joint-agrosco-crops-machinery: जॉईंट अग्रोस्कोच्या दुसऱ्या दिवशी पिकांचे सुधारित वाण,अवजारे,यंत्रे आणि उत्पादन तंत्रज्ञानाच्या शिफारसींवर सखोल विचार मंथन संपन्न!


 


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राज्यांतर्गत शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आपल्या सर्वोत्कृष्ट उपलब्धींव्दारे शेतकरी बांधवांचे उत्थान साधण्यासाठी मोलाचं योगदान देत आहेत. 

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या  शास्त्रज्ञ तथा संशोधकाद्वारे शाश्वत शेतीच्या दृष्टीकोनातून व शेतकरी बांधवांच्या गरजेनुरूप विविध विषयांवर करण्यात येत असलेल्या महत्त्वपूर्ण कृषी विषयक संशोधनावर राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या सर्वोच्च  स्वरूपाच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये मान्यता प्राप्त होवून अंतिमतः शिक्कामोर्तब होत असते. याच बैठकीत मान्यता प्राप्त झालेल्या शिफारसी पुढे शेतकरी बांधवांच्या विकास, उत्थान आणि उर्जितावस्थेसाठी शासनाचे कृषी विभागामार्फत प्रसारित केल्या जातात.

यावर्षी सदर संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या 52 व्या बैठकीचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे  7 ते 9 जून दरम्यान करण्यात आले असून सदर बैठकीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील सुमारे 300 हूनही अधिक कृषि शास्त्रज्ञ अकोला येथे उपस्थित झाले आहेत. 





विद्यापीठाव्दारे सदर बैठकीमध्ये विविध महत्वपूर्ण विषयावरील संवादात्मक तांत्रिक सादरीकरण सुव्यवस्थित रित्या व सुटसुटीतपणे संपन्न होण्याचे दृष्टीने महत्त्वपूर्ण विविध विषयांची एकूण 12 तांत्रिक गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. 



यानुषंगाने, आज बैठकीच्या द्वितीय दिवशी आयोजित दुसऱ्या तांत्रिक  सत्रामध्ये चारही कृषी विद्यापीठांच्या कृषी शास्त्रज्ञांद्वारे  संबंधित गटाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष या मान्यवरांसमोर विविध महत्वपूर्ण विषयांवरील संशोधनात्मक निष्कर्षांचे संगणकीय सादरीकरण करण्यात आले. 

यामध्ये शेती पिके (पीक सुधारणा व धोरण), नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, उद्यान विद्या,पशु विज्ञान व मत्स्यपालन, मूलभूत शास्त्रे,अन्नशास्त्र व तंत्रज्ञान , पीक संरक्षण, कृषी अभियांत्रिकी, सामाजिक शास्त्र, शेती पिके वाण प्रसारण समिती, उद्यानविद्या पीके वाण प्रसारण समिती, कृषी यंत्रे व अवजारे प्रसारण समिती, जैविक आणि अजैविक ताण सहन करणारे स्त्रोत, नोंदणी प्रस्ताव व उपयुक्त सूक्ष्मजीव समिती आदी महत्त्वाच्या विषयांवरील उपयुक्त अशा बाबींचा समावेश आहे.






यापैकी पहिल्या गटांत समाविष्ट असलेल्या शेती पिके, पिक सुधारणा व धोरण या तांत्रिक सत्राचे अध्यक्षस्थान  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी भूषविले तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. के. एस. बेग, संशोधन संचालक वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी हे लाभले होते.

सदर महत्वपूर्ण गटांत धान, गहू,  ज्वारी (खरीप व रब्बी), बाजरा व इतर तृणधान्य पिके, भरड धान्ये, मका, ऊस, चारा व गवत, कपाशी  (ओलिताखालील) व इतर तंतुवर्गीय पीके, कपाशी ( कोरडवाहू) तूर, हरभरा, मूग उडीद आणि इतर डाळवर्गीय पिके, तेलवर्गीय पिके (खरीप व रब्बी) सूर्यफूल व सोयाबीन वगळून, सूर्यफूल आणि सोयाबीन या पिकांचे संशोधनात्मक निष्कर्षांचे सादरीकरण होऊन त्यावर मान्यवरांद्वारे सखोल विचार मंथन करण्यात येऊन उपयुक्त आढळलेल्या संशोधनात्मक प्रस्तावांची अंतिम मंजुरी मिळण्यास्तव  शिफारस करण्यात आली.



नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन या गटांतर्गत अध्यक्षस्थानी  डॉ. विलास खर्चे संशोधन संचालक डॉ.पंदेकृवि, अकोला हे विराजमान होते तर तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. पी. एस. बोडके, अधिष्ठाता (कृषी) डॉ. बा. सा. को. कृ. वि., दापोली हे मान्यवर लाभले होते. सदर गटांतर्गत हवामान व कृषी हवामान शास्त्र, जमिनीची सुपीकता व पिकांची अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कोरडवाहू शेती पिके, ओलिताखालील शेती पिके, शेती पिकांमध्ये तण व्यवस्थापन, एकात्मिक शेती पद्धती, वनविद्या व कृषी वनीकी आणि सेंद्रिय शेती संशोधन या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरील विविध संशोधनात्मक बाबींचे सादरीकरण सखोल चर्चा होऊन संपन्न झाले. 



उद्यान विद्या गटांतर्गत डॉ. बा.सा. को.कृ.वि., दापोलीचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. पी एम हल्दनकर, संचालक कृषी विस्तार शिक्षण,डॉ. बा.सा. को.कृ.वि., दापोली हे मान्यवर लाभले होते. सदर गटातंर्गत उप उष्णकटिबंधीय उद्यान विद्या पीके ( केळी पपई चिकू आणि स्ट्रॉबेरी), उष्ण कटिबंधीय कोरडवाहू फळपिके ( चिंच, बोर, डाळिंब, सीताफळ व इतर कोरडवाहू फळ पिके), उप उष्णकटिबंधीय कोरडवाहू फळ पिके (आंबा काजू फणस व कोकम), द्राक्षे व पेरू, लिंबूवर्गीय फळपिके (संत्रा मोसंबी कागदी लिंबू ईडीलिंबू), लागवड पिके मसाला पिके ( नारळ, सुपारी, जायफळ, काळे मिरे, लवंग, दालचिनी अद्रक, हळद व पानवेली) भाजीपाला वर्गीय पिके, कंद,मुळे, वेली व मसाला पिके, पुष्पशास्त्र ( फुले आणि शोभिवंत झाडे व उद्याने), औषधी व अप्रयुक्त सुगंधी वनस्पती तसेच संरक्षित शेती आदी महत्त्वाच्या विषयांवरील सादरीकरण चर्चेद्वारे पार पडले.



पशुपालन व मत्स्य विज्ञान या गटाचे अध्यक्षस्थानी डॉ.पी.ई.शिनगारे, संशोधन संचालक, डॉ. बा.सा. को. कृ. वि. दापोली तर उपाध्यक्षस्थानी डॉ. आर. एम. गाडे, सहयोगी अधिष्ठाता, डॉ.पंदेकृवि, अकोला हे लाभले होते .सदर गटांतर्गत रवंथ करणारे मोठे पशु , रवंथ करणारे छोटे पशु , रवंथ न करणारे पशु , दुग्ध तंत्रज्ञान, सागरी मत्स्यव्यवसाय आणि आंतरदेशीय मत्स्यव्यवसाय या महत्त्वपूर्ण विषयांवर सादरीकरण दरम्यान सखोल चर्चा संपन्न झाली.



मूलभूत शास्त्र अन्नशास्त्र व तंत्रज्ञान या गटांतर्गत अध्यक्षस्थानी डॉ. एस. डी. गोरंटीवार, संशोधन संचालक, म.फु. कृ. वि. राहुरी तर उपाध्यक्ष स्थानी मा.डॉ. हरिहर कौसडीकर, संचालक संशोधन, म.कृ.शि.व सं.प. पुणे हे लाभले होते. सदर गटामध्ये जीव रसायनशास्त्र, वनस्पती प्राणी व मत्स्य जैवतंत्रज्ञान, वनस्पती शरीरक्रिया शास्त्र व अजैविक ताण व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान (दुग्ध तंत्रज्ञान, पदार्थ विकास व सर्व पिकांची प्रक्रिया), समाज विज्ञान (गृहशास्त्र), बियाणे तंत्रज्ञान, सर्व पिकांचे कापणी पश्चात व्यवस्थापन (बुद्ध तंत्रज्ञान मत्स्य पालन, अभियांत्रिकी संदर्भातील बाबी वगळून कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी) आदी महत्त्वाच्या विषयांवरील सादरीकरण उपयुक्त चर्चेअंती संपन्न झाले.

त्याचप्रमाणे पीक संरक्षण या अतिशय महत्त्वाच्या गटांमध्ये अध्यक्षस्थानी  अधिष्ठाता कृषि डॉ श्यामसुंदर माने विराजमान होते तर उपाध्यक्ष म्हणून मा. डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉ.पंदेकृ.वि., अकोला हे लाभले होते.

