journalists-sharpen-writing : पत्रकारांनी लेखणी कठोर करण्याची सध्या जास्त गरज- प्रकाश पोहरे यांचे आवाहन

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा 




         



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 



अकोला: पत्रकारिता ही लोकशाहीत वॉचडॉगची भूमिका करीत असली तरी आता तेवढ्याने भागणार नाही, सगळ्या क्षेत्रात लोक निगरगट्ट झाले आहेत. अशावेळी अभ्यास अन शोध पत्रकारिता करीत लेखणी अधिक कठोर करण्याची गरज आहे. देश विकायला बसलेले राजकारणी अन  शिक्षण, आरोग्य  ही सेवेची क्षेत्रे नासवून टाकणारे लोक हे मोठे संकट आहे. त्यात शिरलेला धंदेवाईकपणा घातक ठरला आहे. याविरुद्ध पत्रकारांनी आपली लेखणी चालवणे अव्याहत सुरू ठेवले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत, देशोन्नतीचे एडिटर इन चीफ प्रकाश पोहरे यांनी गुरुवारी येथे केले.  



          


महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या पत्रकार पुरस्कार वितरण  सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून श्री.पोहरे बोलत होते. हॉटेल सेंट्रल प्लाझा मध्ये आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पुरूषोत्तम आवारे पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसनेते अविनाश देशमुख,जनता बँकेचे अध्यक्ष रमाकांत खेतान, प्रसिद्ध पचन विकार तज्ञ डॉ.परमेश्वर जुनारे पाटील, पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस ॲड.सुधाकर खुमकर, विठ्ठल महल्ले उपस्थित होते.  



            


श्री.पोहरे यांनी ग्रामीण पत्रकारांनी आपापल्या क्षेत्रात परिश्रम करून जी झेप घेतली त्याबद्दल कौतुक करून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दिल्याबद्दल बहुजन पत्रकार संघाचेही कौतुक केले. उत्तम लेखन आणि प्रतिभा ही काही मुंबई,पुण्याची मक्तेदारी नाही. बुद्धीच्या बळावर ग्रामीण भागातील बहुजन पत्रकार सुद्धा या क्षेत्रात उंची गाठू शकतात हे आजवर अनेकांनी सिद्ध केले आहे. देशोन्नती अश्या शेकडो प्रतिभावंतांना आजवर व्यासपीठ उपलब्ध करून देत आली आहे. आम्ही कधीही प्रस्थापित लोकांना नव्हे तर विस्थापित अन ग्रामीण घटकांना संधी देत आलो आहोत अशीही माहितीही त्यांनी दिली. 


प्रकाश पोहरे वऱ्हाडातील पत्रकार घडविणाऱ्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, बहुजन समाजातील पत्रकार प्रचंड बौद्धिक क्षमता ठेवून आहेत फक्त त्यांना संधी देऊन पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी केले.   



             

पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे यांनी प्रास्ताविक करून जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारिता आणि सेवा क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या लोकांच्या निवडीची प्रक्रिया विषद केली.  यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते दिनेश शुक्ल, देवानंद साबळे, दीपक अवताडे, अरुण मोडक, संतोष सावजी, अमोल बढे, सिद्धार्थ वाहूरवाघ, विलास बेलाडकर, चंद्रशेखर ठाकरे, अक्षय गवळी, डॉ संदीप चव्हाण, शारीक डोकडीया, आशिष चौखंडे, दुलेखान युसूफ खान, विजय मेहरे या पत्रकारांना शाल, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले.     




यावेळी कवी अनंत खेळकर, अकोला जनता बँकेचे अध्यक्ष रमाकांतजी खेतान, अविनाश देशमुख, पुरूषोत्तम आवारे पाटील यांची समयोचित भाषणे झाली. या पुरस्कार वितरण सोहळ्याला जिल्ह्यातील दिडशेवर पत्रकारांची उपस्थिती होती. सोहळ्याचे बहारदार सूत्र संचालन ॲड. सुधाकर खुमकर यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष नीरज आवंडेकर यांनी केले. 

या सोहळ्यासाठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस जावेद झकारिया,अकोला तालुकाध्यक्ष प्रमोद मुरूमकार, दिनेश ठोकळ इत्यादींनी परिश्रम घेतले. 




या सोहळ्याला  समाधान वानखडे,  संजय तायडे, देवानंद ढोरे, विनोद ठोंबरे, विठ्ठल बोळे, आगा खान पठाण, दिपक लहाने, आश्विन मुरुमकार, आशिष चौखंडे, अमोल बढे, प्रशांत ठाकरे, निलेश खडसान, साहेबराव खंडारे, किशोर काकडे, शेषराव शिरसाट, पद्माकर लांडे, संजय मांजरे,  राजू लांडे, श्रीकृष्ण माळी, प्रा. विनायक धोरण, श्रीकृष्ण पावसाळे, पंजाब वर, संदीप देशमुख,  संतोष ठाकरे, दत्ता बोर्डे, शरद वाघोलीकर, अमोल वाडेवाले, विकास ठाकरे, संजय पुरी, फुलचंद वानखडे,  प्रवीण वाहुरवाघ,  सिध्दार्थ वाहुरवाघ, नसिब पठाण, मंगेश च-हाटे, सतिष लाहुळकर,  गौरव ढेरे, पवन बोपटे, पांडुरंग ठाकरे,  सुधिर राऊत, उमेश खोले, सुभाष वैद्य, राजेश कळमशेरे, ज्ञानेश्वर शेंडे, मनोहर मानकर, शिवाजी भोसले, नरेन्द्र शर्मा, मनीष खर्चे, अनवर खान,विठ्ठल राव गावंडे, मुकुंदा कोरडे, संजय कुडूपले, संजय चैधरी, गणेश पोटे, धनंजय मिश्रा, प्रा . सदाशिव शेळके इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



अनंत खेळकरांनी फुलवले हास्य 

          


प्रकृती चांगली नसताना सुद्धा आजच्या सोहळ्याला ख्यातनाम कवी अनंत खेळकर पत्रकारांच्या प्रेमापोटी उपस्थित राहिले. त्यांनी यावेळी काही बहारदार किस्से सांगत पत्रकारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. यावेळी खेळकर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर  सर्वाना अंतर्मुख करणारी शेतकऱ्याच्या जीवनावरील रचना सादर केली. खेळकर यांनी यावेळी अनेकांना खोडकर चिमटे घेत सोहळ्याची रंगत वाढवली.


हा लेखणीचा गौरव... 


ग्रामीण आणि शहरी पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार हा बहुजन पत्रकार संघाचा उत्तम पायंडा असून निष्ठेने पत्रकारिता करणाऱ्या बातमीदाराना पुरस्काररूपी थाप पाठीवर हवी असते यातून चांगले वार्तांकन करण्याची प्रेरणा मिळते ,हा सर्वांच्या लेखणीचा गौरव असल्याचे मत यावेळी बोलताना दै. जन यात्रेचे मुख्य संपादक अविनाश देशमुख यांनी व्यक्त केले. 


हा सकारात्मक सोहळा 


माध्यमांच्या क्षेत्रात कार्यरत लोकांना सभोवताल सर्वत्र वाईट आणि नकारात्मक बघावे लागते मात्र अशातही अनेक गोष्टी चांगल्या आणि सकारात्मक असतात त्यांना मोठे करून समाजापुढे ठेवल्याने लोकांची जगण्याची प्रेरणा वाढते म्हणून असे प्रेरणादायक काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान नेहमी व्हायला हवा ,त्यासाठी सर्वच घटकांनी पुढाकार घ्यावा ,त्यासाठी आजचा हा सकारात्मक सोहळा असल्याचे मत पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी व्यक्त केले.

        

असा पुरस्कार सोहळा दरवर्षी होणार 

        

पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचा दरवर्षी याच पद्धतीने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. सुधाकर खुमकर यांनी याप्रसंगी दिली. कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पत्रकार मित्रांचे त्यांनी याप्रसंगी विशेष आभार मानले.

टिप्पण्या