attack-on-a-policeman-patur: प्रेम प्रकरणातील तंटा मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला; दोन युवक पोलिसांच्या ताब्यात






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: प्रेम प्रकरणातील तंटा मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला झाल्याच्या घटनेचा एक व्हिडिओ अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील आलेगाव पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या पिंपळडोळी येथून समोर आला. हाणामारीचे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान पोलिसाला मारहाण करणाऱ्या दोन युवकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.




अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील नवेगाव येथील एका मुलाचे पिंपळडोळी गावातील मुलीशी प्रेमसंबंध जुळले. हा प्रेमी जोडा तीन महिन्यांपूर्वी गाव सोडून गेला होता. मात्र हे दोघेही काल नवेगाव मध्ये परतले. दोघेही गावात मध्ये परतल्याची माहिती संबंधित मुलीच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी नवेगाव येथील या मुलाचे घर गाठले आणि जबरदस्ती मुलीला ताब्यात घेऊन जायला लागले. याबाबत मुलाच्या नातेवाईकांनी आलेगाव पोलीस चौकीला माहिती दिली व मुली सोबत काही बरे वाईट होण्याची शंका व्यक्त केली. या तक्रारीवरून पोलीस चौकीमध्ये उपस्थित असलेले पोलीस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार क्षणाचाही विलंब न लावता नवेगाव ते पिंपळडोळी मार्ग गाठला व संबंधित मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यातून सोडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी थेट पोलीस कॉन्स्टेबल सोबत बाचाबाची करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलीस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांनी एकट्याने मोठ्या धैर्याने परिस्थिती हाताळली. दरम्यान हे सर्व घडत असताना कुणीतरी व्हिडिओ चित्रण केले. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.


या घटनेनंतर एक महिला व दोन युवकांच्या विरोधात चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  पुढील कारवाई पोलीस करत आहे.

टिप्पण्या