mohanji-bhagwat-rss-in-akola: जिवाचे मैत्र कायम जपणे म्हणजे संघ, व तेच आपले ध्येय - डॉ. मोहनजी भागवत यांचे उद्बोधन





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सर्व जग आज चिंतेत आहे, दहशतवादाची भीती आहे अशा वातावरणात ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे सर्व जिवांचे मैत्र कायम जपणे हा संघाचा सिद्धांत मूर्त रूपाने प्रकट झाला आहे व तेच आपले ध्येय आहे. परस्परांशी असलेले ऋणानुबंध जपून आपणाला हा चमत्कार सर्वत्र करायचा आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले. 




मंगळवार, 6 ऑगस्ट रोजी येथील उत्सव मंगल कार्यालयात आयोजित संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यशवंत उपाख्य श्याम देशपांडे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.



स्वयंसेवक संघाचे काम करीत असताना आपलेपणा जगत असतो. संघकार्य करताना त्याला अनेक ठिकाणी आपलेपणाचा जो अनुभव येतो त्याचा त्याला आनंद मिळतो. सर्वांच्या सान्निध्यातून आनंद होणे हेच संघाचे खरे स्वरूप आहे.आपण जेथे आहोत तेथे आपलेपणा, जिव्हाळा निर्माण व्हावा असे वातावरण असावे असेही ते म्हणाले.



संघाचा आत्मा स्वयंसेवकच आहे. हिंदू धर्म, संस्कृती रक्षण आणि संवर्धनासाठी स्वयंसेवक कार्यरत असतो. काम करीत असताना अनेक बाबी त्याला शिकायला मिळतात. सोबतच अनेक ठिकाणी त्याचा आपलेपणाच्या भावातून ऋणानुबंध जुळतो हा भाव आणि जुळलेला ऋणानुबंध हीच संघशक्ती आहे. असे यावेळी ते म्हणाले.



        

संघ समजून घ्यायचा असेल तर सर्वजण आपले आहेत हा  भाव महत्त्वाचा आहे. काहींमध्ये क्वचित दोषही असतील तरी  त्याला आपलेपणाच्या भावाने जपले पाहिजे. अनेकजण संघात गेल्यास काय मिळते, असा प्रश्न करतात. संघात गेल्यास काही मिळत नाही. मिळतो तो आपलेपणा. पण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कुणाचा विश्वास बसणार नाही. हा पवित्र भाव आहे. तो संघाच्या कार्यपद्धतीत सहज वृद्धींगत होतो, असेही  यावेळी बोलताना मोहनजी भागवत म्हणाले.



        

संघ काम करताना अनेक मित्र जोडल्या गेले. त्यांच्यामुळे कठिण काळात संघकाम करता आले. तर आयुष्य जगण्यातही आनंद मिळाला. माझे जीवन घडण्यात संघाचा मोठा वाटा असल्याचे सत्कारमूर्ती श्याम देशपांडे यांनी यावेळी सांगितले.


        

कार्यक्रमाला व्यासपीठावर डॉ. मोहनजी भागवत, सत्कारमूर्ती श्याम देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमात आदर्श गोसेेवा प्रकल्प आणि डॉ. हेडगेवार रक्त केंद्राला धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आभार कुलदीप देशपांडे यांनी मानले. संचालन सुरेखा शास्त्री, प्रणिता आमले यांनी केले.


यावेळी अनिरुद्ध देशपांडे यांनी शास्त्रीय गायन केले तर श्रीनाथ शक्तीपीठाचे आचार्य श्रीकांत गदाधर आणि त्यांच्या चमूने वेदमंत्रांचे पठण केले. कार्यक्रमाला प्रांतसंघचालक दीपक तामशेट्टीवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ प्रचारक तथा गणमान्य नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या