या गटा अंतर्गत कृषी सूक्ष्मजीवशास्त्र व आळिंबी, वनस्पती विकृतीशास्त्र ( बुरशीजन्य व विषाणूजन्य रोग), अवशेष विश्लेषण व जैविक घटक अंतर्भूत कीटकशास्त्र व सूत्र कृमी विज्ञान) तसेच रेशीम उद्योग इत्यादी महत्त्वपूर्ण शिफारसींवर सखोल चर्चा संपन्न झाली.



तद्वतच,कृषी अभियांत्रिकी या गटांतर्गत अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू मा. डॉ. पी.जी. पाटील विराजमान होते तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. यु. एम. खोडके, अधिष्ठाता (कृषी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी समवेत मा. डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉ. पंदेकृवि अकोला हे मान्यवरव्दय लाभले होते. या गटामध्ये मृद व जलसंधारण अभियांत्रिकी, सिंचन व निचरा अभियांत्रिकी, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत व विद्युतीय ऊर्जा, कृषी यंत्रे व शक्ती, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी, शेती संरचना आणि अंकात्मक कृषी या महत्त्वपूर्ण विषयांशी संबंधित शिफारसींवर सखोल चर्चा संपन्न झाली.


सामाजिक शास्त्रे या आठव्या गटांतर्गत अध्यक्षस्थानी  राज्याचे कृषि आयुक्त तथा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब भागडे विराजमान होते तर उपाध्यक्ष स्थानी मा. डॉ.डि. एन.गोखले संचालक, कृषी विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी हे लाभले होते. या गटांमध्ये विस्तार शिक्षण व व्यवस्थापन कृषी अर्थशास्त्र कृषी संख्याशास्त्र तसेच बौद्धिक संपदा अधिकार विषयक शिफारसींवर सांगोपांग चर्चा संपन्न झाली.


अतिशय महत्त्वाचा असलेल्या शेती पिकांचे वाण प्रसारण समिती या नवव्या क्रमांकाच्या गटातील सादरीकरणाचे वेळी डॉ . पंदेकृवि अकोलाचे सन्माननीय कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर डॉ. जे. आर. कदम, विभाग प्रमुख, कृषी विस्तार शिक्षण, डॉ.बा.सा.को.कृ.वि.दापोलीसमवेत डॉ. एन. व्ही. शेंडे, विभाग प्रमुख, कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग, डॉ.पंदेकृवि, अकोला हे उपाध्यक्ष स्थानी होते.




सदर गटांतर्गत विविध महत्त्वाच्या शेती पिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन व  सुधारित पिक वाणांवर सखोल विचार मंथन  होऊन आशादायक शिफारसी अंतिम करण्यात आल्यात.

सोबतच उद्यानविद्या पीके वाण प्रसारण समिती या महत्त्वपूर्ण गटांतर्गत अध्यक्षस्थानी डॉ. बा. सा. को. कृ. वि. दापोलीचे सन्माननीय कुलगुरू  डॉ. संजय भावे विराजमान होते तर उपाध्यक्ष म्हणून मा.डॉ. पी.एम. हलदनकर, संचालक, विस्तार शिक्षण,डॉ. बा. सा. को. कृ. वि. दापोली समवेत  डॉ. डी. एम. पंचभाई, अधिष्ठाता (उद्यान विज्ञा) डॉ. पंदेकृवि अकोला हे लाभले होते.सदर गटांतर्गत विविध महत्त्वाच्या उद्यानविद्या  पिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन व  सुधारित पिक वाणांवर सखोल विचार मंथन  होऊन आशादायक शिफारसी अंतिम करण्यात आल्यात.

त्याचप्रमाणे शेती अवजारे व यंत्रे प्रसारण समिती गटांतर्गत सादरीकरण वेळी अध्यक्ष म्हणून मफुकृवि, राहुरीचे सन्माननीय कुलगुरू  डॉ. पी.जी. पाटील लाभले होते तर उपाध्यक्ष म्हणून 

मा.डॉ. यु. एम. खोडके, अधिष्ठाता (कृषी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी समवेत डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉ. पंदेकृवि अकोला हे लाभले होते.



या गटातील सादरीकरण वेळी शेतातील विविध कामे तुलनेने कमी वेळात व अधिक कार्यक्षमतेने पार पाडावयासाठी उपयुक्त अशा सुधारित अवजारे व नावीन्यपूर्ण यंत्रांच्या शिफारशी निवड सखोल विचार मंथन होऊन त्यांना अंतिम स्वरूप देण्यात आले.

टिप्पण्या