भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील भाजप व विश्व हिंदू परिषदेचे नेते तथा ईगल इन्फ्रा लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी प्रख्यात व्यवसायिक रामप्रकाश मिश्रा यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या च्या सुमारास मिश्रा यांच्या घराबाहेरच घडली.
व्यावसायिक रामप्रकाश मिश्रा हे शुक्रवारी रात्री दिल्ली येथून अकोल्यात पावणे अकराच्या सुमारास दाखल झाले. चारचाकी वाहनाचा दरवाजा उघडून ते बाहेर येताच त्याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला चढविला. त्या हल्ल्याचा मिश्रा यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब मिश्रा यांच्या वाहन चालकाच्या लक्षात येताच त्याने मिश्रा यांच्याकडे धाव घेतली. तोपर्यंत हल्ला करून दोन्ही हल्लेखोर दुचाकीने पसार झाले. वाहन चालकाने मिश्रा यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके त्यांच्या पथकासह मिश्रा यांच्या निवासस्थानी जावून परिसराची तपासणी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये दोन इसम मिश्रा यांच्या घरावर काही दिवसां पासून पाळत ठेवून असल्याचे दिसते. मात्र अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही.
तोंडाला मास्क लावून आलेल्या हल्लेखोराने मिश्रा यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये मिश्रा यांच्या पोटात व छातीच्या बाजूला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याचे समजते.
मिश्रा यांना तातडीने अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये भरती करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र पोटातील काही शिरा जखमी झाल्याने, त्यावर पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी त्यांना नागपूर येथील संचेती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असल्याचे कळते.
दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अलीकडे अकोल्यात घडत असलेल्या गंभीर घटनांवरून पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक नसल्याचे बोलल्या जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा