घटनास्थळ
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अकोट रोडवरील अबुल कलाम चौक जवळील एम सादिक हार्डवेअर समोर विना नंबर प्लेटच्या मोटारसायकल (ॲक्टिव्हा ) स्वाराने दोन मुलांना गाडीखाली तुडवून पळ काढला. ‘हिट अँड रन’ ची ही घटना आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली आहे.
अकोल्यात श्रावण मासात श्री राज राजेश्वरला पूर्णा नदीचे पाणी आणून अभिषेक केला जातो. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने कावडधारी पालख्या घेवून या मार्गाने मंदिराकडे जात होते.
जखमी मुले दरम्यान, दोन मुले त्यांच्या घराजवळील नालावरील धाब्यावर बसून पालख्या पाहत होते. अचानक तेथून सुसाट वेगाने जाणाऱ्या एका ॲक्टिव्हा दुचाकी गाडीने मुलांना चिरडले. दोन्ही मुले गाडीखाली दबल्या गेले. वाहन चालक व त्याचा साथीदार वाहन घटना स्थळीच सोडून पळून गेल्याचे कळते.
स्थानिक नागरिक आणि पालखी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना मुलांना गाडी खालून बाहेर काढले. पोलिसांनी गंभीर जखमी दोन्ही मुलांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारार्थ पाठवले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोटारसायकलच्या झडतीत दोन छायाचित्रे पोलिसांना आढळून आले.यावरून अकोट फाईल पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तर दोन्ही युवक दारूच्या नशेत धूत असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हंटले आहे.
ऋषिकेश मंगेश वानखडे (वय 6 वर्ष) आणि अब्दुल उमेर अब्दुल करीम (वय 7 वर्ष) असे दोन्हीं जखमी बालकांचे नाव असून, दोघेही पुर पीडित क्वार्टर येथील रहिवासी असल्याचे समजते. दोघांची अवस्था गंभीर असून, ऋषिकेश याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.
दरम्यान अलीकडे शहरात मोठ्या प्रमाणात वाहने नंबरप्लेट नसतानाही रस्त्याने सुसाट वेगाने धावत असताना दिसतात. याकडे पोलीस विभाग पूर्णपणे डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. अपघात टाळण्याकरिता विना नंबर प्लेटच्या गाड्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, तसेच फरार दोन्हीं युवकांवर हिट अँड रन कायदा अंतर्गत कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा