Kawad-palkhi-festival-akola: यंदाच्या कावड पालखी उत्सवात दोनशे च्यावर पालखी व कावडचा सहभाग; राजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांची माहिती




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: यावर्षीच्या श्रावण मासाच्या अंतिम सोमवारच्या पारंपारिक कावड व पालखी उत्सवात लहान मोठ्या सर्व धरून 140 च्या जवळपास पालख्या व 200 च्या जवळपास कावड सहभाग राहणार असून यात आणखी वाढ होणार असल्याची माहिती 80 वर्षांपूर्वी महानगरातील श्रावणातील कावड व पालखीचे नियंत्रण करणाऱ्या जुन्या जाणत्या राजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी दिली.




राजेश्वर मंदिरात मंगळवारी संपन्न झालेल्या राज राजेश्वर शिवभक्त मंडळाच्या पत्रकार परिषदेत महानगरातील पारंपारिक पालखी कावड महोत्सवाची माहिती देण्यात आली. दोन सप्टेंबर रोजी अंतिम श्रावण सोमवार येत असून, यावर्षी श्रावणात पाच श्रावण सोमवार आले आहेत. दिनांक 2 सप्टेंबरच्या पाचव्या सोमवारी अमावास्या असून पोळा सण आहे. या दिनी हा पालखी कावड उत्सव होणार आहे. 





गांधीग्राम ते जुन्या शहरातील राज राजेश्वर मंदिर हा पारंपारिक कावड व पालखी मार्ग असून, हजारो शिवभक्त या महोत्सवात भक्तीभावाने सहभागी होत असतात. यंदाही हा उत्सव चांगल्या प्रकारे करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पालखी व कावड महोत्सवात शिवभक्तांनी कर्णकर्कश डीजे, अश्लील नृत्य, मद्यपान, अमली पदार्थाचे सेवन न करता पवित्र आचरण करून या महोत्सवात सहभागी व्हावे व प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सावजी यांनी यावेळी केले. 


कावड व पालखी उत्सवात मानाच्या पालखीचा मान राजराजेश्वर शिवभक्त मंडळाच्या पालखीला 80 वर्षापासून देण्यात येत असून, ही मानाची भोलेनाथाची पालखी 2 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता गांधीग्राम येथे पवित्र जल संकलित करण्यासाठी आगेकूच करणार असून, ती याच दिनी दुपारी बारा वाजता राजराजेश्वर मंदिरात येऊन भोलेनाथांना जलाभिषेक करणार आहे. या पालखी समवेत महानगरातील शेकडो कावड व पालख्या राजराजेश्वर मंदिरात येऊन अभिषेक करणार आहे. 





सार्वजनिक पालखी व कावड मंडळांनी या दिवशी येत असणाऱ्या पोळा चौक येथील गर्दी असणाऱ्या पोळा उत्सवाचे भान ठेवून आपल्या पारंपारिक पालखी कावड सोहळा हा दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पर्यंत आटोपता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 



सार्वजनिक पालखी कावड मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची या महत्त्वाच्या संदर्भातील रुपरेषा बैठक लवकरात राजेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आली असून, यामध्ये महानगरातील सर्व कावड पालखी मंडळाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सावजी यांनी यावेळी केले. 



शेकडो वर्षापासून महानगरा चालत असणारा श्रावण मासातील हा महोत्सव सर्व महानगरातील लाखो शिवभक्त महिला पुरुष जनतेचा असून, या दिनी महानगरातील रस्त्यावर हजारो नागरिक हा पालखी सोहळा बघण्यासाठी उभे असतात त्यांचा सन्मानही मंडळांनी राखून आपल्या ऐतिहासिक कावड व पालखी कार्यक्रमाचे प्रदर्शन करून या प्राचीन व ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.  





या पत्रकार परिषदेत यावेळी राजेश्वर शिवभक्त मंडळाचे राजीव बुंदेले, अमोल सर्जेकर, सुनील गरड, गजानन नंदाने, सुभाष ठाकूर, शाम सावजी, लालाजी कोंढाणे, राजेश नायसे, नटवर अहिर, मनोज बुंदिले, शंकर टिकार, चंदन सावजी समवेत बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या