nitin-deshmukh-ACB-inquiry: निवडणुकीच्या तोंडावर आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर; बेहिशोबी मालमत्ताची चौकशी

file photo 


 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अमरावती परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शिवसेना ठाकरे गटाचे  बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आता एसीबीने आमदारांचे पाल्य शिक्षण घेत  असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावून त्यांच्या शैक्षणिक खर्चाची माहिती मागितली आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.



याशिवाय अमरावती एसीबीने अकोला जिल्हा परिषदेला देखील पत्र देवून आमदार नितीन देशमुख यांच्या विषयी सर्व माहिती मागितली आहे. आमदार नितीन देशमुख हे 2009 ते 2019 कालावधीत अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यांच्या या कारकीर्दीत त्यांनी काही घोटाळे केले आहेत का, याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केली जात असल्याचे कळते.


अमरावती परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांनी 4 जुलैला अकोल्यातील एका शाळेच्या  मुख्यध्यापकांना पत्र पाठवून आमदार नितीन देशमुख यांच्या दोन पाल्यांच्या शैक्षणिक शुल्काची माहिती मागविली आहे. 



आमदार नितीन देशमुख यांची उघड चौकशी केली जात आहे.  आमदार नितीन देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणावर शाळेत प्रवेश घेतल्यापासून आतापर्यंत आकारण्यात आलेल्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची माहिती एसीबी कार्यालयात तत्काळ सादर करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले. 



आमदार नितिन देशमुख हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ताचे आरोप करण्यात आले आहे. या प्रकरणाची गेल्या दोन वर्षांपासून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात 17 जानेवारी रोजी अमरावती येथील कार्यालयात आमदार नितीन देशमुख यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील हालचाली मंदावल्या होत्या. मात्र आता  ऐन निवडणुकीच्या तोंडावर या प्रकरणाची गती एकदम वाढली आहे.  त्यांच्या कुटुंबाची देखील माहिती घेवून चौकशी करण्यात येत असल्याचे कळते.


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर आल्याने राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर खोक्याच्या राजकारणाला ते बळी न पडल्याने त्याचा वचपा आता काढण्यात येत असल्याची आमदार समर्थकांमध्ये चर्चा आहे.






टिप्पण्या