- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
खदान पोलिसांनी आरोपींना गुजरात व नाशिक येथुन केली अटक
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मामा- भाच्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने टाकलेल्या दरोड्याचा खुलासा आज अकोला स्थानिक गुन्हे शाखा आणि खदान पोलिसांनी केला. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली. यामध्ये एक ऑडिटर तर एका भावी वकिलाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी अकोला शहरातील आळशी प्लॉट येथे 5 दरोडेखोरांनी एका घरात दरोडा टाकला होता.
एकटे राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला या दरोडेखोरांनी 57 हजारांनी लुटलं होत. पोलिसांनी या प्रकरणी तपास चक्रे फिरवून 5 पैकी 3 आरोपींना नाशिक आणि सुरत येथून अटक केली आहे. तपास दरम्यान पोलिसांना अनेक धक्कादायक बाबिंचा खुलासा झाला. या दरोड्यातील मुख्य आरोपीने 12 वर्षापूर्वी आर्थिक व्यवहारात केडीया यांची फसवणूक केली होती. त्यानंतर त्याला कामावरून काढण्यात आलं होतं. मनात 12 वर्षापासून असलेला राग आज आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने आपल्या भाच्यासोबत मिळून हा खेळ रचला होता. दरोडा टाकण्याच्या आधी दरोडेखोरांनी केडिया यांच्या घराची रेकी केली होती आणि आपले मोबाईल बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे बंद केले होते. अकोला पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना अटक केली असून फरार दोन आरोपींचा शोध घेत आहे.
अशी घडली घटना
नवलकीशोर अमृतलाल केडीया, (वय 75 वर्षे, व्यवसाय शेअर बाजारब्रोकर, रा. आळशी प्लॉट, अकोला) यांनी दिलेल्या तक्रार नुसार, 27 जुन 2024 रोजी तक्रारदार हे त्यांचे घरी रात्रो 09 वाजताचे दरम्यान त्यांची पत्नी व मोलकरीण यांचे सह हजर असताना दोन ईसम त्यांचे घरातील दरवाज्यात आले. त्यातील एक व्यक्ती हा पोलीस गणवेशात होता. त्यांनी फिर्यादीस म्हटले की, ते एक मुलीचा शोध घेत असुन ती तक्रारदार यांचे घरात आहे व त्यांचे घरात शोध घ्यायचा आहे. पोलीस गणवेशातील व्यक्तीसोबत असलेला इसम हा दारुचे नशेत आहे असे लक्षात येताच फिर्यादीने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला असता, त्या दोन्ही व्यक्ती व त्यांच्या मागेच अजुन दोन व्यक्ती असे चार व्यक्तिनी घरात जबरदस्तीने प्रवेश केला घरात प्रवेश करुन आरोपी इसमांनी फिर्यादी व त्यांची मोलकरीन यांचेवर बंदुक सदृश्य शस्त्र व चाकु रोखुन फिर्यादीचे गळयातील सोन्याची चैन व घरातील दोन मोबाईल तसेच मोलकरीनच्या कानातील टॉप्स जबरीने काढुन घेतले व कपाटातील पाकीटामधील नगदी रुपये असा एकुण 57,000 रुपयेचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला, अशा तक्रारीवरुन अज्ञात चार ईसमांविरुध्द पोलीस स्टेशन खदान, अकोला येथे अप. क्र. 521 / 2024 कलम 452 392, 397, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असा लागला तपास
या घटने नंतर पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवीली. तपासादरम्यान पोलीस स्टेशन खदान यांनी फिर्यादीस अधिक विचारपुस करता त्यांचे कडुन पुष्पराज शहा (रा. सुरत, गुजरात) (केडीया यांचा तत्कालीन ऑफीस मॅनेजर) हे नाव संशयीत म्हणुन समोर आले. यावरुन तात्काळ सुरत येथे एक तपास टिम रवाना करण्यात आली. पुष्पराज शहा याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचेकडुन त्याने हा गुन्ह्याचा कट रचला असुन, त्यामध्ये त्याचा मामा सचिन शाहा (रा . नाशिक) व ईतर चार साथिदार यांचा सहभाग असल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहीतीवरुन सचिन शाहा व विनायक देवरे यांना नाशिक येथुन ताब्यात घेण्यात आले. ताब्यातील आरोपी पुष्पराज शाहा याने माहीती दिली की, मी साथिदारांना सांगितले होते की, केडीया यांचे घरी चोरी केली तर आपल्याला वीस लाख रुपये नगदी किंवा खंडणी स्वरुपात मिळतील वरुन सर्व तयार झाले. पुष्पराजच्या बोलावण्यावरुन सचिन शाहा आपले ईतर चार साथिदारासह सुरत येथे गेला व त्या ठिकाणी केडीया यांचे घरी जबरी चोरी करण्याचा कट रचला.
आरोपी हे 26 जुन 2024 रोजी सुरत वरुन नाशिक मार्गे अकोला येथे रवाना झाले. 27 जुन 2024 चे दुपारी श्री केडीया यांच्या घराची पाळत करुन रात्री 09 : 00 वाजताचे दरम्यान जबरी चोरीचा गुन्हा केला व आपल्या मारोती ईरटीगा गाडीने परत नाशिक येथे निघुन गेले. नमुद आरोपी कडुन गुन्ह्यात वापरलेले बंदुक सदृश्य हत्यार, चार मोबाईल व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असुन इतर 03 आरोपी यांची नावे निष्पन्न करण्यात आली असुन त्यांचे शोधकामी पथक रवाना करण्यात आले आहे.
आरोपीविरुध्द गुन्ह्याचा कट रचणे व दरोडा घालणे या कलमातर्गत 120 ब, 395 भा.दं.वि.ची वाढ करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन खदान हे स्थानिक गुन्हे शाखा यांची मदत घेवुन करीत आहे
ही कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चन सिंग, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर अकोला सतिश कुळकर्णी, यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन खदान करीत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा