lok-sabha-election-result-2024: अकोल्याच्या खासदार कोण? अवघ्या काही तासात होणार फैसला




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 


अकोला: अकोल्याचा खासदार कोण? याचा फैसला अवघ्या काही तासात होणार असून, प्रत्यक्ष मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता पासून सुरुवात झाली असून, भाग्य बंद असलेल्या इव्हीएम आपल्या जागेवर सज्ज आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत निकालाचा कौल हाती येणार असल्याचा अंदाज आहे. 





अकोला मतदार संघासाठी यंदाची लोकसभा निवडणूकीत अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीचा आता निकालाचा क्षण अवघ्या काही तासांवर येवून ठेपला आहे. या निकालाची प्रचंड उत्सुकता नागरिकांना लागली असून, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी देखील पूर्ण झाली आहे.




अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 26 एप्रिल रोजी पार पडली. यंदा 18 लाख 90 हजार 814 अंतिम मतदार निश्चित करण्यात आले होते. दरम्यान यापैकी 11 लाख 68 हजार 366 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 61.79% मतदान झाले आहे.




निवडणुकीच्या रिंगणात प्रमुख उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील, वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर, महायुतीचे अनुप धोत्रे यांच्यासह पंधरा उमेदवार रिंगणात आहेत. त्या सर्वांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद असून आज 4 जून रोजी त्याचा फैसला होत आहे. एमआयडीसी शिवनी भाग चार राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीला सुरूवात झाली असून, या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय राखीव, राज्य राखीव दल व जिल्हा पोलिस दलाचा समावेश असून अनुचित रोखण्यासाठी पोलिसांकडून कडा पहारा देण्यात येत आहे


20 ते 25 हजार मतांनी विजय!

अनुप धोत्रे मतमोजणी ठिकाणी आगमन 


प्रमुख उमेदवारांपैकी भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे डॉ.अभय पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. तिन्ही उमेदवारांचा पारंपारिक मतदार जिल्ह्यात आहे. त्यामुळे मतांचे विभाजन मोठया प्रमाणावर झाले आहे. तर सर्वाधिक मतदान झालेल्या अकोट व बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा नेमका कौल कुणाला जातो, यावर विजयाचे गणित ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे, तर यंदाच्या निवडणुकीत विजयी होणारा उमेदवार 20 ते 25 हजार मत फरकाने विजयी होईल, अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे.



आज मंगळवारी सकाळी आठ वाजता पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण सहा विधानसभा मतदार संघाच्या फेऱ्या निश्चित करण्यात आल्या असून, टपाली मतपत्रिकेची 16 टेबलवर तर ईव्हीएमची 14 टेबलवर मतमोजणी करण्यात येत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत संपूर्ण आणि स्पष्ट निकाल हाती येणार असा अंदाज व्यकत केल्या जात आहे. अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर, रिसोड या मतदार संघाचा अकोला 06 मतदार संघात समावेश आहे.





टिप्पण्या