचं आरक्षण वाचवायला कुणीच तयार नाही. यामुळेच आपण ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मी जर ही यात्रा काढली नसती तर राज्यात दंगली झाल्या असत्या. आता वातावरण निवळलंय,असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.



राज्य सरकारचा निधी परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता, यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अशा लोकांवर टाडा लावून त्यांना कारागृहात टाकलं पाहिजं. महाराष्ट्रातला माणूस यूपीमध्ये आहे, ओडिशा, बंगालमध्ये तसेच अन्य राज्यातही आहे. परराज्यातील मराठी माणसानं काय करायचं? समाजात द्वेष पसरवणारी ही वक्तव्ये आहेत. यामुळे समाजासोबतच देशही दुभंगतो. यूएपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्टनुसार अशा लोकांवर कारवाई करायला पाहिजे.




7 ऑगस्टला यात्रा औरंगाबादला पोहचणार आहे. 7 ऑगस्ट रोजी विश्वनाथ प्रतापसिंग यांनी ओबीसी आरक्षणाची घोषणा केली होती. त्याची आठवण राहावी, यासाठी मंडल दिन मनविला पाहिजे. सरकार मानो या ना मानो पण नागरिकांनी हा दिवस मानला, हा संदेश गेला पाहिजे, असे यावेळी आंबेडकर म्हणाले.



टिप्पण्या